रसायन आणि खते मंत्रालय
केंद्रीय रसायन आणि खते मंत्री डॉ. मनसुख मांडविय यांनी जनौषधी रथाला हिरवा झेंडा दाखवून जनौषधी जन चेतना अभियानाचा केला प्रारंभ
Posted On:
01 MAR 2023 7:24PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 1 मार्च 2023
केंद्रीय रसायन आणि खते मंत्री डॉ मनसुख मांडविय यांनी आज नवी दिल्ली येथे जनौषधी जन चेतना अभियानाची सुरुवात जनौषधी रथाला हिरवा झेंडा दाखवून केली. आजपासून देशभरात पाचव्या जनौषधी मोहिमेची सुरुवात झाली आहे.
सध्या जनौषधी सप्ताह पाळला जात असून त्यापाठोपाठ 7 मार्च 2023 रोजी जनऔषधी दिन साजरा करण्यात येणार आहे. या सप्ताहात जनौषधींबद्दल जनजागृती करण्यावर भर दिला जाणार आहे, असे मांडविय यांनी सांगितले. देशभरातील जनौषधी केंद्रांवर स्वस्त आणि दर्जेदार औषधे उपलब्ध आहेत, ही केंद्रे महिलांना केवळ 1 रुपये प्रति पॅड या किमतीत सॅनिटरी पॅड उपलब्ध करून देत आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. जनौषधी केंद्र कोणतीही व्यक्ती वैयक्तिक पातळीवर, खाजगी रित्या सुरू करू शकते, त्याला 20% कमिशन दिले जाते. त्यामुळे त्याला फक्त रोजगाराचेच नाही तर सेवेचे माध्यमही उपलब्ध होते, असे ते म्हणाले.
औषधनिर्माण विभागाने 1 ते 7 मार्च 2023 या कालावधीत विविध शहरांमध्ये जन औषधी योजनेबाबत जनजागृती करण्यासाठी विविध कार्यक्रमांचे नियोजन केले आहे.
प्रधानमंत्री भारतीय जनौषधी परियोजने (पीएनबीजेपी) अंतर्गत उपलब्ध औषधांची किंमत ब्रँडेड किमतींपेक्षा 50%-90% कमी आहे. 2021-22 या आर्थिक वर्षात या योजनेअंतर्गत 893.56 कोटी (किमान किरकोळ मूल्य एमआरपी वर) रुपयांची विक्री झाली आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांची अंदाजे 5360 कोटी रुपयांची बचत झाली आहे.. गेल्या 8 वर्षात देशातील जनतेला स्वस्त दरात दर्जेदार औषधे उपलब्ध करून देवून, या योजनेनं अतुलनीय यश मिळवले आहे. औषधांच्या किमतीवर खर्च होणारे नागरिकांचे 20,000 कोटी रूपये त्यामुळे वाचले आहेत. लोकांनी मोठ्या प्रमाणात दिलेल्या प्रतिसादामुळे या योजनेची व्याप्ती देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत वाढविण्यासाठी आणखी चालना मिळाली आहे.
S.Bedekar/P.Jambhekar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1903460)
Visitor Counter : 177