आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने, राष्ट्रीय अवयव आणि ऊती प्रत्यारोपण संस्था (NOTTO) अंतर्गत केले विज्ञान संवाद 2023 चे आयोजन
देशाने प्रथमच 15,000 पेक्षा अधिक अवयव प्रत्यारोपण; प्रत्यारोपणाच्या संख्येत 27% ची वार्षिक वाढ
प्रभावी प्रशासन संरचना, तांत्रिक संसाधनांचा तर्कसंगत आणि पुरेपूर वापर आणि अवयव दानाला प्रोत्साहन देण्यासाठी अधिक जागरूकता यावर लक्ष केंद्रित केले जाईल
Posted On:
19 FEB 2023 1:11PM by PIB Mumbai
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने, राष्ट्रीय अवयव आणि ऊती प्रत्यारोपण संस्था (NOTTO) अंतर्गत आज विज्ञान संवाद 2023 चे आयोजन केले. रुग्णाला जीवदान देणाऱ्या अवयव आणि ऊती प्रत्यारोपणाच्या क्षेत्रात सर्वोत्तम पद्धतींचा अंतर्भाव आणि पद्धती यावर विचार मंथन करण्यासाठी सर्व संबंधिताना एकाच छत्राखाली आणण्याचे या बैठकीचे उद्दिष्ट होते.
केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी यावेळी बोलताना, देशात अवयव आणि ऊती प्रत्यारोपणाच्या क्षेत्रात असलेल्या सकारात्मक वातावरणाबद्दल उपस्थितांचे अभिनंदन केले. कोविड नंतर प्रत्यारोपणात वेगाने वाढ होत आहे आणि पहिल्यांदाच देशाने एका वर्षात (2022) 15,000 पेक्षा जास्त प्रत्यारोपण झाली असून याशिवाय प्रत्यारोपणाच्या संख्येत 27% ची वार्षिक वाढ दिसून आली आहे, असे ते म्हणाले.
कार्यक्रमबद्ध पुनर्रचना, संवादात्मक धोरण आणि व्यावसायिकांची कौशल्य वृद्धी या तीन प्राधान्य क्रमांविषयी आरोग्य सचिवांनी माहिती दिली. विद्यमान संरचना आणि मार्गदर्शक तत्त्वे अद्ययावत करण्याची गरज आहे, तसेच आपल्याकडे राष्ट्रीय स्तरावर NOTTO, राज्य स्तरावर SOTTOs आणि प्रादेशिक स्तरावर ROTTOs अशा संस्था विविध शासन पातळ्यांवर कार्यरत असल्या तरीदेखील त्यांचे कार्य सुविहित चालले आहे की नाही हे पाहणे आवश्यक आहे, असे भूषण यांनी सांगितले.
अद्ययावत मार्गदर्शक तत्वे, अधिवासाची आवश्यकता असलेले निर्बंध दूर करणे यासारख्या बदलांचे भूषण यांनी स्वागत केले. देशाच्या तांत्रिक मनुष्यबळाचा तर्कसंगत वापर करण्यावर आणि तृतीयक काळजी सुविधांसारख्या भौतिक पायाभूत सुविधा आणि उपकरणांचा सुयोग्य वापर करण्याबरोबरच प्रशिक्षण आणि त्यांचे कार्यक्षमतेने वापर यावर त्यांनी भर दिला.
देशाच्या लोकसंख्येच्या बदलत्या स्वरूपाबद्दल बोलताना, केंद्रीय आरोग्य सचिव म्हणाले की भारतात वृद्धांची संख्या वाढत आहे, त्यांचे जीवनमान सुकर व्हावे यादृष्टीने आपली संपर्क आणि जागरूकता धोरणे अद्ययावत करणे अत्यंत महत्त्वाचे आहे, जेणेकरून संभाव्य अवयवदाते पुढे येतील.
प्रशिक्षण कार्यक्रमांद्वारे विस्तृत अभिमुख कार्यक्रम राबवावेत तसेच आरोग्यसेवा क्षेत्रातील व्यावसायिक आणि डोमेनचे ज्ञान असलेल्या तज्ञांसाठी नव्याने आखलेले अभ्यासक्रम आणि डिजिटल माध्यमांचा वापर करावा इत्यादी उपाय त्यांनी सुचवले. "प्रशिक्षण कार्यक्रमांसोबतच, केवळ मुद्रित आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे व्यापक प्रचार आणि जागृती न करता स्थानिक भाग धारक आणि अ शासकीय संस्था (एनजीओ) यांच्या साहाय्याने जनजागृतीपर कार्यक्रम हाती घेतले जावेत". असे त्यांनी सांगितले. आपण करत असलेले कृत्य हे एका उत्तम ध्येयासाठी करत आहोत याची जाणीव लोकांना व्हावी याकरता त्यांच्याशी प्रभावीपणे संवाद साधला जावा, याकडे सर्व भागधारकांनी लक्ष द्यावे यावर त्यांनी भर दिला.
आपल्या देशात 640 पेक्षा अधिक वैद्यकीय रुग्णालये आणि महाविद्यालये असून देखील प्रत्यारोपण शस्त्रक्रिया ही एक विशेष सेवा म्हणून काही मोजक्या रुग्णालयांपुरती मर्यादित राहिली आहे, त्यामुळे सर्व वैद्यकीय संस्थांच्या क्षमता निर्मिती मध्ये वृद्धी करणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले. शस्त्रक्रिया आणि प्रत्यारोपण करणाऱ्या संस्थांची संख्या वाढवण्याची गरज आहे. म्हणजेच आरोग्यसेवा क्षेत्रातील व्यावसायिकांना प्रत्यारोपण प्रक्रियेबद्दल अधिक संवेदनशीलतेने बघण्याची आवश्यकता आहे आणि प्रशिक्षणासोबतच देशात शस्त्रक्रिया/प्रत्यारोपण वाढवण्यासाठी, आपल्या भौतिक पायाभूत सुविधांचा योग्य वापर करणे देखील महत्वाचे आहे, असे भूषण म्हणाले. त्यासोबतच ज्या संस्थांमध्ये अशा शस्त्रक्रियांचा भार अधिक आहे त्यांना शोधून नेटवर्क NOTT प्रोग्राम अंतर्गत आणता येईल. सल्लामसलत आणि चर्चेमुळे सामंजस्य करार होऊ शकतात तसेच राज्य आणि प्रादेशिक स्तरावर उत्कृष्टता केंद्रांची निर्मिती करून गरजूंना या विशेष सेवा पुरवल्या जाऊ शकतात, असे त्यांनी सुचवले.
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अतिरिक्त सचिव व्ही हेकाली झिमोमी, यांनी उपस्थितांना राष्ट्रीय अवयव प्रत्यारोपण कार्यक्रम (NOTP) अंतर्गत वाढीव क्षमता आणि प्रत्यारोपणाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी नागरिकांसाठी सुरु केलेली 24X7 टोल फ्री हेल्पलाइन, राष्ट्रीय अवयव आणि ऊती प्रत्यारोपण रजिस्ट्री, सहज वापरता येण्याजोगी वेबसाइट अशा विविध सुविधांबद्दल माहिती दिली.
या परिषदेला NOTTO चे संचालक डॉ. रजनीश सेहाई, सफदरजंग रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. बी.एल. शेरवाल, यांच्यासह मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी, वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ, आरोग्यसेवा व्यावसायिक आणि उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी उपस्थित होते.
***
N.Chitale/B.Sontakke/R.Aghor/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1900544)
Visitor Counter : 229