संरक्षण मंत्रालय
भारतीय नौदलासाठी बाय (इंडियन-आयडीडीएम) श्रेणी अंतर्गत 3,100 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या तीन कॅडेट प्रशिक्षण जहाजांच्या निर्मितीसाठी लार्सन अँड टुब्रो लिमिटेड (एल अँड टी) बरोबर करार करण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
प्रविष्टि तिथि:
01 MAR 2023 8:39PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 1 मार्च 2023
केंद्रीय मंत्रिमंडळाने बाय {इंडियन-आयडीडीएम (स्वदेशी बनावटीच्या, विकसित आणि उत्पादित) } श्रेणी अंतर्गत, तीन कॅडेट ट्रेनिंग (जवानांच्या प्रशिक्षणासाठी) जहाजांच्या खरेदीसाठी लार्सन अँड टुब्रो लिमिटेड (एल अँड टी) बरोबर करार करायला मंजुरी दिली आहे. यासाठी एकूण 3,108.09 कोटी रुपये खर्च होणार आहे. जहाजांचा पुरवठा 2026 पासून सुरु होणार आहे.
भारतीय नौदलाच्या भविष्यातील गरजा पूर्ण करण्यासाठी ही जहाजे महिला अधिकाऱ्यांसह सर्व कॅडेट्सच्या मूलभूत प्रशिक्षणानंतर त्यांना समुद्रात प्रशिक्षण देतील. राजनैतिक संबंध मजबूत करण्याच्या उद्देशाने या जहाजांवर मित्र देशांच्या कॅडेट्सनाही प्रशिक्षणही दिलं जाईल. ही जहाजे आपत्कालीन परिस्थितीत माणसांच्या सुटकेसाठी आणि मानवतावादी सहाय्य आणि आपत्ती निवारणाच्या (HADR) कामासाठी देखील तैनात केली जातील.
ही जहाजे स्वदेशी बनावटीची आणि देशात बनवलेली असतील. चेन्नई मधील कट्टुपल्ली इथल्या एल अँड टी शिपयार्डमध्ये त्यांची बांधणी केली जाईल. या प्रकल्पामुळे साडेचार वर्षांच्या कालावधीत 22.5 लाख मानवी- दिवसांचा रोजगार निर्माण होईल. एमएसएमईसह भारतीय जहाजबांधणी आणि संबंधित उद्योगांच्या सक्रिय सहभागाला तो प्रोत्साहन देईल. या जहाजांवरील बहुतेक सर्व उपकरणे आणि प्रणाली स्वदेशी उत्पादकांकडून पुरवली असल्यामुळे, सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाच्या अनुषंगाने ही जहाजे ‘आत्मनिर्भर भारता’चा ध्वज अभिमानाने वाहून नेतील.
S.Bedekar/R.Agashe/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1903493)
आगंतुक पटल : 216