रेल्वे मंत्रालय

भारतीय रेल्वेची आपल्या 100 टक्के विद्युतीकरण मोहिमेच्या दिशेने वेगाने आगेकूच


उत्तराखंडमधील संपूर्ण ब्रॉड गेज नेटवर्कचे (347 रुट किलोमीटर्स) विद्युतीकरण पूर्ण

नवीन विद्युतीकरण झालेल्या मार्गांमुळे अनेक रेल्वे गाड्यांना लाभ होणार

Posted On: 13 MAR 2023 3:31PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 13 मार्च 2023

जगातील सर्वात मोठी हरित रेल्वे बनण्याच्या दिशेने भारतीय रेल्वे काम करत आहे आणि 2030 पूर्वी ‘निव्वळ शून्य कार्बन उत्सर्जक’बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. उत्तर प्रदेशातील विद्युतीकरण अलीकडेच पूर्ण केल्यानंतर भारतीय रेल्वेने आणखी एक उल्लेखनीय कामगिरी केली आहे. भारतीय रेल्वेने उत्तराखंडचे विद्युतीकरण पूर्ण केले आहे.

सध्या उत्तराखंडमध्ये असलेले 347 रुट किलोमीटरचे ब्रॉड गेज जाळे 100% विद्युत भारित असून त्यामुळे लाईन हॉल खर्चात(सुमारे 2.5 पट कमी) कपात, अधिक जड हॉलेज कॅपॅसिटी, सेक्शन कॅपॅसिटीत वाढ, विजेवर चालणाऱ्या इंजिनाच्या परिचालनाच्या आणि देखभालीच्या खर्चात कपात अशा  विविध प्रकारच्या खर्चात बचत होत आहे आणि खनिज तेलावरील अवलंबित्व कमी झाल्यामुळे रेल्वे परकीय चलनात बचत करणारे आणि ऊर्जा कार्यक्षम आणि पर्यावरण स्नेही वाहतुकीचे साधन बनले आहे.

उत्तराखंड राज्याचे क्षेत्र उत्तर आणि ईशान्य रेल्वेच्या अधिकारक्षेत्रात येते. डेहराडून, हरिद्वार, रुरकी, ऋषिकेश, काठगोदाम, टणकपूर ही उत्तराखंडमधील काही प्रमुख रेल्वे स्थानके आहेत. त्यापैकी काही स्थानके धार्मिक महत्त्वाची आहेत तर काही पर्यटकांचे आकर्षणकेंद्र आहेत. बद्रीनाथ, केदारनाथ, यमनोत्री, गंगोत्री, हेमकुंड साहिब, मसुरी, नैनिताल, जिम कॉर्बेट आणि हरिद्वार ही त्यांची काही उदाहरणे आहेत. काठगोदाम रेल्वे स्थानक हे एक महत्त्वाचे रेल्वे स्थानक असून या स्थानकावर ये-जा करणाऱ्या प्रवाशांची वार्षिक संख्या सुमारे 7 लाख इतकी असून  प्रवासातील शेवटचे स्थानक असलेले हे रेल्वे स्थानक उत्तराखंडमधील कुमाँऊ प्रदेशाचे प्रवेशद्वार म्हणून काम करते. या रेल्वे स्थानकात 24 एप्रिल 1884 रोजी पहिली रेल्वे गाडी पोहोचली होती. नंदा देवी, हरिद्वार एक्स्प्रेस, मसुरी एक्स्प्रेस, उत्कल एक्स्प्रेस, कुमाँऊ एक्स्प्रेस, डून एक्स्प्रेस आणि शताब्दी एक्स्प्रेस या उत्तराखंडमधील काही प्रतिष्ठेच्या गाड्या आहेत. या गाड्या राज्यांच्या विविध भागांसोबत आणि भारतातील इतर प्रमुख शहरांसोबत सुविधाजनक संपर्क प्रस्थापित करण्यासाठी उपयुक्त आहेत आणि राज्याला पर्यटन
व्यवसायामध्ये फायदा मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मदत करत आहेत.

त्याशिवाय ऋषिकेश ते कर्णप्रयाग या नव्या मार्गिकेचे उभारणीचे कार्य प्रगतीपथावर असून, त्यामुळे चार धाम तीर्थयात्रा भारतीय रेल्वेच्या परिमंडळात आल्याने भारतीय रेल्वेच्या इतिहासात ती आणखी एक उल्लेखनीय कामगिरी ठरणार आहे. भारतीय रेल्वेच्या 100% विद्युतीकरणाच्या धोरणाला अनुसरून  या मार्गाला विद्युतीकरणासोबत मंजुरी देण्यात आली आहे.


S.Kane/S.Patil/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1906370) Visitor Counter : 179