वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारत-अमेरिका यांच्यात नवी दिल्लीत 10 मार्च 2023 ला झालेल्या व्यावसायिक संवादानंतर जारी करण्यात आलेले संयुक्त निवेदन

Posted On: 10 MAR 2023 8:35PM by PIB Mumbai

भारत-अमेरिका  यांच्यात 10 मार्च 2023 ला नवी दिल्लीत झालेल्या व्यावसायिक संवादानंतर जारी करण्यात आलेले संयुक्त निवेदन:

1. भारत आणि अमेरिका  यांच्यात 10 मार्च 2023 ला नवी दिल्लीत 5 वा मंत्री स्तरीय झालेल्या व्यावसायिक संवाद झाला.भारताचे वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल आणि  अमेरिकेच्या वाणिज्य मंत्री गीना रायमोंडो यांनी या व्यावसायिक संवादाचे अध्यक्षपद संयुक्तपणे भूषवले भारत- अमेरिकेच्या नेत्यांच्या सप्टेंबर 2021 च्या मध्ये जारी करण्यात आलेल्या संयुक्त निवेदनानुसार या संवादाचा, भविष्यातल्या आणि नव्याने उदयाला येणाऱ्या द्विपक्षीय व्यावसायिक भागीदारीवर नव्याने लक्ष केंद्रीत करत पुनर्प्रारंभ करण्यात आला आहे. हा व्यावसायिक संवाद म्हणजे,भारत-अमेरिका व्यापक  जागतिक धोरणात्मक भागीदारी  दृढ करण्यासाठी,समावेशक आणि उचित व्यापार आणि गुंतवणूक धोरण विकसित करण्यासाठी आणि दोन्ही देशांना अधिक  समृद्ध करण्याच्या दृष्टीने नव्या बाजारपेठा काबीज करण्यासाठी खाजगी क्षेत्राची त्याच्याशी सांगड घालण्याच्या सध्याच्या प्रयत्नांचा भाग आहे.

2. द्विपक्षीय वस्तू आणि सेवा व्यापार 2014 पासून   जवळजवळ दुप्पट झाला आहे याबद्दल दोन्ही मंत्र्यांनी समाधान व्यक्त केले. 2022 मध्ये तो 191 अब्ज अमेरिकी डॉलर्सहून अधिक झाला असून यातून वेगवान वाढ प्रतीत होत आहे ज्याचा लाभ दोन्ही देशांना होत आहे. 2022 मध्ये अमेरिका हा भारताचा सर्वात मोठा व्यापार भागीदार ठरला असून दोन्ही देश वाणिज्यिक  सहयोग वाढवण्यासाठी पुढे पाऊले उचलतील त्याचबरोबर विविध क्षेत्रात बाजारपेठ विषयक संधींचा  शोध आणि लाभ घेतील. लघु  आणि मध्यम उद्योग  आणि स्टार्ट अप्स कंपन्यांसाठी  गुंतवणूक  वाढीसाठी पोषक वातावरण निर्माण करण्यासाठी सहकार्य अधिक वाढवण्याच्या शक्यता दोन्ही देशांनी लक्षात घेतल्या.

3. नॅशनल इन्फ्रास्ट्रक्चर पाईप लाईन आणि पीएम गतीशक्ती नॅशनल  मास्टर प्लान यासह आपल्या पायाभूत क्षेत्राला गती देण्यासाठी भारताने हाती घेतलेल्या उपक्रमांची मंत्री रायमोंडो यांनी दखल घेतली. लॉजिस्टिक क्षेत्रात  डिजिटल परिवर्तन आणि व्यापाराला चालना देण्याचा उद्देश असलेल्या भारताच्या राष्ट्रीय लॉजिस्टिक धोरणाचीही त्यांनी दखल घेतली. CHIPS आणि विज्ञान कायदा 2022, चलनवाढ घट कायदा,पायाभूत सुविधा गुंतवणूक आणि नोकरी कायदा यासारख्या अमेरिकेच्या उपक्रमांचे गोयल यांनी महत्वाकांक्षी स्वरूप जाणून घेतले. हे उपक्रम देशांतर्गत उत्पादन, पुरवठा साखळी  बळकट करणे आणि उद्योगांना गती देणे यामध्ये गुंतवणूक संधी  देऊ करतात.

4. दोन्ही देशांनी, लोकशाही मुल्ये असलेल्या सम विचारी देशांसमवेत आर्थिक एकात्मतेला चालना देण्याच्या दृष्टीने, परस्पर विश्वासावर आधारित सहयोगाच्या संधींचा शोध घेण्यासाठी रुची दर्शवली.यामुळे पारदर्शकता,लवचिकता,जागतिक पुरवठा साखळीमध्ये सुरक्षितता याबरोबरच उभय देशांमध्ये आणि हिंद-प्रशांत क्षेत्रामध्ये आर्थिक भरभराटीला चालना मिळेल.  

5. इंडो- पॅसिफिक इकॉनॉमिक फ्रेमवर्क फॉर प्रोस्पारिटी (आयपीईएफ) मधल्या भारताच्या सक्रीय भागीदारीचे मंत्री रायमोंडो यांनी स्वागत केले. 8-11 फेब्रुवारी 2023 मध्ये आयपीईएफ स्तंभ II-IV साठी भारताने नवी दिल्लीत  चर्चेची विशेष फेरी आयोजित केल्याबद्दल त्यांनी  भारताची प्रशंसा केली. हिंद-प्रशांत क्षेत्रात समावेशक विकास,शांतता आणि समृद्धी जारी राखण्यासाठी आयपीईएफ भागीदार देशांनी आपसातल्या  आर्थिक घडामोडी अधिक व्यापक करणे महत्वाचे आहे याची दोन्ही मंत्र्यांनी नोंद घेतली.  गुंतवणुकीच्या वाढत्या ओघातून तांत्रिक सहाय्य आणि क्षमता उभारणी समावेशनातून, पायाभूत ढाच्याचा,कनेक्टीव्हिटीचा विकास, अधिक लवचिक पुरवठा साखळी, आयपीईएफ भागीदार देशांना स्वच्छ उर्जा संक्रमणासाठी सुविधा आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक प्रयत्नांना आणि कर प्रशासनाला बळकटी यासारखे ठोस लाभ आयपीईएफ प्रदान करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

6. महत्वाच्या आणि उदयोन्मुख क्षेत्रात पुरवठा साखळी मजबूत करण्यासाठी द्विपक्षीय सहकार्याचे लाभ दोन्ही मंत्र्यांनी स्वीकारले. महत्वाच्या आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानावर अमेरिका आणि भारताने   नुकत्याच सुरु केलेला उपक्रम iCET चे उभय मंत्र्यांनी स्वागत केले. दोन्ही देशातली सरकारे,व्यवसाय आणि शैक्षणिक संस्था यामधल्या धोरणात्मक तंत्र भागीदारीचा विस्तार आणि वृद्धी यासाठी  हा उपक्रम आहे . दोन्ही देशांमध्ये विश्वासार्ह तंत्रज्ञानविषयक मूल्यसाखळी भागीदारी उभारणे आणि महत्वाच्या आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानात आणखी सहकार्य वाढवणे,सहविकास आणि सहउत्पादन,आपल्या नवोन्मेश परिसंस्थेत  कनेक्टीव्हिटी या आयसीईटीच्या उद्देशाला पूरक असा हा  समन्वय असल्याचे दोन्ही मंत्र्यांनी स्पष्ट केले . दोन्ही देशांमधले आर्थिक आणि वाणिज्यिक संबंध सुरळीत राखण्यामध्ये अडथळा ठरणारे मुद्दे आणि नियामक अडथळे यांची दखल घेण्याच्या उद्देशाने, आयसीईटी अंतर्गत दोन्ही सरकारांनी स्थापन केलेल्या स्थायी यंत्रणेसमवेत समन्वय राखण्याचे  महत्व मंत्री गोयल आणि रायमोंडो यांनी लक्षात घेतले.

7..सामायिक आर्थिक प्राधान्यासाठीचा  वेग कायम राखण्यासाठी व्यावसायिक संवादाचे महत्व दोन्ही मंत्र्यांनी अधोरेखित केले. त्या अनुषंगाने दोन्ही देशांच्या वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांकडून 2023 च्या अखेरीपूर्वी मध्यावधी आढावा घेण्याच्या उद्देशाला  त्यांनी पुष्टी दिली.व्यावसायिक संवादाअंतर्गत निश्चित करण्यात आलेली प्राधान्य क्षेत्रे जारी ठेवण्यासाठी,मंत्र्यांच्या आर्थिक दृष्टिकोनावर आधारित पथदर्शी आराखड्यानुसार अंमलबजावणी आणि सध्याच्या प्रयत्नांना वेग देण्यासाठी  हा  मध्यावधी आढावा  दोन्ही देशांना उपयोगी ठरणार आहे.

लवचिक  पुरवठा साखळी उभारणे

8..जागतिक इलेक्ट्रोनिक्स उद्योगात अमेरिका आणि भारतीय बाजारपेठेचे महत्व जाणून,सेमीकंडक्टर क्षेत्रात उद्योग सहकार्याला चालना देण्याकरिता सार्वजनिक आणि खाजगी प्रयत्न वाढवण्यासाठी  व्यावसायिक संवादाचा उपयोग करण्याचा उद्देश  मंत्री रायमोंडो आणि गोयल यांनी व्यक्त केला. त्या अंतर्गत , विकासासाठी संधी आणि अमेरिका आणि भारताच्या सेमीकंडक्टर उद्योगामध्ये बळकट संबंध,पूरक परीयंत्रणा विकसित व्हावी त्याचबरोबर सेमीकंडक्टरसाठी अधिक वैविध्यपूर्ण पुरवठा साखळी विकसित व्हावी याची सुनिश्चिती  करण्यासाठी आव्हाने जाणून घेतील. या दिशेने व्यावसायिक संवादाअंतर्गत सेमीकंडक्टर उप समिती स्थापन करण्यासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्याचे दोन्ही मंत्र्यांनी स्वागत केले.अमेरिकेसाठी त्यांचा वाणिज्य विभाग आणि भारतासाठी त्यांचा वाणिज्य आणि उद्योग विभाग या उप समितीचे नेतृत्व करेल. कोणत्याही व्यावसायिक  संवादाच्या तसेच मध्यावधी आढाव्याच्या आधी बैठक घेण्याची,आयसीईटी संदर्भात सुरु करण्यात आलेल्या संयुक्त उद्योग कृती  दलाच्या शिफारसींचा आढावा घेण्याची जबाबदारी  दोन्ही मंत्र्यांनी  या उप समितीकडे सोपवली आहे.   

9. लवचिक आणि विश्वासार्ह जागतिक पुरवठा साखळी निर्माण करण्याच्या सामायिक प्राधान्यामुळे तसेच महत्वपूर्व आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान उपक्रमातील भागीदारी पुढे नेण्याच्या बाबतीत परस्पर हित लक्षात घेऊन उभय देशांनी द्विपक्षीय धोरणात्मक आणि उच्च तंत्रज्ञान व्यापार आणि सहकार्य वाढवण्याची गरज अधोरेखित केली. या संदर्भात, निर्यातीवरील निर्बंध हटवणे, उच्च तंत्रज्ञान व्यवसाय वृद्धिंगत करण्याचे मार्ग शोधणे आणि उभय देशांदरम्यान तंत्रज्ञान हस्तांतरण सुलभ करण्यासाठी अमेरिकेचा वाणिज्य विभाग आणि भारताचे  परराष्ट्र व्यवहार मंत्रालय भारत-अमेरिका धोरणात्मक व्यापार संवाद  सुरु करण्याचा विचार करत आहेत. भारताच्या वतीने परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव  आणि अमेरिकेच्या वतीने वाणिज्यमंत्रालयाचे  उद्योग आणि सुरक्षा विभागाचे अवर सचिव, या संवादाचे नेतृत्व करतील.

10. अनधिकृत वापर, रॅन्समवेअर हल्ला आणि डेटा नष्ट होणे यासारखे सायबर धोके वाढत असल्याची चिंता उभय मंत्र्यांनी व्यक्त केली तसेच या धोक्यांपासून संरक्षण करण्याची गरज व्यक्त केली. ही संरक्षणाची गरज केवळ वाढत्या ई-कॉमर्स, डिजिटल पेमेंट्स आणि संबंधित सेवा क्षेत्रांनाच लागू होत नाही तर संबंधित उत्पादन आणि महत्वपूर्ण पायाभूत सुविधांनाही लागू होते. सायबर सुरक्षा आणि कृत्रिम बुद्धिमत्ता संबंधी परस्पर हितसंबंध तसेच सायबर सुरक्षा आणि कृत्रिम बुद्धिमत्ता संसाधनांशी संबंधित माहितीचे आदानप्रदान आणि व्यावसायिक संवादासारख्या प्रस्थापित द्विपक्षीय यंत्रणेअंतर्गत दृष्टिकोनाच्या संभाव्यतेचा शोध घेण्याची संधी यानिमित्ताने मिळाल्याचे मंत्री  रायमोंडो यांनी स्वागत केले.

11. सुरक्षित औषध निर्मितीचा पाया विकसित करण्यासाठी तसेच महत्वपूर्ण आणि धोरणात्मक खनिजांसाठी (दुर्मिळ धातूसह) पुरवठा साखळीचे वैविधीकरण करण्यासाठी अमेरिकेबरोबर भागीदारी करण्यात भारताला रस असल्याचे गोयल यांनी नमूद केले.

हवामान आणि स्वच्छ तंत्रज्ञान सहकार्य सुलभ करणे

12. आपल्या देशांची ऊर्जा सुरक्षा वाढवण्याची आणि हरितगृह वायू उत्सर्जन कमी करण्याची  महत्त्वपूर्ण गरज भागविण्यात मदत करण्यासाठी उभय मंत्र्यांनी दोन्ही देशांच्या  उद्योगांमध्ये अधिकाधिक संपर्क सुलभ करण्याचा संकल्प केला . यासाठी विविध मंच विकसित केले जातील ज्यात ऊर्जा आणि स्वच्छ तंत्रज्ञान क्षेत्रांमधील संधी आणि महत्वपूर्ण समस्यांवर चर्चा केली जाईल. या दिशेने संपूर्ण हिंद-प्रशांत क्षेत्रात  शाश्वत आणि सुरक्षित स्वच्छ ऊर्जा बाजारपेठ वाढवण्यासाठी स्वच्छ EDGE एशिया या अमेरिकेचा महत्वाकांक्षी उपक्रमात  अमेरिकेच्या उद्योगांचा सहभाग सुलभ करणारे अमेरिका-भारत ऊर्जा उद्योग नेटवर्क (ईआयएन) हे  एक व्यापक व्यासपीठ असल्याचे गोयल यांनी नमूद केले. गोलमेज चर्चा, वेबिनार आणि अमेरिकी उद्योगांसाठी खुल्या असलेल्या इतर उपक्रमांद्वारे भारतीय ऊर्जा क्षेत्रातील संधींवर चर्चा करण्यासाठी एक व्यासपीठ म्हणून ऊर्जा उद्योग नेटवर्कला  पुन्हा चालना देण्याचे काम अमेरिकेचे  वाणिज्य मंत्रालय करत आहे. भारतीय कंपन्यांना या उपक्रमांमध्ये सहभागी होण्याची ही संधी असल्याचे सांगत गोयल यांनी त्याचे  स्वागत केले. ईआयएन  कार्यक्रमात समाविष्ट होण्याची क्षमता  सौर पुरवठा साखळीत असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच सौर उपकरणांसाठी पुरवठा साखळीवरील  अवलंबत्व कमी करण्यासाठी अमेरिका -भारत व्यावसायिक भागीदारीच्या महत्त्वाबाबत दोन्ही मंत्र्यांनी सहमती दर्शवली.

13. अमेरिका-भारत धोरणात्मक स्वच्छ ऊर्जा भागीदारी (SCEP) अंतर्गत सर्वसमावेशक हरित ऊर्जा विकासाला चालना दिली जात असल्याची दोन्ही देशांनी दखल घेतली.  हरित ऊर्जा संक्रमण, स्वच्छ ऊर्जेच्या वापराला  प्रोत्साहन आणि विकासासाठी कमी कार्बन उत्सर्जनाच्या उपायांना दोन्ही देशांच्या नेत्यांकडून दिले जात असलेल्या महत्त्वाचे अमेरिका-भारत धोरणात्मक स्वच्छ ऊर्जा भागीदारी  हे प्रतिबिंब आहे. या संदर्भात, अलिकडेच पार पडलेल्या  धोरणात्मक स्वच्छ ऊर्जा भागीदारी  मंत्रिस्तरीय बैठकीत सहमती दर्शवलेल्या दोन महत्त्वाच्या उपक्रमांना -हायड्रोजन तंत्रज्ञानाचा विकास आणि उपयोजन आणि नवीन ऊर्जा संचय कृती दलाची स्थापनेला  मंत्री आणि सचिव यांनी पाठिंबा दर्शवला. तसेच दोन्ही देशांनी  भारताच्या G20 अध्यक्षतेखाली सुरू केल्या जाणाऱ्या जागतिक जैवइंधन आघाडीमध्ये  एकत्र काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.

14.  सौर उर्जा मूल्य साखळीतील घटक सहजपणे उपलब्ध करून देणे, बॅटरी स्टोरेजमध्ये गुंतवणूक वाढवणे आणि ऑफशोअर विंड टर्बाइन्सचे उत्पादन या क्षेत्रात अमेरिकेने अधिक सहकार्य करण्याची  भारताची अपेक्षा असल्याचे गोयल यांनी नमूद केले. 2024 मध्ये वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली स्वच्छ ऊर्जा आणि पर्यावरण तंत्रज्ञान व्यवसाय विकास मिशन भारतात पाठवण्याचा अमेरिकेच्या वाणिज्य विभागाचा विचार असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. ग्रीड आधुनिकीकरण आणि ग्रिड सोल्यूशन्स, नवीकरणीय ऊर्जा , ऊर्जा संचय , हायड्रोजन, द्रवरूप नैसर्गिक वायू आणि पर्यावरण तंत्रज्ञान उपाय आदी बाबींमध्ये अमेरिका- भारत व्यापार  भागीदारी अधिक वृद्धिंगत करण्याची हे ट्रेड मिशन ही एक संधी असेल.

सर्वसमावेशक डिजिटल विकास

15. माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञान (आयसीटी)  कनेक्टिव्हिटी वाढवणे, डिजिटल समावेशनाला प्रोत्साहन आणि डिजिटल साधनांच्या वापराद्वारे सरकारी सेवांच्या वितरणात कार्यक्षमता सुधारण्याच्या भारताच्या महत्त्वाकांक्षी प्रयत्नांबद्दल मंत्री रायमोंडो यांनी गोयल यांची   प्रशंसा केली. उभय  देशांमधील  वेगवान डिजिटलायझेशनची दखल घेत  मंत्री रायमोंडो यांनी डिजिटल क्षेत्रात आपली  "विश्वसनीय भागीदारी" अधिक चांगल्या प्रकारे प्रतिबिंबित करण्याचे मार्ग शोधण्यात यावेत अशी इच्छा व्यक्त केली.

16. अमेरिका-भारत माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञान (आयसीटी) कृतीगट आणि व्यापार धोरण मधील  विविध डिजिटल व्यापार समस्यांवर काम करताना  दोन्ही देशांनी  देशांतर्गत लागू धोरण आणि कायदेशीर चौकटीनुसार सीमेपलीकडून येणाऱ्या  डेटाचे महत्त्व ओळखले . सीमेपलीकडील डेटा प्रवाह आणि योग्य बहुपक्षीय मंचांसह इतर संबंधित मुद्द्यांवर सहकार्य  सुरू ठेवण्याची इच्छा उभय नेत्यांनी व्यक्त केली. दोन्ही मंत्र्यांनी 6G सह दूरसंचार क्षेत्रात पुढच्या पिढीची मानके विकसित करण्यासाठी एकत्र काम करण्याची इच्छा व्यक्त केली. संबंधित सरकारी संस्था , मानक संस्था आणि उद्योग संस्था यांच्यातील सहकार्य समाविष्ट करण्याचे प्रयत्न केले जातील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. शेवटी, ओपन RAN, तसेच पुढील पिढ्यांमधील दूरसंचार पायाभूत सुविधांसह विश्वसनीय आणि सुरक्षित पुढल्या  पिढीतील दूरसंचार नेटवर्क उपकरणांचे प्रमाणीकरण आणि वापर यात  एकत्र काम करण्याची इच्छा दोन्ही देशांनी व्यक्त केली.

कोविड नंतरच्या काळातील, विशेषतः सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रांसाठीच्या  आर्थिक  सुधारणा

17. भारत आणि अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेसाठी छोटे व्यवसाय आणि उद्योग जीवनवाहिन्यांसारखे आहेत, हे लक्षात घेऊन, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल आणि अमेरिकेच्या वाणिज्य मंत्री रायमोन्डो यांनी या चर्चेत अशी एक अभिनव व्यवस्था उभारण्यावर भर दिला, जी कोविड महामारी नंतरच्या काळात, दोन्ही देशातील लघु उद्योगांना आपले नुकसान भरुन काढत पुन्हा विकास करण्याचे वातावरण निर्माण करुन देईल. भारत आणि अमेरिका या दोन्ही देशात, अनुक्रमे जगातील तिसऱ्या क्रमांकाची आणि सर्वात मोठी स्टार्ट अप व्यवस्था आहे, हे लक्षात घेऊन, दोन्ही मंत्र्यांनी या दोन्ही व्यवस्था, विशेषतः उदयोन्मुख तंत्रज्ञानाच्या देवघेवीसाठी  एकत्रित आणण्यासाठीच्या संधी विकसित करण्यात रुचि दर्शवली.

18. दोन्ही मंत्र्यांनी, याचीही दखल घेतली की, दोन्ही देशात, व्यावसायिक आणि कुशल कामगार, विद्यार्थी गुंतवणूकदार आणि व्यावसायिक पर्यटक यांची सतत होत असलेली भ्रमंती आणि त्यांच्या संबंधित कायदेशीर अवश्यकता ह्या सगळ्या बाबी, भारत-अमेरिकेतील द्विपक्षीय संबंध तसेच आर्थिक आणि तंत्रज्ञानात्मक भागीदारी वृद्धिंगत करण्यात महत्वाचे योगदान देतात. दोन्ही देशात अधिकाधिक प्रवासाला पाठबळ देणे,प्रवास उद्योगाला देखील कोविड काळातील नुकसान भरुन काढण्यासाठी, विशेषतः सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना अधिक लाभ देण्यासाठी उपयुक्त ठरेल, असेही दोन्ही नेत्यांनी यावेळी लक्षात घेतले.

19. याच संदर्भात गोयल आणि रायमोंडो यांनी, व्यावसायिक संवादाअंतर्गत, कौशल्ये, नवोन्मेष आणि एकात्मिक विकास यासाठी नवा कार्यगट सुरु करण्याची घोषणा केली. ह्या कार्यगटाचे नेतृत्व अमेरिकेच्या वाणिज्य मंत्रालयाचे उप सहाय्यक मंत्री आणि भारतीय उद्योग आणि वाणिज्य मंत्रालयाचे सह-सचिव करतील. हा कार्यगट माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञान (आयसीईटी) अंतर्गत होणाऱ्या प्रयत्नांनाही पाठबळ देईल. विशेषतः परस्पर सहकार्यात येणारे अडथळे दूर करणे आणि आपल्या नवोन्मेषी व्यवस्थांमध्ये (टेक-स्टार्ट अप्स सह) अधिक संपर्क निर्माण होईल, यासाठी पोषक वातावरण निर्माण करण्याचे काम हा कार्यगट करेल. याद्वारे संयुक्त उपक्रम राबवण्यासाठी कल्पनाही दिल्या जातील. जसे की, उद्योगांना प्रोत्साहन देणारी, समर्पित सत्रे आणि प्रदर्शने आयोजित करणे, आणि नवे अभिनव प्रयोग ओळखणे आणि त्यांची आयसीईटी आराखड्याअंतर्गत आधीच निश्चित करण्यात आलेल्या प्राधान्यक्षेत्रातील उद्योग जगताच्या गरजांशी त्यांची सांगड घालण्याचे काम करेल. या कार्यगटाच्या पहिल्या बैठकीत व्यावसायिक संवादाचा सहामाहीत आढावा घेतला जाईल, हे ही याचवेळी दोन्ही मंत्र्यांनी निश्चित केले.

20. व्यावसायिक संवादाअंतर्गत, प्रवास आणि पर्यटनविषयक कार्यगटाने केलेल्या कामाची दोन्ही मंत्र्यांनी यावेळी दखल घेतली. दोन्ही देश कोविड-19 महामारीच्या हानीतून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करत आहेत. अशावेळी, कोविड महामारीपूर्वीची प्रगतीची गाथा पुन्हा  सुरु करण्यासाठी तसेच अनेक नवीन आव्हानाचा सामना करत संधी विकसित करण्यासाठी प्रवास आणि पर्यटन कार्यगटही  पुन्हा सुरू करण्याची इच्छा, दोन्ही मंत्र्यांनी व्यक्त केली. यातून प्रवास आणि पर्यटन क्षेत्र तर मजबूत होईलच, शिवाय दोन्ही देशातील प्रवाशांना उत्तम सुविधांचा अनुभव मिळेल.

मानके आणि  त्यांच्याशी अनुरूप सहकार्य

21. तंत्रज्ञानविषयक नियमन, मानके आणि त्या अनुरूप मूल्यांकन प्रक्रिया याविषयी सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रांना सुधारित माहितीची देवघेव आणि संवाद यांची व्यवस्था करुन त्याद्वारे द्विपक्षीय व्यापार अधिक सुलभ करण्याची इच्छा दोन्ही मंत्र्यांनी व्यक्त केली. या व्यावसायिक संवादा अंतर्गत, मानके सहकार्यविषयक स्टँडर्ड्स कोऑपरेशन वर्कस्ट्रीमद्वारे केलेल्या भूतकाळातील कामांची नोंद दोन्ही मंत्र्यांनी घेतली आणि पर्यावरणीय सेवा, स्वच्छ तंत्रज्ञान, आयसीटी, वाहतूक, लॉजिस्टिक्स, औषधनिर्माण, अभियांत्रिकी आणि वस्तू आणि अन्न उत्पादने (सेंद्रिय उत्पादनांसह) यासह विविध क्षेत्रांमध्ये या महत्त्वाच्या क्षेत्रात सतत सहभागाच्या महत्त्वावर सहमती दर्शवली. अमेरिकन व्यापार आणि विकास संस्थेने अर्थसाहाय्य (यूएस ट्रेड अँड डेव्हलपमेंट एजन्सी) केलेल्या यू.एस.-इंडिया स्टँडर्ड्स अँड कॉन्फॉर्मन्स कोऑपरेशन प्रोग्राम (SCCP) च्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्याच्या यशावर आधारीत दोन्ही देशांच्या मंत्र्यांनी, आर्थिक वर्ष 2023-2024 साठी SCCP च्या तिसऱ्या टप्प्याचे उद्घाटन केले. अमेरिका आणि भारत यांच्यातील मानक सहकार्य वाढवण्यासाठी अमेरिकेची ANSI (अमेरिकन नॅशनल स्टँडर्ड इन्स्टिट्यूट) संस्था आणि भारताची BIS (ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स) यांच्यात भागीदारी केली जाईल.

अमेरिका-भारत मुख्य कार्यकारी अधिकारी मंच

22. दोन्ही मंत्र्यांनी, अमेरिका-भारत यांच्यातील उद्योग क्षेत्रांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या मंचाच्या बैठकीचे स्वागत केले. ह्या सीईओ मंचाची पुनर्स्थापनाही नोव्हेंबर 2022 मध्ये करण्यात आली, त्यानंतर ही बैठक आयोजित केली गेली होती. या बैठकीत, सर्व सीईओ सदस्यांच्या द्वीपक्षीय संबंधांबाबत, त्यांच्या धोरणात्मक प्राधान्यांचे आदानप्रदान यावेळी करण्यात आले.

यावेळी दोन्ही बाजूंनी अमेरिका आणि भारतातील सीईओ मंचाच्या सदस्यांनी दिलेली मौल्यवान सेवा आणि समर्पण तसेच दोन्ही सरकारांसाठी त्यांनी केलेल्या संयुक्त शिफारशींची प्रशंसा केली. दोन्ही सरकारे भारत आणि अमेरिकेतील आर्थिक सहकार्य आणि संबंध वाढविण्यासाठी  सीईओ मंचाने केलेल्या शिफारसींचा विचार करत आहेत.

23.अमेरिकेच्या वाणिज्य मंत्री रायमोंडो यांनी भारताच्या जी-20 समूहाच्या अध्यक्षपदाचे आणि, “एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य” या संकल्पनेचे स्वागत केले. विशेषतः व्यापार आणि गुंतवणुकीच्या क्षेत्रात भरीव परिणाम सुनिश्चित करण्यात अमेरिकेला स्वारस्य असल्याचे स्पष्ट केले.  2024 मध्ये वॉशिंग्टन डीसी येथे होणार्‍या पुढील व्यावसायिक संवाद बैठकीविषयी उत्सुक असल्याची भावना दोन्ही मंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली.  पुढच्या  बैठकीत, भारत आणि अमेरिकेमधील वाढत्या धोरणात्मक आणि आर्थिक संबंधांना पाठबळ देणाऱ्या चर्चेचा अजेंडा आणि त्यातून होणारी फलनिष्पत्ती आणखी पुढे नेण्यावर यावेळी सहमती झाली. 

***

Jaydevi/Neelima/Sushama/Radhika/CYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1906264) Visitor Counter : 464


Read this release in: English , Urdu , Hindi