माहिती आणि प्रसारण मंत्रालय
43 दिवसांच्या तीर्थयात्रेसाठी कोरिया प्रजासत्ताकमधील 108 बौद्ध यात्रेकरुंची 1100 किलोमीटरची पदयात्रा
Posted On:
06 FEB 2023 7:53PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 6 फेब्रुवारी 2023
दक्षिण कोरियाच्या सांगवोल सोसायटीने आयोजित केलेल्या पदयात्रेचा एक भाग म्हणून, कोरिया प्रजासत्ताक मधील 108 बौद्ध यात्रेकरू 43 दिवसांत 1,100 किलोमीटर अंतराची पदयात्रा करतील, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव अपूर्व चंद्रा यांनी आज ही माहिती दिली. भारत आणि दक्षिण कोरिया यांच्यातील राजनैतिक संबंधांच्या स्थापनेची 50 वर्षे साजरी करत असताना या पदयात्रेला महत्त्व प्राप्त झाले आहे. उभय देशांमधील मैत्री आणि सहकार्य वृद्धिंगत करणे हा या यात्रेचा उद्देश आहे, असे चंद्रा यांनी सांगितले. यात्रेकरू भारतातील उत्तर प्रदेश आणि बिहारमधील बौद्ध तीर्थक्षेत्रांना भेट देतील आणि त्यानंतर नेपाळला जाणार आहेत.
भारतातील बौद्ध पर्यटन सर्किट अर्थात मंडल जगासमोर आणण्याचा दृष्टीकोन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडला आहे. हे मंडल पर्यटकांना भगवान बुद्धांच्या शिकवणीची अनुभूती घेण्यास आणि बुद्धांच्या जीवनकाळातील त्यांच्या पाऊलखुणा शोधण्यास मदत करते. या तीर्थयात्रे दरम्यान बुद्धाच्या जन्मापासून ते त्यांच्या परिनिर्वाणा पर्यंतचे आयुष्य याच्याशी संबंधित ठिकाणांना यात्रेकरू भेट देणार आहेत असे चंद्रा यांनी सांगितले.
सचिवांनी येणाऱ्या यात्रेकरूंचे स्वागत केले आणि भारत सरकारकडून सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले आणि या तीर्थक्षेत्रांच्या भेटीच्या माध्यमातून यात्रेकरूंना बौद्ध तत्त्वज्ञानाची सखोल माहिती मिळेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
हे यात्रेकरू 9 फेब्रुवारी ते 23 मार्च 2023 या कालावधीत भारत आणि नेपाळमधील बौद्ध पवित्र स्थळांच्या 43 दिवसांच्या दौऱ्यावर असतील. ‘ओह,,वुई ! ओह, लव्ह ! ओह, लाइफ! ‘या घोषवाक्यासह बुद्धांचे जीवन आणि पाऊलखुणा जतन केलेल्या भारतातील तीर्थस्थळांच्या माध्यमातून भक्तीपर बौद्ध संस्कृतीच्या कार्यांचा प्रसार करणे हा सांगवोल सोसायटीने आयोजित केलेल्या यात्रेचा उद्देश आहे.
दोन्ही देश राजनैतिक संबंधांच्या 50 वर्षांचा हा ऐतिहासिक टप्पा साजरा करत आहेत त्यामुळे 2023 हे वर्ष उभय देशांमधील द्विपक्षीय संबंधांसाठी विशेष आहे, असे भारतातील कोरिया प्रजासत्ताकचे राजदूत चांग जे-बोक यांनी सांगितले. भारताकडे जी 20 समूहाचे अध्यक्षपद असताना ही पदयात्रा भारतात येत आहे आणि जी 20 मध्ये भारताच्या यशासाठी दक्षिण कोरिया वचनबद्ध आहे, असेही ते म्हणाले. बौद्ध शिकवणीसारखेच भारताचे जी 20 अध्यक्षपदाचे 'एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य' हे ब्रीदवाक्य आहे, असे राजदूतांनी सांगितले.
भारत आणि दक्षिण कोरिया यांच्यातील धार्मिक संबंधांवर बोलताना राजदूत म्हणाले की, हे संबंध दृढ भावना जागृत करतात आणि दोन्ही देशातील लोकांमध्ये प्रचंड सद्भावना निर्माण करतात यामुळे हे द्विपक्षीय संबंधांना बळ देणारे आहे.कोरियातून दरवर्षी हजारो पर्यटक भारताला भेट देतात आणि कोरियन बौद्ध धर्माच्या जोग्ये ऑर्डरच्या माध्यमातून या तीर्थक्षेत्र पदयात्रेचे आयोजन केले जात आहे, असे त्यांनी सांगितले. वाराणसीतील सारनाथ येथून ही तीर्थक्षेत्र पदयात्रा सुरू होईल आणि नेपाळमधून मार्गक्रमण करून श्रावस्ती येथे या पदयात्रेचा समारोप होईल.
ही भव्य बौद्ध तीर्थयात्रा ही आपल्या सामायिक बौद्ध वारशासाठी योग्य आदरांजली आहे. लोकांशी संपर्क अधिक दृढ करण्यासाठीच्या प्रयत्नांना या पदयात्रेमुळे अधिक चालना मिळेल असे राजदूतांनी या पदयात्रेचे महत्त्व प्रसारमाध्यमांना विशद करताना सांगितले. त्यांनी सांगितले की, यात्रेकरूंमध्ये समावेश असलेले भिक्षू
1. आठ प्रमुख बौद्ध पवित्र स्थळांवर आदरांजली अर्पण करतील
2. भारतीय बौद्ध धर्म आणि संस्कृतीचा अनुभव घेतील आणि धर्मगुरुंशी द्विपक्षीय बैठक घेतील आणि
3. जागतिक शांततेसाठी प्रार्थना सभा आणि जीवन सन्मानासाठी आशीर्वाद सोहळा आयोजित करतील.
भारतीय तीर्थक्षेत्रांवर आयोजित मुख्य कार्यक्रमांच्या अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
* * *
N.Chitale/S.Chavan/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1896761)
Visitor Counter : 231