आयुष मंत्रालय
आसामधील काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात आयुष मंत्रालय आयोजित करणार पहिले चिंतन शिबिर
दोन दिवसांच्या या शिबिरात विविध विषयांवर होणाऱ्या चर्चा आणि विचार विमर्शामध्ये प्रख्यात वक्ते आणि तज्ज्ञ सहभागी होणार
Posted On:
25 FEB 2023 2:22PM by PIB Mumbai
आयुष मंत्रालय 27 ते 28 फेब्रुवारी 2023 दरम्यान आसाममधील काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात दोन दिवसीय चिंतन शिबिर आयोजित करणार आहे. केंद्रीय आयुष मंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्यासह आयुषचे राज्यमंत्री डॉ. मुंजापारा महेंद्रभाई उद्घाटन सत्राला उपस्थित राहतील. प्रख्यात वक्ते, तज्ञ, आयुष मंत्रालयाचे अधिकारी आणि इतर मान्यवर देखील चिंतन शिबिरात सहभागी होणार आहेत. आयुष क्षेत्र आणि पारंपरिक औषधांशी संबंधित विद्यमान धोरणे आणि कार्यक्रमांच्या अंमलबजावणीमध्ये भविष्यातील सुधारणांवर चर्चा करण्यासाठी या शिबिराची रचना करण्यात आली आहे. मंत्रालय आणि संपूर्ण आयुष क्षेत्र या दोघांसाठी भविष्यातील एक मार्ग शोधणे हे या शिबिराचे उद्दिष्ट आहे.
आयुष मंत्रालय, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, शिक्षण मंत्रालय, आसाम सरकार, निती-आयोग, उद्योग, स्टार्टअप्स, अकादमी यांचे नामवंत वक्ते आणि तज्ञांची पॅनेल चर्चा या शिबिरात होईल. त्याचबरोबर इतर आयुष भागधारकांची संवाद सत्रेही होतील.
“आयुषमधील डिजिटल आरोग्य आणि तंत्रज्ञान” या विषयावर 27 फेब्रुवारी रोजी पहिले सत्र होईल. त्याच दिवशीच्या दुसऱ्या सत्रात “आयुष संशोधन, भविष्यातील रणनीती, आव्हाने आणि पुढे जाण्याचा मार्ग” या विषयावर चर्चा होणार आहे. तिसर्या सत्रात आयुष शिक्षण ‘भविष्यातील उपक्रम’- क्षमता बांधणी, रोजगार निर्मिती आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरण याबद्दल प्रख्यात वक्ते बोलतील.
आयुष औषध उद्योगातील सध्याची आव्हाने आणि पुढे जाण्याचा मार्ग, सेवा आणि आयुष उत्पादनांचे मानकीकरण या संकल्पनेवर दुसऱ्या दिवशी चर्चा होईल. जगाच्या तुलनेत आयुष बाजारपेठेतील भारताच्या विकासाचा वेग वाढला असून जागतिक बाजारपेठेत भारताचा या क्षेत्रातील वाटा सुमारे 2.8 टक्के असल्याने हे सत्र अत्यंत महत्त्वाचे आहे. पुढील सत्र सार्वजनिक आरोग्यात आयुषचे योगदान, आव्हाने आणि भविष्यातील उपाययोजना या विषयावर असेल.
आयुष स्टार्टअप्स आणि उत्पादकांना आयुषमध्ये स्टार्टअप परिसंस्था तयार करण्यासाठी प्रोत्साहन देण्याचे मार्ग ओळखणे हा या शिबिराचा उद्देश आहे. आयुषसाठी अधिक सखोल संशोधन आणि विकास पायाभूत सुविधा निर्माण करण्याच्या दिशेने काम करण्यावरही या शिबिरात भर दिला जाईल. "चिंतन शिबिरातील विचारविमर्श करण्यासाठीचे विषय आयुष मंत्रालयाने अमृतकाल लक्षात घेऊन तयार केलेल्या दृष्टीकोनाच्या अनुषंगाने आहेत. काझीरंगा राष्ट्रीय उद्यानाच्या शांत वातावरणात चर्चासत्रांबरोबर इतर अनेक पूरक उपक्रम, सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असेल. सहभागींना आसामच्या परंपरा, संस्कृती, वन्यजीव आणि जैवविविधतेचा प्रत्यक्ष अनुभव घेता येणार आहे. हा अतिरिक्त फायदा म्हणता येईल.
भारत सध्या जी 20 देशांचे आणि शांघाय सहकार्य संघटनेचे (एससीओ) अध्यक्षपद भूषवत आहे. आयुष प्रणालींमध्ये आरोग्यविषयक कल बदलत असताना या दोन महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय घटना होत आहेत. बरेच लोक सर्वांगीण आरोग्य सेवा निवडत आहेत. या परिस्थितीवर आधारित आणि आयुष प्रणालींना समोर आणण्यासाठी, आयुष संस्थांमध्ये सुधारणा घडविण्यासाठी आणि तांत्रिक प्रगतीशी ताळमेळ तसेच मार्ग निश्चित करण्यासाठी हे शिबिर आयोजित केले जात आहे.
आयुषला नवीन शैक्षणिक धोरणाशी जोडण्यासाठी तसेच सुधारणांची शक्यता असलेल्या सध्याच्या आयुष सेवा कुठल्या हे ठरवणे हाही शिबिरा मागचा एक हेतू आहे.
सार्वजनिक आरोग्य सुधारण्यासाठी रोड मॅप, तांत्रिक प्रगतीचा जास्तीत जास्त वापर आणि इतर पूरक लाभ ही चिंतन शिबिरातील चर्चेची अपेक्षित फलनिष्पत्ती आहे.
***
M.Jaybhaye/P.Jambhekar/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1902261)