गृह मंत्रालय
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह आज महाराष्ट्रात नागपूर इथे स्वातंत्र्यसैनिक आणि ‘लोकमत’चे संस्थापक जवाहरलाल दर्डा यांच्या जन्मशताब्दी समारंभ आणि ‘लोकमत नागपूर आवृत्तीला’ 50 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल आयोजित समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून झाले सहभागी
महाराष्ट्रात पत्रकारितेच्या क्षेत्राचा उज्ज्वल इतिहास, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी 1881 साली केसरी सुरू केले, ज्याने केवळ महाराष्ट्र नाही, तर संपूर्ण देशात स्वातंत्र्याची चेतना जागृत करण्याचे काम केले.
सत्य, धाडस आणि सातत्य हे तीन गुण आत्मसात करण्याची एक कार्यपद्धती तयार करणे वर्तमानपत्रासाठी अत्यंत महत्वाचे असते.
Posted On:
18 FEB 2023 9:10PM by PIB Mumbai
अमित शाह यांनी दीक्षाभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहिली, रेशीमबाग इथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. हेडगेवार आणि द्वितीय सरसंघचालक श्री गुरुजी यांनाही पुष्पांजली अर्पण केली.
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह, महाराष्ट्रात नागपूरात स्वातंत्र्य सैनिक आणि दैनिक ‘लोकमत’चे संस्थापक जवाहरलाल दर्डा यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त तसेच ‘लोकमत नागपूर आवृत्ती’ची 50 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी झाले. अमित शाह यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या दीक्षाभूमीवर जाऊन, त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. तसेच रेशीमबागेत जाऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. हेडगेवार आणि द्वितीय सरसंघचालक श्री गुरुजी यांना पुष्पांजली अर्पण केली. लोकमत समूहाला 50 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित या समारंभात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि लोकमत मीडिया समूहाचे अध्यक्ष आणि माजी खासदार विजय दर्डा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
अमित शाह यांनी सर्व देशबांधवांना, आजच्या महाशिवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या. आपल्या भाषणात गृहमंत्री म्हणाले की सत्य, धाडस आणि सातत्य हे तीन गुण आत्मसात करण्याची कार्यपद्धती निर्माण करणे एका वर्तमानपत्रासाठी अत्यंत आवश्यक असते. लोकमत समूहाच्या संचालकांनी देखील हे तीन गुण आत्मसात करुन आपली एक कार्यपद्धती तयार केली आहे.
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह म्हणाले की महाराष्ट्राला पत्रकारितेच्या क्षेत्राला एक उज्ज्वल इतिहास आहे. ते म्हणाले की मराठी पत्रकारीतेचे जनक बाळ शास्त्री जांभेकर यांनी 1832 साली सर्वात आधी दर्पण नावाच्या वर्तमानपत्राचे प्रकाशन सुरू केले आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी 1881 साली केसरी वर्तमानपत्राची सुरुवात केली. या वृत्तपत्राने केवळ महाराष्ट्रच नाही, तर संपूर्ण देशात स्वातंत्र्याची चेतना निर्माण करण्याचे काम केले. या वर्तमानपत्राच्या माध्यमातून टिळकांचे विचार महाराष्ट्रासोबतच देशभरातील युवकांपर्यंत पोहोचले. लोकमतही याच परंपरेचा भाग आहे, कारण लोकमान्य टिळकांनीच ‘लोकमत’ हे नामकरण केले होते, असे शाह म्हणाले.
कोरोना काळात देशाने पायाभूत सुविधा विकसित करण्याचा धडा घेतला आणि आरोग्य क्षेत्रात 60 हजार कोटी रुपयांच्या पायाभूत सुविधा विकसित केल्या, असे शहा यांनी सांगितले. सरकार जेव्हा देश आणि जनतेचा विचार करते तेव्हा निर्णय घेण्यात क्षणाचाही विलंब करत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत सरकारने लोकांना चांगले वाटतील असे निर्णय न घेता लोकांसाठी चांगले आणि हितकर ठरतील असे अनेक निर्णय घेतले आहेत, असे त्यांनी सांगितले.
नव्या हायड्रोजन धोरणामुळे आगामी दोन-तीन वर्षात भारत हायड्रोजन क्षेत्रात जगाचे नेतृत्व करेल असा विश्वास अमित शहा यांनी व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने कधीही व्होट बँकेचे राजकारण केले नाही असे ते म्हणाले.
नक्षलवाद देखील आता कमी झाला असल्याचे केंद्रीय मंत्र्यांनी सांगितले. पूर्वी 160 जिल्हे तीव्र नक्षल प्रभावित होते मात्र आता ही संख्या केवळ 46 आहे, असे ते म्हणाले. सर्व प्रकारच्या नक्षलवादी हिंसाचाराच्या घटनांचे प्रमाण सरासरी 80 टक्के कमी झाल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश याप्रमाणेच बिहार आणि झारखंड ही राज्ये देखील नक्षलवादी हिंसाचारापासून जवळपास मुक्त झाली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या सर्वांसमोर 2047 मध्ये भारताला जगातला अग्रगण्य देश बनवण्याचे जे उद्दिष्ट ठेवले आहे ते नक्कीच पूर्ण होईल असा विश्वास शहा यांनी व्यक्त केला. या संकल्पाच्या पायाभरणीचे काम पूर्ण झाले असून आता हा संकल्प सिद्धीस नेण्याची वेळ आली आहे असे ते म्हणाले.
***
N.Chitale/R.Aghor/S.Mukhedkar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1900420)
Visitor Counter : 213