पंतप्रधान कार्यालय

फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांसोबत दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून झालेल्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

Posted On: 14 FEB 2023 10:18PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 14 फेब्रुवारी  2023

 

महामहीम, माझे मित्र, राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन,

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल,

केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंदिया,

टाटा विश्वस्त संस्थेचे अध्यक्ष रतन टाटा,

टाटा सन्स कंपनीचे अध्यक्ष एन.चंद्रशेखरन,

एअर इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी कॅम्पबेल विल्सन

एअरबसचे मुख्य कार्यकारी अधिकारी गिलॉम फॉरी

सर्वप्रथम, मी एअर इंडिया तसेच एअरबस यांचे या महत्त्वाच्या कराराबद्दल अभिनंदन करतो.

या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल मी माझे मित्र, राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांचे विशेष आभार मानतो.

हा करार म्हणजे भारत आणि फ्रान्स यांच्यातील दृढ होत गेलेले नातेसंबंध तसेच भारताच्या नागरी हवाई उद्योगाची सफलता आणि महत्वाकांक्षा यांचा पुरावा आहे. आजघडीला आपले नागरी हवाई क्षेत्र भारताच्या विकासाचा अविभाज्य भाग झाले आहे. नागरी हवाई क्षेत्राचे बळकटीकरण करणे हा आपल्या राष्ट्रीय पायाभूत सुविधा धोरणाचा महत्त्वाचा पैलू आहे. गेल्या आठ वर्षांत भारतात कार्यान्वित विमानतळांची संख्या जवळजवळ दुपटीने वाढून 74 वरुन 147 पर्यंत पोहोचली आहे. उडान या आपल्या प्रादेशिक जोडणी योजनेच्या माध्यमातून देशाचे दुर्गम भाग देखील हवाई वाहतुकीने जोडले जात आहेत आणि त्यातून तेथील जनतेचा आर्थिक आणि सामाजिक विकास होत आहे.

भारत लवकरच जागतिक हवाई उड्डाण क्षेत्रातील तिसरा सर्वात मोठा देश होणार आहे. व्यक्त करण्यात आलेल्या विविध अंदाजांनुसार, भारताला येत्या 15 वर्षांत 2000 हून अधिक विमानांची गरज भासेल. आज करण्यात आलेली ऐतिहासिक घोषणा ही वाढती गरज भागवण्यासाठी उपयुक्त ठरेल. भारताच्या ‘मेक इन इंडिया- मेक फॉर द वर्ल्ड’ या संकल्पनेअंतर्गत हवाई उत्पादन क्षेत्रात अनेक नव्या संधी खुल्या होत आहेत. देशातील ग्रीनफिल्ड तसेच ब्राऊनफिल्ड विमानतळांच्या उभारणीसाठी ऑटोमॅटीक मार्गाने शंभर टक्के थेट परदेशी गुंतवणुकीची तरतूद करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे, विमानतळ परिसरातील सेवा, देखभाल, दुरुस्ती आणि ओव्हरहॉल म्हणजेच एमआरओ साठी देखील 100% थेट परदेशी गुंतवणूक करण्यास परवानगी देण्यात आली आहे. या संपूर्ण प्रदेशासाठी भारत म्हणजे एमआरओचे मोठे केंद्र होऊ शकतो. भारतात आज जागतिक पातळीवरील सगळ्या विमानसेवा कंपन्या कार्यरत आहेत. या संधींचा पुरेपूर लाभ घेण्याचे आवाहन मी त्यांना करतो.

मित्रांनो,

एअर इंडिया आणि एअरबस यांच्यात झालेला हा करार म्हणजे भारत-फ्रान्स धोरणात्मक भागीदारीसाठी एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. काही महिन्यांपूर्वी म्हणजे ऑक्टोबर 2022 मध्ये मी बडोदा येथे उभारल्या जाणाऱ्या संरक्षण सामग्री वाहतूक करणाऱ्या विमानांच्या निर्मिती प्रकल्पाच्या शिलान्यास समारंभाला उपस्थित होतो. या प्रकल्पात अडीच अब्ज युरोंच्या गुंतवणुकीसह बांधल्या जाणाऱ्या या प्रकल्पात टाटा आणि एअरबस यांची देखील भागीदारी आहे. सफ्रान ही फ्रेंच कंपनी भारतात विमानांच्या इंजिनाच्या देखभालीसाठी सर्वात मोठी एमआरओ सुविधा उभारत आहे हे समजल्यावर देखील मला फार आनंद झाला आहे.

आंतरराष्ट्रीय व्यवस्था आणि बहुपक्षीय यंत्रणा यांच्यात स्थैर्य आणि समतोल सुनिश्चित करण्यासाठी भारत-फ्रान्स भागीदारी आज थेट भूमिका बजावत आहे. हिंद-पॅसिफिक प्रदेशातील सुरक्षा आणि स्थैर्याचा मुद्दा असो किंवा जागतिक अन्न सुरक्षा आणि आरोग्य सुरक्षेचा प्रश्न असो, भारत आणि फ्रान्स एकत्रितपणे सकारात्मक योगदान देत आहे.

राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन,

आपल्यातील द्विपक्षीय संबंध या वर्षी अधिक उंचीवर पोहोचतील असा विश्वास मला वाटतो. जी-20 समूहाच्या भारताकडील अध्यक्षपदाच्या काळात आपल्याला एकत्रितपणे काम करण्याच्या अधिक संधी प्राप्त होतील. पुन्हा एकदा, तुम्हां सर्वांचे आभार आणि सर्वांना शुभेच्छा.

 

 

 

 

 

S.Patil/S.Chitnis/P.Malandkar

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 



(Release ID: 1899239) Visitor Counter : 153