पर्यटन मंत्रालय
गुजरातमधील कच्छचे रण येथे उद्यापासून जी 20 अंतर्गत पर्यटन कार्यगटाच्या पहिल्या बैठकीला सुरुवात
Posted On:
06 FEB 2023 9:52PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 6 फेब्रुवारी 2023
गुजरातमधील कच्छचे रण इथे नयनरम्य अशा पांढर्या वाळूच्या पार्श्वभूमीवर, 7-9 फेब्रुवारी 2023 या कालावधीत जी 20 देशांच्या पर्यटन क्षेत्राच्या प्रतिनिधींची बैठक आयोजित करण्यात आली आहे. पर्यटन मंत्रालयाने आयोजित केलेल्या जी 20 अंतर्गत पहिल्या पर्यटन कार्यगटाची बैठक उद्यापासून सुरू होणार असून 100 हून अधिक प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित राहतील, अशी माहिती पर्यटन मंत्रालयाचे सचिव अरविंद सिंह यांनी आज बैठकीचे ठिकाण असलेल्या धोर्डो येथे बैठक पूर्व पत्रकार परिषदेत दिली. या बैठकीला केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री परशोत्तम रुपाला,पर्यटन, संस्कृती आणि ईशान्य क्षेत्र विकास मंत्री जी. किशन रेड्डी आणि गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र भाई पटेल उपस्थित राहणार आहेत. जी 20 सदस्य देश, आमंत्रित देश आणि आंतरराष्ट्रीय संस्थांचे वरिष्ठ प्रतिनिधी या बैठकीत सहभागी होतील.
भारताचे जी 20 अध्यक्षपद साजरे करण्यासाठी पर्यटन मंत्रालयाने केवळ सरकारी पातळीवरील भागधारकांचाच नव्हे तर पर्यटन व्यापार आणि आदरातिथ्य क्षेत्राचा सहभाग असलेले अनेक कार्यक्रम आयोजित करण्याचे नियोजन मंत्रालयाने केले आहे , असे सचिव म्हणाले.
जी 20 मुख्य कार्यकारी अधिकारी मंचासोबत मंत्रिस्तरीय बैठक जूनमध्ये गोव्यात होणार आहे. जागतिक प्रवास आणि पर्यटन परिषद (डब्ल्यूटीटीसी) आणि डब्ल्यूटीटीसी (भारत उपक्रम) या माध्यमातून हा कार्यक्रम आयोजित केला जात आहे. पर्यटन मंत्रालय 2023 मध्ये अनुक्रमे मे आणि जूनमध्ये एमआयसीई जागतिक परिषद आणि साहसी पर्यटनावर आधारित कार्यक्रम आयोजित करेल, असे सिंह यांनी सांगितले.
भारताच्या जी -20 अध्यक्षपदाच्या काळात पर्यटन क्षेत्रातील पाच प्राधान्य क्षेत्रे निश्चित करण्यात आली आहेत, जी पर्यटन क्षेत्राच्या संक्रमणाला गती देण्यासाठी मुख्य पाया रचतील आणि 2030 ची शाश्वत विकास उद्दिष्टे साध्य करतील. पाच प्राधान्य क्षेत्रे खालीलप्रमाणे आहेत.
हरित पर्यटन - "शाश्वत, उत्तरदायी आणि लवचिक पर्यटन क्षेत्राला पर्यावरणाशी जोडणे "
डिजिटलायझेशन- “पर्यटन क्षेत्रातील स्पर्धात्मकता, समावेशन आणि शाश्वतातेला प्रोत्साहन देण्यासाठी डिजिटलायझेशनच्या सामर्थ्याचा उपयोग करणे''
कौशल्य - "पर्यटन क्षेत्रातील नोकऱ्या आणि उद्यमशीलतेसाठी कौशल्यांसह तरुणांना सक्षम करणे"
पर्यटन एमएसएमई- "पर्यटन क्षेत्रात नवोन्मेष आणि उत्साह आणण्यासाठी पर्यटन एमएसएमई / स्टार्टअप्स / खाजगी क्षेत्रासाठी पोषक वातावरण निर्मिती"
गंतव्यस्थानांचे व्यवस्थापन - ''शाश्वत विकास उद्दिष्टांनुसार सर्वांगीण दृष्टिकोनाच्या दिशेने गंतव्यस्थानांच्या धोरणात्मक व्यवस्थापनावर पुनर्विचार करणे''
ग्रामीण पर्यटन आणि पुरातत्व पर्यटनाला चालना देणारे दोन संबंधित कार्यक्रम हे तीन दिवसीय बैठकीचे मुख्य आकर्षण असेल.
* * *
N.Chitale/S.Chavan/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1896826)
Visitor Counter : 265