सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय
मध्य प्रदेशात भोपाळ येथे भोपाळ हाटमध्ये 12 ते 21 मार्च 2023 दरम्यान आयोजित होणार 10 दिवसांचा दिव्य कला मेळा
21 राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांमधील सुमारे 150 दिव्यांग कारागीर/कलाकार आणि उद्योजक घडवणार त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण उत्पादनांचे आणि कौशल्याचे दर्शन
Posted On:
11 MAR 2023 3:20PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 11 मार्च 2023
अपंगत्व(दिव्यांग) असलेल्या व्यक्तींचा सक्षमीकरण विभाग मध्य प्रदेशात भोपाळ येथे भोपाळ हाटमध्ये 12 ते 21 मार्च 2023 दरम्यान देशभरातील दिव्यांग उद्योजक/ कारागीर यांची उत्पादने आणि कारागिरी यांचे दर्शन घडवणाऱा एक वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम आयोजित करत आहे. जम्मू आणि काश्मीर, ईशान्येकडील राज्यांसह देशाच्या विविध भागातील हस्तकला, हातमाग, भरतकाम आणि पाकिटबंद पदार्थ यांच्यासह अनेक आकर्षक उत्पादने या मेळ्यामध्ये मांडण्यात येणार असल्याने या मेळ्याला भेट देणाऱ्या अभ्यागतांसाठी हा कार्यक्रम मनोहारी अनुभव देणारा असेल.
21 राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांमधील सुमारे 150 दिव्यांग कारागीर/कलाकार आणि उद्योजक त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण उत्पादनांचे आणि कौशल्याचे दर्शन घडवतील. या उत्पादनांमध्ये मुख्यत्वे गृहसजावट आणि जीवनशैली, वस्त्रप्रावरणे, स्टेशनरी आणि पर्यावरण स्नेही उत्पादने, पाकिटबंद खाद्यपदार्थ आणि सेंद्रीय उत्पादने, खेळणी आणि भेटवस्तू, वैयक्तिक वापराच्या वस्तू-दागिने, क्लच बॅग्ज या श्रेणींचा समावेश असेल. सर्वांसाठी ही ‘व्होकल फॉर लोकल’ होण्याची एक संधी असेल आणि दिव्यांग कारागिरांनी त्यांच्या अतिरिक्त निर्धाराने तयार केलेली उत्पादने येथे पाहता आणि खरेदी करता येतील.
हा दहा दिवसांचा ‘दिव्य कला मेळा’ सकाळी 11 ते रात्री 9 या वेळेत सुरू राहील आणि या काळात प्रसिद्ध व्यावसायिक कलाकारांच्या सोबतीने दिव्यांग कलाकारांच्या कार्यक्रमांसह विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात येईल. तसेच भेट देणाऱ्या अभ्यागतांना देशाच्या विविध प्रदेशातील त्यांच्या आवडीच्या पदार्थांचा देखील आनंद घेता येईल.
मध्य प्रदेशचे राज्यपाल मंगूभाई पटेल यांच्या हस्ते 12 मार्च रोजी संध्याकाळी 5 वाजता केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री वीरेंद्र कुमार आणि राज्यमंत्री कुमारी प्रतिमा भौमिक यांच्या उपस्थितीत या कार्यक्रमाचे उद्घाटन होईल. या संकल्पनेला प्रोत्साहन देण्याची विभागाची खूप मोठी योजना असून याचाच एक भाग म्हणून दिव्य कला मेळा दरवर्षी आयोजित करण्यात येणार आहे आणि ते दिल्ली आणि मुंबईपुरते मर्यादित न राहता संपूर्ण देशभरात आयोजित केले जाणार आहेत.
* * *
S.Kane/S.Patil/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1905874)