संरक्षण मंत्रालय
भारत आणि श्रीलंकेचे संरक्षण सचिव यांनी, नवी दिल्लीत झालेल्या सातव्या वार्षिक संरक्षण संवादादरम्यान घेतला द्विपक्षीय संबंधांचा आढावा; द्विपक्षीय युद्धसराव अधिक जटिल करण्याबाबत सहमती
Posted On:
23 FEB 2023 6:14PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 23 फेब्रुवारी 2023
भारत आणि श्रीलंकेदरम्यान, सातवी वार्षिक संरक्षण विषयक संवाद बैठक आज म्हणजे, 23 फेब्रुवारी 2023 रोजी नवी दिल्लीत झाली. भारताचे संरक्षण सचिव गिरिधर अरमाने आणि श्रीलंकेचे संरक्षण सचिव जनरल कमल गुणरत्ने यांनी संयुक्तपणे बैठकीचे अध्यक्षपद भूषवले. बैठकीदरम्यान, दोन्ही देशांदरम्यान सुरू असलेल्या संरक्षण सहकार्य घडामोडींचा आढावा घेण्यात आला, तसेच दोन्ही देशांमध्ये होत असलेल्या द्विपक्षीय युद्धसरावांची जटिलता वाढविण्यास सहमती दर्शवण्यात आली. दोन्ही बाजूंनी, प्रशिक्षणाच्या संदर्भात, एकमेकांच्या अनुभवाचा आणि क्षमतांचा जास्तीत जास्त लाभ करुन देण्याविषयीची काटिबद्धता व्यक्त केली.
सचिव गिरीधर अरमाने यांनी या फलदायी संवादासाठी जनरल कमल गुणरत्ने आणि त्यांच्या शिष्टमंडळाचे आभार मानले. या संवादात झालेल्या सामायिक सामंजस्याच्या आधारे, भविष्यातही श्रीलंकेसोबत एकत्रित काम करण्यास भारत उत्सुक असल्याचे अरमाने यांनी सांगितले.
भारतीय प्रतिनिधी मंडळात संरक्षण मंत्रालय, एकात्मिक संरक्षण कर्मचारी मुख्यालय, सर्व्हिस हेडक्वार्टर्स आणि परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे अधिकारी यांचा समावेश होता. तर श्रीलंकेच्या शिष्टमंडळात,श्रीलंकेच्या हवाई दलाचे कमांडर एअर मार्शल एसके पाथिराना यांच्यासह इतर वरिष्ठ मान्यवरांचा समावेश होता.
हा वार्षिक संरक्षण संवाद दोन्ही देशांमधील सर्वोच्च संस्थात्मक संवाद व्यवस्था आहे. भारत आणि श्रीलंकेच्या सशस्त्र सेना यांच्यात भविष्यातील संबंधांच्या वाटचालीत या संवादाला विशेष महत्व आहे. दोन्ही देशांच्या सशस्त्र दलांमध्ये अनेक क्षेत्रांत द्विपक्षीय सहकार्य राखण्याचा प्रयत्न सुरू असून उभय देशांमधला वाढता सहभाग द्विपक्षीय संबंधांच्या भविष्यासाठी एक सकारात्मक बाब आहे.
S.Kane/R.Aghor/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1901780)
Visitor Counter : 205