वस्त्रोद्योग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

मोठ्या प्रमाणावर व्याप्ती, गुणवत्ता, गती आणि उत्पादनावर लक्ष केंद्रित करा : टेक्नोटेक्स 2023 च्या मुख्य सत्रात केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री पीयूष गोयल यांचे तांत्रिक वस्त्रोद्योग क्षेत्राला आवाहन


तांत्रिक वस्त्रोद्योग भविष्यातील आशादायी उद्योग, जर आपण या उद्योगक्षेत्रातील विविध बारकावे दाखवू शकलो, तर भारतीय तांत्रिक वस्त्रोद्योग बाजारपेठ 12 टक्क्यांपेक्षाही अधिक वेगाने वाढेल: केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री

दोन वर्षात दोन लाख लोकांना प्रशिक्षित करा: तांत्रिक वस्त्रोद्योगातील मनुष्यबळाच्या कौशल्यवृद्धीसाठी वस्त्रोद्योग मंत्र्यांनी निश्चित कालावधीचे उद्दिष्ट दिले

वर्ष 2025-26 पर्यंत भारतातील वस्त्रोद्योग बाजारपेठ 40 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचवण्याचे भारताचे उद्दिष्ट

Posted On: 24 FEB 2023 3:32PM by PIB Mumbai

मुंबई, 24 फेब्रुवारी 2023

भारतीय वस्त्रोद्योगाने आता, आपली व्याप्ती गुणवत्ता, गती आणि उत्पादन वाढवण्यावर भर देण्याची वेळ आली आहे, असे प्रतिपादन केंद्रीय वस्त्रोद्योग, वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी केले. टेक्नोटेक्स 2023: भारतीय तंत्रज्ञान वस्त्रोद्योगाची @2047 पर्यंतची प्रगती’ या प्रमुख सत्रात ते बोलत होते. मुंबईत आज गोरेगाव इथं बॉम्बे एक्झिबीशन सेंटरला दहाव्या आंतरराष्ट्रीय तंत्रज्ञान वस्त्रोद्योग परिषद आणि प्रदर्शनादरम्यान हे सत्र झाले.

“वृद्धी, गती आणि उत्पादन वाढवून, जागतिक बाजारपेठ काबिज करण्याची हीच योग्य वेळ”

जागतिक बाजारपेठ काबिज करण्याची हीच योग्य वेळ आहे, असे पीयूष गोयल म्हणाले.”आता आपण आपली व्याप्ती वाढवायला हवी आणि अधिक सर्वसमावेशक प्रकल्प उभारणे, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, याकडे आपण लक्ष देण्याची गरज आहे. जेणेकरून, जगभरातील कॉर्पोरेट खरेदीदारांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आपण सक्षम होऊ शकू.  अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्या मला सांगतात की त्यांना उत्तम दर्जाची उत्पादने मोठ्या प्रमाणात देणारे कोणी पुरवठादार मिळतच नाहीत, खरे तर अनेक कंपन्यांना भारतासारख्या लोकशाही असलेल्या आणि पारदर्शक नियमाधारीत व्यवस्था असलेल्या देशांशी व्यवसाय करायला आवडेल”, असे गोयल म्हणाले. याच संदर्भात, ते पुढे म्हणाले, “म्हणूनच आपण आता आपल्या व्यवसायवृद्धीकडे आणि गती कडे लक्ष द्यायला हवे. जगाची बाजारपेठ काबिज करण्याची हीच योग्य वेळ आहे. आंतरराष्ट्रीय व्यवसायिक बनण्याचे उद्दिष्ट ठेवून त्या दिशेने जायला हवे, जागतिक पुरवठा साखळीत एकात्मिक भूमिका न पार पाडता, कोणताही देश विकसित देश होऊ शकत नाही, म्हणूनच आपल्याला देशाची अर्थव्यवस्था त्या विकसित देशांशी संलग्न करावी लागेल, तरच, आपण आपल्या संपूर्ण क्षमतांचा वापर करु शकू आणि आपल्या युवाशक्तीच्या अपेक्षा पूर्ण करु शकू.”

“जागतिक बाजारपेठेत भारताचा वाटा सुमारे 2.5% आहे; मला विश्वास आहे की जर आपण आपले हेतू नीटपणे जगासमोर आणले तर या क्षेत्रातील  भारतीय बाजारपेठ 12% पेक्षा जास्त वेगाने वाढेल.” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मला विश्वास आहे की भारतीय बाजारपेठ 12% पेक्षा जास्त वेगाने वाढेल जर आपण त्याचे उद्दिष्ट दाखवू शकलो.

या परिषदेत सहभागी झालेल्या भागीदारांनी, मोठे आणि धाडसी होण्याची ही वेळ आहे  असे सांगत, गोयल यांनी विश्वास व्यक्त केला की  आपण तंत्रज्ञान वस्त्रोद्योग क्षेत्रात, 200 अब्ज डॉलर्सपर्यंत व्यवसाय मोठा करु शकतो.

“भारताच्या जी-20 अध्यक्षपदाच्या संधीचे सोने करा”

भारताच्या जी-20 च्या अध्यक्षपदाचा विचार करता तांत्रिक वस्त्रोद्योग आणि एकूणच वस्त्रोद्योगाला G20 बैठकींद्वारे मिळणाऱ्या संधींचा लाभ घेण्यासाठी मित्र देशांसोबत व्यवसाय करण्याच्या संधी शोधण्यास सांगितले. उद्योगाच्या प्रगतीचा मार्ग म्हणून पंतप्रधानांनी स्वीकारलेल्या फार्म टू फायबर टू फॅक्टरी ते फॅशन ते फॉरेन (शेती ते तंतुमय पदार्थ ते फॅक्टरी ते फॅशन ते परदेशी व्यापार अशा पंचतत्वांचे त्यांनी स्मरण केले.

“येत्या दोन वर्षात दोन लाख लोकांना प्रशिक्षित करा”

वस्त्रोद्योग मंत्रालय राष्ट्रीय तंत्रज्ञान वस्त्रोद्योग अभियानांतर्गत उपलब्ध असलेल्या कौशल्य घटकासह समर्थ (SAMARTH) योजनेनुसार तंत्रज्ञानविषयक प्रशिक्षण देऊ शकते. “उदयोजकांनी या योजनांचा उपयोग करून, उद्योगातील कुशल कर्मचाऱ्यांच्या विकासात योगदान द्यावे असे आवाहन मी करतो.  तांत्रिक वस्त्रोद्योग क्षेत्राने  दर दोन वर्षांनी दोन  लाख मनुष्यबळ प्रशिक्षित करण्याचे उद्दिष्ट निश्चित करावे. तांत्रिक  वस्त्रोद्योग क्षेत्रासाठी मनुष्यबळाच्या या प्रशिक्षणावर देखरेख ठेवण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात येईल,” अशी घोषणाही  गोयल यांनी केली.

आपल्या कारागिरांनी आणि विणकरांनी बनवलेली वस्त्र उत्पादने भेटवस्तू म्हणून देण्याचा विचार करावा, असे आवाहन वस्त्रोद्योग मंत्र्यांनी उपस्थितांना केले.

तांत्रिक वस्त्रोद्योगातील सात बीआयएस मानकांचा संच आणि जागतिक सर्वोत्तम पद्धतींवरील ज्ञान अहवालाचे प्रकाशनही त्यांनी यावेळी केले.

टेक्नोटेक्स प्रदर्शनात सादर केलेल्या उत्पादनांचे प्रदर्शन करणाऱ्या एक्झिबिटर्स कॅटलॉगचे प्रकाशनही त्यांनी केले.

22 फेब्रुवारी 2023 रोजी केंद्रीय वस्त्रोद्योग राज्यमंत्री दर्शना जरदोश यांच्या हस्ते खरेदीदार-विक्रेता बैठक, आंतरराष्ट्रीय प्रदर्शन आणि परिषदेचा समावेश असलेल्या तीन दिवसीय प्रमुख कार्यक्रमाचे उद्घाटन झाले आणि आज समारोप होत आहे. केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालय आणि फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (फिक्की) द्वारे आयोजित या कार्यक्रमाने जागतिक तांत्रिक वस्त्रोद्योग मूल्य साखळीतील भागधारकांमध्ये परस्पर संवादासाठी एक समान व्यासपीठ प्रदान केले आहे.

केंद्र सरकारच्या वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या सचिव रचना शाह यांनीही उपस्थितांना  मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या की, वस्त्रोद्योग क्षेत्राला चालना देण्यासाठी तांत्रिक वस्त्राशी जोडलेल्या सर्व भागधारकांना विचारपूर्वक एकत्र आणणारं टेक्नोटेक्स हे एक अनोखे व्यासपीठ आहे. त्यांनी सांगितले, “या वर्षी 30 हून अधिक देशांतील 150 हून अधिक प्रदर्शक आणि 250 हून अधिक खरेदीदारांचा या उपक्रमाला प्रतिसाद मिळाला आणि तो अतिशय उत्साहवर्धक आहे हे समाधानकारक आहे. मला विश्वास आहे की यामुळे व्यवसायाच्या आणि एकत्र काम करण्याच्या अनेक संधी निर्माण झाल्या असतील.” त्यांनी यजमान राज्य महाराष्ट्र आणि भागीदार राज्यांचे आभार मानले.

टेक्नोटेक्स 2023 च्या संकल्पनेवर बोलताना त्या म्हणाल्या की हा उपक्रम भारताला तांत्रिक कापडाचे केंद्र बनवण्याच्या व्यापक दृष्टीकोनावर लक्ष केंद्रित करतो. “जागतिक स्तरावर तांत्रिक कापडाची मागणी वाढत आहे, दोन वर्षांत ती सुमारे 320 अब्ज डॉलर्स होईल, तर 2025-26 पर्यंत 40 अब्ज डॉलर्सचा आकडा गाठण्याची भारताची आकांक्षा आहे. हे एक मोठे काम असले तरी, मला विश्वास आहे की आपण एकत्र काम केले तर ते साध्य करू शकू.”, असेही त्या म्हणाल्या

2047 मध्ये तांत्रिक वस्त्रोद्योगाच्या दृष्टीकोनातून पुढे जाण्यासाठी काय करता येईल याविषयी सात तांत्रिक सत्रे आयोजित करण्यात आली होती, अशी माहिती वस्त्रोद्योग मंत्रालयाचे सहसचिव राजीव सक्सेना यांनी दिली.  सहसचिवांनी दिलेले सादरीकरण येथे पाहता येईल.

उद्योगाचा दृष्टीकोन सादर करताना, फिक्कीच्या राष्ट्रीय कार्यकारी समितीचे सदस्य एच के अग्रवाल म्हणाले की, भारतीय तांत्रिक कापड बाजार दरवर्षी 8%-10% दराने वाढण्याची अपेक्षा आहे. सरकार आणि उद्योग या वाढीचा दर प्रतिवर्षी 15% - 20% पर्यंत वाढवण्यासाठी कठोर परिश्रम करत आहेत.

टेक्नोटेक्स गोलमेज परिषदांमध्ये संरक्षण, कृषी आणि पायाभूत सुविधा यांसारख्या क्षेत्रातील तांत्रिक वस्त्रोद्योगांची गुंतवणूक, स्टार्टअप आणि अनुप्रयोग यावर चर्चा केली जाते. टेक्नोटेक्स च्या 10 व्या परिषदेत तीन दिवसांच्या गोलमेज बैठकांची मालिका होती. भारतीय तांत्रिक वस्त्रोद्योगात गुंतवणुकीच्या सध्या असलेल्या शक्यता आणि संधी या विषयावरील सत्रात नवीन संधींचा फायदा घेणे, भारतात व्यवसाय सुलभता आणणे आणि जलद वाढीस हातभार लावणारी गुंतवणूक सहजसाध्य करणे यावर भर देण्यात आला. तांत्रिक वस्त्रोद्योगामधील स्टार्टअप परिसंस्था सक्षम करणे आणि स्मार्ट टेक्सटाइल्समधील स्टार्ट-अप तंत्रज्ञानाचा लाभ घेणे, तांत्रिक वस्त्रोद्योग स्टार्टअप्सवर लक्ष केंद्रित करणे, त्यांच्या वाढीसाठी सर्वोत्तम पद्धतींबद्दल ज्ञानाची देवाणघेवाण करणे, उद्योजकीय परिसंस्थेला बळकट करणे आणि स्टार्टअप्समध्ये गुंतवणूकीसाठी जागतिक आणि देशांतर्गत भांडवल खेळते ठेवणे हा त्यामागचा हेतू आहे.

S.Kane/Radhika/Prajna/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai
 

 


(Release ID: 1902038) Visitor Counter : 303


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil