वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

पश्चिम आणि मध्य विभागासाठी पीएम गतिशक्ती प्रादेशिक कार्यशाळेचे गोव्यात आयोजन


पीएम गतिशक्तीच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे खाजगी गुंतवणूक आकर्षित करण्यासह उत्पादन, रोजगार आणि वृद्धीदर वाढण्याचे लाभदायी चक्र सुरू होईल : सचिव, उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग

Posted On: 20 FEB 2023 6:15PM by PIB Mumbai

गोवा, 20 फेब्रुवारी 2023

 

पश्चिम आणि मध्य विभागासाठी पहिली पंतप्रधान  गतिशक्ती प्रादेशिक कार्यशाळा आज गोव्यात आयोजित करण्यात आली होती. नियोजनासाठी केंद्रीय मंत्रालये आणि राज्य विभागांद्वारे राष्ट्रीय बृहत योजनेचा अवलंब केल्याच्या उदाहरणांवर या कार्यशाळेत  चर्चा करण्यात आली तसेच  राज्ये आणि केंद्रीय मंत्रालये/विभागांमधील  परस्पर अभ्यासाचे व्यासपीठ म्हणून या कार्यशाळेने   काम केले.  उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागच्या (डीपीआयआयटी ) विशेष सचिव सुमिता डवरा तसेच केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय, केंद्रीय मंत्रालये आणि गुजरात, महाराष्ट्र, गोवा, छत्तीसगड आणि मध्य प्रदेश या राज्य सरकारांचे वरिष्ठ सरकारी अधिकारी यावेळी उपस्थित होते.

पीएम गतिशक्तीच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे खाजगी गुंतवणूक आकर्षित  करण्यासह   उत्पादन, रोजगार आणि वृद्धीदर  वाढण्याचे लाभदायी  चक्र सुरू होईल असे उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागचे सचिव अनुराग जैन यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे या कार्यशाळेला संबोधित करताना सांगितले. आत्मनिर्भर भारताचे उद्दिष्ट साध्य करण्याच्या दृष्टीने देशाला  चालना देण्यासाठी गतिशक्ती राष्ट्रीय बृहत योजना  सुरू करण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले.   बृहत स्तरावरचे नियोजन  आणि सूक्ष्म पातळीवर त्याची अंमलबजावणी यांच्यातील मोठी दरी हे सामान्य माणसाला भेडसावणार्‍या अनेक समस्यांचे मूळ आहे आणि  त्या सोडवण्याच्या दिशेने गतिशक्ती राष्ट्रीय बृहत योजना हे मोठे पाऊल आहे, असे त्यांनी नमूद केले. या मंचाच्या माध्यमातून पायाभूत सुविधा, आर्थिक आणि सामाजिक क्षेत्रातील प्रकल्प/योजनांचे एकात्मिक नियोजन, समायोजित  अंमलबजावणी आणि देखरेख सुनिश्चित करण्यासाठी समन्वय निर्माण केला जाऊ शकतो, असे सचिव अनुराग जैन यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 13 ऑक्टोबर 2021 रोजी पीएम  गतिशक्ती सुरु केल्यापासून , राष्ट्रीय लॉजिस्टिक धोरणाचा प्रारंभ करण्यासह  अनेक टप्पे गाठले  आहेत असे  डीपीआयआयटीच्या विशेष सचिव सुमिता डावरा यांनी नमूद केले. आजपर्यंत 1300 हून अधिक स्तर अपलोड करण्यात आले आहेत. केंद्रीय मंत्रालयांचे 30 वैयक्तिक पोर्टल आणि 36 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांचे राज्य बृहत योजना पोर्टल देखील विकसित करण्यात आले आहेत, असे त्यांनी पीएम गतिशक्ती राष्ट्रीय बृहत योजने अंतर्गत झालेल्या प्रगतीचा आढावा घेताना सांगितले.

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय, केंद्रीय रेल्वे मंत्रालय आणि केंद्रीय दळणवळण आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या नोडल अधिका-यांनी देखील प्रकल्प नियोजनातील त्यांचे सुधारित अनुभव पीएम  गतिशक्तीसोबत सामायिक केले. आज या कार्यशाळेत अनेक सत्रे झाली. आर्थिक उपक्रमांचे  सर्वसमावेशक नियोजन आणि सामाजिक क्षेत्राच्या नियोजनामध्ये पीएम गतिशक्तीच्या अवलंब केलेल्या उदाहरणांच्या आणि सर्वोत्तम पद्धतींच्या काही प्रात्यक्षिकांसह, शाश्वत शहरे निर्माण करण्यासाठी शहर लॉजिस्टिक योजनेचे महत्त्व आणि प्रकल्प देखरेख समुहामधील सूचीबद्ध राज्यांच्या प्रमुख प्रकल्पांवरील समस्या आणि अडथळे यावरील चर्चासत्रांचा यामध्ये समावेश होता.

पीएम गतिशक्ती मंचाचा वापर केलेल्या उदाहरणांची नमुना यादी येथे पाहता येईल.

* * *

PIB Panaji | N.Chitale/S.Chavan/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1900789) Visitor Counter : 219


Read this release in: Telugu , English , Urdu , Hindi , Tamil