संरक्षण मंत्रालय

नौदल कमांडर्स परिषद 23/1 - पूर्वपिठीका


पहिला टप्पा समुद्रात आय एन एस विक्रांतवर आयोजित होणार

स्वदेशी विमानवाहू नौकेवर संरक्षण मंत्री नौदल कमांडर्सना संबोधित करणार

Posted On: 05 MAR 2023 11:56AM by PIB Mumbai

 

नौदल कमांडर्स परिषद 2023 च्या पहिल्या टप्प्याला 06 मार्च 23 रोजी सुरूवात होणार आहे. ही परिषद नौदल कमांडर्ससाठी लष्करी-सामरिक पातळीवर सुरक्षेच्या महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी तसंच वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांशी संस्थात्मक स्तरावर संवाद साधण्यासाठी एक व्यासपीठ म्हणून काम करते.

नौदल कमांडर्स कॉन्फरन्सचा पहिला टप्पा समुद्रात आयोजित करण्यात आला असून या वर्षीच्या परिषदेचं वैशिष्ट्य म्हणजे प्रथमच भारताची पहिली स्वदेशी विमानवाहू नौका, आय एन एस विक्रांत जहाजावर ही परिषद होणार आहे. परिषदेच्या पहिल्या दिवशी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आय एन एस विक्रांतच्या नौदल कमांडर्सना संबोधित करतील. संरक्षण कर्मचारी प्रमुख आणि भारतीय लष्कर, भारतीय हवाई दल प्रमुख पुढचे काही दिवस नौदल कमांडर्सशी संवाद साधतील आणि देशाचं संरक्षण आणि भारताच्या राष्ट्रीय हितासाठी समन्वय आणि तत्परता साधण्याच्या हेतूने या तिन्ही सेवांमध्ये सामायिक क्रियान्वयन वातावरण आणि त्रि-सेवा वाढवण्याच्या मार्गांवर लक्ष केंद्रित करतील. कार्यान्वयनाचा भाग म्हणून पहिल्या दिवशी समुद्रात एक कार्य प्रात्यक्षिक देखील होणार आहे.

नौदल कर्मचारी प्रमुख इतर नौदल कमांडरसह भारतीय नौदलाने गेल्या सहा महिन्यांत हाती घेतलेलं प्रमुख कार्यान्वयन, युद्धसामग्री, व्यूहशास्त्र, मानव संसाधन विकास, प्रशिक्षण आणि प्रशासकीय उपक्रमांचा आढावा घेतील आणि महत्त्वाच्या उपक्रमांसाठी भावी योजनांवर विचारविनिमय करतील. परिषदेदरम्यान, नौदल कमांडर्सना 22 नोव्हेंबर रोजी भारतीय नौदलात कार्यान्वित करण्यात आलेल्या 'अग्निपथ योजने' बाबत अध्ययावत माहिती सुद्धा दिली जाईल.

(भारतीय सशस्त्र दलातील महिला अग्निवीरांचा समावेश असलेली अग्निवीरांची पहिली तुकडी मार्च 2023 च्या अखेरीस आय एन एस चिल्का येथून उत्तीर्ण होऊन बाहेर पडणार आहे).

प्रदेशातील प्रचलित भौगोलिक-सामरिक परिस्थितीमुळे परिषदेला स्वतःचं महत्त्व आणि समयोचितता प्राप्त झाली आहे. भारताच्या वाढत्या सागरी हितसंबंधांच्या अनुषंगाने गेल्या काही वर्षांमध्ये नौदलाने आपल्या मोहिमांमध्ये लक्षणीय वाढ नोंदवली आहे. आपल्या सागरी हितसंबंधांसमोरच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी नौदलाच्या कार्यदक्षतेबाबतही यावेळी उपस्थित अधिकारी विचारविनिमय करतील. भारतीय नौदल युद्धतत्पर, विश्वासार्ह, एकसंध आणि भविष्यकालीन समस्यांना तोंड देण्यासाठी सज्ज असण्यावर सातत्यानं लक्ष केंद्रित करत असून देशाच्या सागरी सुरक्षेची हमी वाहणारा या नात्याने आपल्या कटिबद्धतेचं कर्तव्यदक्षतेनं पालन करत आहे.

***

S.Thakur/S.Naik/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1904337) Visitor Counter : 193


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil , Telugu