राष्ट्रपती कार्यालय
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत अरुणाचल प्रदेशाचा 37 वा राज्य स्थापना दिन सोहळा संपन्न
प्रविष्टि तिथि:
20 FEB 2023 7:55PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 20 फेब्रुवारी 2023
राष्ट्रपती, द्रौपदी मुर्मू यांनी आज (20 फेब्रुवारी, 2023) अरुणाचल प्रदेशच्या 37 व्या राज्य स्थापना दिन सोहळा आणि इटानगर येथे राज्य सरकारने त्यांच्या सन्मानार्थ आयोजित केलेल्या नागरी सत्काराला उपस्थिती लावली.
600 मेगावॅट क्षमतेचे कामेंग जलविद्युत केंद्र कार्यान्वित झाल्यामुळे अरुणाचल प्रदेश हे अतिरिक्त ऊर्जा असलेले राज्य बनले आहे. असे राष्ट्रपती आपल्या भाषणात म्हणाल्या. अलीकडेच उदघाटन झालेल्या, सर्व प्रकारच्या हवामानाला अनुकूल अशा डोनी पोलो विमानतळामुळे या प्रदेशातील संपर्क तर सुधारेलच पण व्यापार आणि पर्यटनाच्या वाढीसाठी ते लाभदायक ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कोणत्याही समाजाचा विकास हा महिलांच्या विकासाशिवाय होऊ शकत नाही, असे राष्ट्रपती म्हणाल्या. अरुणाचल प्रदेशातील पंचायतींमध्ये सुमारे 47 टक्के महिला प्रतिनिधी आहेत हे जाणून आपल्याला आनंद झाल्याचे त्यांनी सांगितले.
भारतात सूर्याची पहिली किरणे अरुणाचल प्रदेशावर पडतात. अरुणाचल प्रदेश मधील विविध प्रकारचे आदिवासी, त्यांचा सांस्कृतिक वारसा आणि त्यांचे विविधतेतील ऐक्य या गोष्टी आपल्याला प्रेरणा देतात. असे म्हणता येईल की अरुणाचल प्रदेशातील समाज हा भारताची लहानशी प्रतिकृती आहे, असे राष्ट्रपती म्हणाल्या.
पर्वतराजी, घनदाट जंगले, तलाव, धबधबे आणि वनस्पती आणि प्राणी यांनी , विपुल असे हे राज्य जैवविविधतेने समृद्ध आहे, असे राष्ट्रपती म्हणाल्या. कृषी, फलोत्पादन, आरोग्य सेवा आणि पर्यावरण संरक्षण यांसाठी येथील राज्य सरकार ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करत असल्याचे पाहून आनंद झाल्याचे त्यांनी सांगितले. पर्यावरण संवर्धनासाठी या काही महत्वाच्या बाबी असल्याचे त्या म्हणाल्या.
भारताच्या विकासात अरुणाचल प्रदेशसह संपूर्ण ईशान्येकडील भाग महत्वाची भूमिका बजावत आहे, असे त्यांनी सांगितले. जी-20 च्या अनेक बैठका ईशान्येकडील राज्यांमध्येही होत आहेत हे पाहून आनंद झाल्याचे त्या म्हणाल्या. या बैठकांमुळे ईशान्येकडील राज्यांमध्ये संस्कृती आणि पर्यटनाला चालना मिळेल आणि या प्रदेशात गुंतवणुकीच्या संधी निर्माण होतील, असा विश्वास राष्ट्रपतींनी व्यक्त केला.
Please click here to see the President's Speech -
* * *
N.Chitale/B.Sontakke/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1900839)
आगंतुक पटल : 206