युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय

वाय-20 सल्लामसलत बैठक आणि आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने ‘मोबाईल फिल्म मेकिंग’ वर दोन दिवसांची कार्यशाळा संपन्न


एसआयएमसी, एनएफडीसी आणि पीआयबी यांच्यासंयुक्त विद्यमाने आयोजित कार्यशाळेत ग्रामीण भागातील 25 युवतींना चित्रपट निर्मिती कलेचे मार्गदर्शन

Posted On: 11 MAR 2023 9:40PM by PIB Mumbai

पुणे, 11 मार्च 2023 

 

पुण्यामध्ये लव्हळे येथे सिम्बॉयसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठात(एसआययू) 11 मार्च 2023 रोजी भारत सरकारच्या युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाच्या सहकार्याने चौथ्या वाय20 सल्लामसलत बैठकीचे आयोजन करण्यात आले. केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा आणि माहिती आणि प्रसारणमंत्री अनुराग सिंह ठाकूर या बैठकीच्या उद्घाटन समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

या सल्लामसलत बैठकीचे औचित्य साधून आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यासाठी सिम्बॉयसिस इन्स्टिट्युट ऑफ मीडिया अँड कम्युनिकेशन, पत्र सूचना कार्यालय, मुंबई आणि नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन(एनएफडीसी), माहिती आणि प्रसारण मंत्रालय यांच्या सहकार्याने मोबाईल फिल्म मेकिंग या विषयावरील दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. सिम्बॉयसिस इन्स्टिट्युट ऑफ मीडिया अँड कम्युनिकेशन(एसआयएमसी), लव्हळे येथे 9 आणि 10 मार्च 2023 रोजी या दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन झाले.

   

एनएफडीसीचे संचालक  के श्रीधर अय्यंगार यांनी आपल्या संस्थेमधील तज्ञांच्या चमूच्या मदतीने 18-35 या वयोगटातील 25 महिलांना या कार्यशाळेत या संदर्भात मार्गदर्शन केले. या युवती पुण्याजवळच्या ग्रामीण भागातल्या असून त्यांना सिम्बॉयसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाने आपल्या आऊटरिच कार्यक्रमांतर्गत दत्तक घेतले आहे. सिम्बॉयसिस स्टुडियोमध्ये ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली. 

   

कार्यशाळेच्या पहिल्या दिवशी, सहभागींना चित्रपट निर्मितीच्या आकर्षक जगाची झलक पाहायला मिळाली आणि त्यांनी मोबाईल फोनवर चित्रपट निर्मितीचे प्रशिक्षण घेतले. सिम्बायोसिसच्या अत्याधुनिक स्टुडिओमध्ये, चित्रपट निर्माते के.एस. श्रीधर अय्यंगार यांच्या मार्गदर्शनाखाली, भारतीय चित्रपट विकास महामंडळाच्या (एनएफडीसी) तज्ञांनी  सहभागींना चित्रपट निर्मितीच्या कलेबद्दल सैद्धांतिक माहिती दिली. प्रशिक्षकांनी सहभागींना चित्रीकरण, व्हिडिओ संपादन, ध्वनी संपादन आणि चित्रपट निर्मिती यासह इतर गोष्टी शिकवल्या.

  

कार्यशाळेच्या दुसर्‍या दिवशी, प्रशिक्षकांनी सहभागींचे गट तयार केले. प्रत्येक गटाने लघुपटासाठी एक विषय निवडला. त्यानंतर सहभागींनी एनएफडीसी च्या चमूच्या मार्गदर्शनाखाली लघुपट चित्रित केला आणि त्याचे संपादन केले. या चित्रपटांचे संपादन मोबाईल फोनवर करण्यात आले. दोन दिवस चाललेल्या या कार्यशाळेचा समारोप सहभागी चित्रपटांच्या प्रदर्शनाने झाला. प्रत्येक चित्रपटावर एनएफडीसी च्या चमूने त्यांचा अभिप्राय दिला. सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय (डीम्ड) विद्यापीठाच्या प्र-कुलगुरू डॉ. विद्या येरवडेकर यांच्या हस्ते सहभागाचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. डॉ.विद्या यांनी कार्यशाळेत सहभागी झालेल्या महिलांनी  घेतलेल्या परिश्रमांबद्दल त्यांचे  अभिनंदन व प्रशंसा केली, आणि कार्यशाळेत शिकलेल्या कौशल्यांचा त्या भविष्यातही उपयोग करतील, अशी आशा व्यक्त केली.

गेल्या काही वर्षांमधील महिला सक्षमीकरणाचा अर्थ, विवाहाचा सामाजिक संदर्भ यासारख्या महत्वाकांक्षी विषयांची निवड करून, सहभागींनी चित्रपटांच्या माध्यमातून आपले विचार मांडले. युवा महिलांनी या संपूर्ण उपक्रमाचा मनसोक्त आनंद घेतला, आणि या दोन दिवसीय कार्यशाळेने सहभागींना सृजनशीलतेचा प्रयोग करण्याची आणि चित्रपट निर्मितीची गुंतागुंतीची प्रक्रिया आणि तंत्र शिकण्याची संधी दिली.

 

* * *

PIB Mumbai | JPS/S.Patil/R.Agashe/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1906006) Visitor Counter : 152


Read this release in: Kannada , English , Urdu , Hindi