माहिती आणि प्रसारण मंत्रालय
सीबीसी गोवातर्फे आयोजित आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्षावरील मल्टिमीडिया प्रदर्शनाचा समारोप
प्रदर्शनात विद्यार्थ्यांच्या भरड धान्य पाककृतींनी अभ्यागतांची जिंकली मने
Posted On:
03 MAR 2023 6:09PM by PIB Mumbai
पणजी 3 March 2023
आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्षानिमित्त सेंट्रल ब्युरो ऑफ कम्युनिकेशन, गोवातर्फे आयोजित मल्टीमीडिया प्रदर्शनाचा आज समारोप झाला. चार दिवस चाललेल्या या प्रदर्शनाला उत्साहवर्धक प्रतिसाद मिळाला. प्रदर्शनाला शेकडो अभ्यागतांनी भेट दिली. प्रमुख आकर्षणांमध्ये भरड धान्यावरील माहितीपूर्ण व्हिडिओ आणि प्रतिमा, आयसीएआर -केंद्रीय तटीय कृषी संशोधन संस्थेचा स्टॉल आणि भरड धान्य पाककृती स्पर्धा यांचा समावेश होता.
गोवा कृषी महाविद्यालयातील 40 हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतल्याने पाककृती स्पर्धा अटीतटीची ठरली. ग्लूटेन फ्री ज्वारीच्या केकच्या पाककृतीसाठी प्रीती नाईकने प्रथम पारितोषिक पटकावले तर रिया वाझने नाचणीपासून बनवलेल्या तिळा/टिझन या गोव्याच्या नाश्त्याच्या खिरीसारख्या पाककृतीसाठी द्वितीय क्रमांक पटकावला. भरड धान्यांपासून केलेल्या वैविध्यपूर्ण पाककृती सहभागी आणि अभ्यागत दोघांसाठी नवा वाव देणाऱ्या ठरल्या.
नेव्हिल अल्फोन्सो, संचालक, कृषी संचालनालय, गोवा सरकार, या प्रदर्शनात सहभागी झाले होते. भरड धान्यांचा दैनंदिन आहारात समावेश करण्याचे महत्त्व त्यांनी विस्तृतपणे सांगितले. त्यांनी गोव्यामध्ये भरड धान्यांच्या लागवडीचा विस्तार करण्यासाठी कृषी विभागाकडून उचलल्या जाणार्या उपाययोजनांची माहिती दिली. आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष भव्यपणे साजरे करण्याचे राज्य सरकारचे नियोजन आहे त्यामुळे लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे हे विभागाचे प्राधान्य क्षेत्र आहे,असे त्यांनी सांगितले.
प्रदर्शनाचे उद्घाटन निधीन वलसन, पोलीस अधीक्षक, उत्तर गोवा, यांच्या हस्ते करण्यात आले. ते ट्रायथलॉन खेळाडू असून कर्करोगातून बरे झालेले आहेत. आरोग्यपूर्ण भविष्यासाठी प्रत्येकाने आहारात भरड धान्याचा समावेश करावा,असे आवाहन निधीन वलसन यांनी केले . स्वतःच्या आरोग्यातील बदलासाठी रात्रीच्या दैनंदिन जेवणातील अविभाज्य पदार्थ असलेले रागी माल्ट डिनर कसे उपयुक्त ठरले ते त्यांनी सांगितले. डॉ. प्रवीण कुमार, संचालक आयसीएआर-केंद्रीय तटीय कृषी संशोधन संस्था यांनी भरड धान्य लागवडीसाठी कशी सुलभ आहेत,ते विशद केले.
आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष साजरे करण्याच्या भारत सरकारच्या वर्षभराच्या उत्सवाचा एक भाग म्हणून हे चार दिवसांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते.
प्रदर्शनातील फोटो येथे पाहता येतील
आंतरराष्ट्रीय भरड धान्याविषयी
भारतीय उपखंडात पिकवली आणि खाल्ली जाणारी भरड धान्य ही पारंपारिक धान्ये आहेत. भरड धान्य ही तृण कुटुंबातील लहान-दाणेदार, वर्षभर येणारी, उबदार हवामानातील तृणधान्ये आहेत. इतर लोकप्रिय तृणधान्यांच्या तुलनेत त्यांना पाऊस कमी लागतो, तसेच जमीनही फार सुपीक नसली तरी चालते. सध्या 130 हून अधिक देशांमध्ये भरड धान्य पिकवली जात असल्याने आशिया आणि आफ्रिकेतील अर्धा अब्जाहून अधिक लोकांसाठी भरड धान्य पारंपरिक अन्न मानले जाते. भारताच्या प्रस्तावानंतर संयुक्त राष्ट्रांनी 2023 हे आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष घोषित केले आहे. जागतिक कृषी खाद्य प्रणालींना सतत वाढणाऱ्या जागतिक लोकसंख्येला पोसण्यासाठी आव्हानांचा सामना करावा लागत असल्याने, भरड धान्य एक किफायतशीर आणि पौष्टिक पर्याय देतात. त्यांच्या लागवडीला चालना देण्यासाठी प्रयत्न वाढवणे आवश्यक आहे. एप्रिल 2018 मध्ये, भरड धान्य "न्यूट्री सीरिअल्स" म्हणून रिब्रँड करण्यात आली ,त्यापाठोपाठ मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन आणि मागणी निर्माण करण्याच्या उद्देशाने 2018 हे वर्ष राष्ट्रीय भरड धान्य वर्ष म्हणून घोषित करण्यात आले. 2021-2026 दरम्यानच्या अनुमानित कालावधीत जागतिक भरड धान्य बाजार 4.5% सीएजीआर(चक्रवाढ वार्षिक विकास दर) नोंदवतील असा अंदाज आहे.
***
S.Bedekar/S.Kakade/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1904061)
Visitor Counter : 120