सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय
भारत आणि दक्षिण आफ्रिका दरम्यानच्या दिव्यांगत्व क्षेत्रातील सहकार्याच्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी करायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
Posted On:
15 FEB 2023 5:22PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 15 फेब्रुवारी 2023
भारत सरकार आणि दक्षिण आफ्रिका सरकार दरम्यानच्या दिव्यांगत्व क्षेत्रातील सहकार्याच्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी करायला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.
या द्विपक्षीय सामंजस्य करारामुळे, दिव्यांगत्व क्षेत्रातील संयुक्त उपक्रमांद्वारे दिव्यांग व्यक्तींचे सक्षमीकरण विभाग, भारत सरकार आणि दक्षिण आफ्रिका सरकार यांच्यातील सहकार्याला प्रोत्साहन मिळेल. यामुळे भारत आणि दक्षिण आफ्रिके दरम्यानचे द्विपक्षीय संबंध देखील आणखी दृढ होतील. सामंजस्य कराराच्या वैधतेच्या कालावधीत दोन्ही देशांमधील सहकार्याचे विशिष्ट प्रस्ताव, परस्पर सहमतीने, अंमलबजावणीसाठी हाती घेतले जातील.
दोन्ही देशांमधील दिव्यांग व्यक्ती (पीडब्ल्यूडी) आणि वयोवृद्ध नागरिक, ज्यांना विशेषतः आधुनिक, वैज्ञानिक, टिकाऊ, कमी दरात साहित्य आणि सहाय्यक उपकरणांची गरज आहे, त्यांना या सामंजस्य कराराचा लाभ मिळावा, हे यामागचे उद्दिष्ट आहे.
शतकभरा पूर्वी महात्मा गांधींनी दक्षिण आफ्रिकेत सत्याग्रह चळवळ सुरू केली, तेव्हापासून, दोन्ही देशांमध्ये स्वातंत्र्य आणि न्यायासाठीचा लढा, या संदर्भात दीर्घ ऐतिहासिक दुवा आणि संबंध आहेत. वर्णभेद विरोधी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी एकत्र आलेल्या आंतरराष्ट्रीय समुदायातही भारत आघाडीवर होता. स्वातंत्र्यानंतर, 1993 मध्ये दक्षिण आफ्रिके बरोबरचे राजनैतिक संबंध पुनर्स्थापित करण्यात आले आणि त्यानंतर, भारत आणि दक्षिण आफ्रिकेने मार्च, 1997 मध्ये परस्परांबरोबर धोरणात्मक भागीदारी स्थापन केली. त्यानंतर, द्विपक्षीय संबंधांच्या स्वरुपात, आणि ब्रिक्स, भारत, ब्राझील, दक्षिण आफ्रिका मंच (IBSA) आणि इतर मंचांद्वारे दक्षिण आफ्रिकेबरोबरचे आपले घनिष्ठ आणि मैत्रीपूर्ण संबंध आणखी दृढ झाले आहेत. दोन्ही देशांदरम्यान, आर्थिक आणि व्यावसायिक सहकार्य, संरक्षण, संस्कृती, आरोग्य, मानवी वसाहती, सार्वजनिक प्रशासन आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान यासह विविध क्षेत्रांमध्ये अनेक द्विपक्षीय करार करण्यात आले आहेत. भारताचा तांत्रिक आणि आर्थिक सहकार्य कार्यक्रम (ITEC) हा मनुष्यबळ विकासासाठी आणि यामधील सहकार्याला चालना देण्यासाठी एक उपयुक्त माध्यम ठरला आहे. कोविड 19 महामारी आणि इतर जागतिक आव्हानांचा सामना करण्यामधील भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील द्विपक्षीय सहकार्य उल्लेखनीय आहे. इतर विविध मंत्रालये/विभागांनीही त्यांच्या संबंधित क्षेत्रातील सहकार्यासाठी सामंजस्य करार/करारावर स्वाक्षरी केली आहे. यामधून भारताचे दक्षिण आफ्रिका सरकारबरोबरचे दृढ संबंध स्पष्ट होत आहेत.
S.Thakur/R.Agashe/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1899518)
Visitor Counter : 163