वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

18व्या भारत-ऑस्ट्रेलिया संयुक्त मंत्रीस्तरीय आयोगाचे संयुक्त निवेदन

Posted On: 12 MAR 2023 3:22PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 12 मार्च 2023

 

भारताचे वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल तसेच ऑस्ट्रेलियाचे व्यापार व पर्यटन मंत्री सिनेटर डॉन फॅरेल यांनी आज द्विपक्षीय आर्थिक संबंध अधिक वृद्धिंगत करण्याच्या पुढील उपायांवर चर्चा केली.

उभय मंत्र्यांनी आर्थिक सहकार्य आणि व्यापार कराराची अंमलबजावणी, भारत-ऑस्ट्रेलिया सर्वसमावेशक आर्थिक सहकार्य करारासाठी वाटाघाटी तसेच गुंतवणुकीला चालना देण्याबाबत चर्चा केली. यासह जी-20, हिंद-प्रशांत क्षेत्र आर्थिक आराखडा आणि जागतिक व्यापार संघटनामधील सहभागावरही चर्चा केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पंतप्रधान अँथनी अल्बानीज वाटाघाटींमध्ये वेगवान प्रगती तसेच व्यापार, गुंतवणूक आणि सहकार्याच्या नवीन क्षेत्रांसह आर्थिक सहकार्य व व्यापार कराराने जो पाया रचला आहे, त्याच्या आधारे महत्त्वाकांक्षी सर्वसमावेशक आर्थिक सहकार्य करार लवकर निष्कर्षाप्रत पोहचावा, यासाठी प्रयत्नशील असल्याचे दोन्ही नेत्यांनी नमूद केले. सर्वसमावेशक  आर्थिक सहकार्य करार नवीन रोजगाराच्या संधी निर्माण करेल, जीवनमान उंचावेल आणि दोन्ही देशांमधील जनतेच्या हिताचा ठरेल. हा करार  शक्य तितक्या लवकर पूर्णत्वाला नेण्यासाठी दोन्ही मंत्री उत्सुक असून  विविध द्विपक्षीय तांत्रिक बाजार प्रवेश संबंधी समस्यांचे निराकरण करण्यात होत असलेल्या प्रगतीने समाधानी आहेत आणि यापुढेही सहकार्य सुरु ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

दोन्ही देश आपापली  निव्वळ शून्य उद्दिष्टे साध्य करण्याच्या दिशेने काम करत असून यासाठी  सुलभरीत्या आणि योग्य वेळेत स्वच्छ ऊर्जा संक्रमण महत्त्वपूर्ण असल्याचे  त्यांनी अधोरेखित केले. ऑस्ट्रेलिया आणि भारताची अर्थव्यवस्था परस्परांना पूरक असल्याचे नमूद करत त्यांनी निव्वळ शून्य उत्सर्जन साध्य करण्यासाठी आर्थिक, तंत्रज्ञान, व्यापार आणि गुंतवणूक सहकार्य वृद्धिंगत करण्याप्रती वचनबद्धता दर्शवली.

फॅरेल यांनी भारताच्या जी-20 अध्यक्षपदासाठी ऑस्ट्रेलियाचा भक्कम पाठिंबा असल्याचा पुनरुच्चार केला. शाश्वत विकास उद्दिष्टे साध्य करण्यासाठी प्रगतीला गती देण्यासह, मजबूत, शाश्वत आणि सर्वसमावेशक विकासाकडे पुन्हा वळण्यासाठी जी-20 ने जगाला मदत करणे गरजेचे असल्याबाबत उभय मंत्र्यांनी सहमती दर्शवली.

नवी दिल्लीत हिंद-प्रशांत क्षेत्र आर्थिक आराखडा  वाटाघाटींच्या विशेष फेरीत सिद्ध झाल्याप्रमाणे ऑस्ट्रेलिया आणि भारत या वाटाघाटांबाबत महत्त्वाकांक्षी आहेत; तसेच स्वच्छ अर्थव्यवस्था आणि लवचिक पुरवठा साखळी यासह परस्पर हिताच्या क्षेत्रांमध्ये हिंद-प्रशांत क्षेत्र आर्थिक आराखडाच्या माध्यमातून एकत्र काम करत राहतील यावर त्यांची सहमती झाली.

बहुपक्षीय व्यापार प्रणालीच्या केंद्रस्थानी जागतिक व्यापार संघटना असून, ही प्रणाली महत्वपूर्ण असल्याचा  दोन्ही मंत्र्यांनी पुनरुच्चार केला. त्यांनी जिनिव्हा येथे 12व्या जागतिक व्यापार संघटना मंत्रीस्तरीय परिषदेच्या यशाच्या आधारे पुढे जाण्याबाबत सहमती दर्शवली आणि जागतिक व्यापार संघटनेचे कामकाज सुधारण्यासाठी आणि 2024 पर्यंत पूर्णपणे कार्यरत अशी तंटा निवारण प्रणाली तयार करण्याच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. 2024 मध्ये अबूधाबी येथे होणाऱ्या 13व्या जागतिक व्यापार संघटना मंत्रीस्तरीय परिषदेच्या पार्श्वभूमीवर अधिक सक्रिय सहभागाच्या दिशेने काम करण्याबाबत सहमती दर्शवली.

ऑस्ट्रेलिया आणि भारत हे महत्त्वाचे व्यापार भागीदार असल्याचे दोन्ही मंत्र्यांनी नमूद  केले. गेल्या आर्थिक वर्षात भारत-ऑस्ट्रेलिया द्विपक्षीय व्यापार 31 अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक होता. दोन्ही देशांमधील व्यापाराला पूरक स्थिती लक्षात घेऊन पुढील 5 वर्षांमध्ये द्विपक्षीय व्यापारात लक्षणीय वाढ करण्याची पुरेशी क्षमता असल्याबाबत दोन्ही नेत्यांचे एकमत  झाले.

 

* * *

Shilpa N/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai




(Release ID: 1906099) Visitor Counter : 154