संरक्षण मंत्रालय

संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरतेच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकत, कर्नाटक टुमकुरु येथील एचएएल हेलिकॉप्टर कारखाना 6 फेब्रुवारी रोजी पंतप्रधान राष्ट्राला समर्पित करणार

Posted On: 04 FEB 2023 4:57PM by PIB Mumbai

 

संरक्षण क्षेत्रातील 'आत्मनिर्भरते'च्या दिशेने आणखी पाऊल टाकत, पंतप्रधान  नरेंद्र मोदी 06 फेब्रुवारी 2023 रोजी कर्नाटकातील टुमकुरु येथे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडचा (एचएएल) हेलिकॉप्टर कारखाना राष्ट्राला समर्पित करतील. संरक्षण मंत्री  राजनाथ सिंह आणि संरक्षण मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी  यावेळी उपस्थित राहणार आहेत.

हा ग्रीनफिल्ड हेलिकॉप्टर कारखाना, 615 एकरावर उभारला असून देशाच्या हेलिकॉप्टरविषयक सर्व गरजा एकाच ठिकाणी पूर्ण करणारे ठिकाण या दृष्टीकोनातून हा प्रकल्प नियोजित आहे. भारतातील ही सर्वात मोठी हेलिकॉप्टर उत्पादन सुविधा असून येथे सुरुवातीला लाइट युटिलिटी हेलिकॉप्टर (एलयुएच) तयार केली जातील.

एलयुएच हे स्वदेशी बनावटीचे आणि इथेच विकसित केलेले 3-टन श्रेणीचे, एकल इंजिन बहुउद्देशीय उच्च दर्जाचे आणि सर्वोत्तम कौशल्य वैशिष्ट्यांनी युक्त  युटिलिटी हेलिकॉप्टर आहे.

सुरुवातीला, हा कारखाना दरवर्षी सुमारे 30 हेलिकॉप्टर तयार करेल आणि टप्प्याटप्प्याने 60 आणि नंतर 90 पर्यंत उत्पादन वाढवता येईल.  पहिल्या एलयुएच ची उड्डाण चाचणी झाली असून ते अनावरणासाठी तयार आहे.

हलक्या वजनाच्या लढाऊ लाइट कॉम्बॅट हेलिकॉप्टर (एलसीएच) आणि इंडियन मल्टीरोल हेलिकॉप्टर (आयएमआरएच) सारख्या इतर हेलिकॉप्टरच्या निर्मितीसाठी कारखान्याचा विस्तार केला जाईल.  भविष्यात एलसीएच, एलयुएच, सिविल अॅडव्हान्स लाईट हेलिकॉप्टर (एएलएच) आणि आयएमआरएचची देखभाल आणि दुरुस्तीसाठी देखील याचा वापर केला जाईल.  सिव्हिल एलयुएच ची संभाव्य निर्यात देखील या कारखान्यातून केली जाईल.

येत्या 20 वर्षांत एकूण चार लाख कोटी रुपयांच्या व्यवसायासह 3-15 टनांच्या श्रेणीतील 1,000 हून अधिक हेलिकॉप्टरचे उत्पादन करण्याची एचएएलची योजना आहे. प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्माण करण्याबरोबरच, आपल्या सीएसआर उपक्रमांद्वारे मोठ्या प्रमाणावर समुदाय केंद्रित कार्यक्रमांद्वारे आसपासच्या क्षेत्राच्या विकासाला ती चालना देईल. कंपनी यावर मोठ्या प्रमाणात खर्च करेल. परिणामी या भागातील लोकांच्या जीवनमानात सुधारणा होईल.

बेंगळुरूमधील सध्याच्या एचएएल सुविधांसह कारखान्याच्या आसपासच्या परिसरात हवाई क्षेत्रातील उत्पादन परिसंस्थेला चालना मिळेल. शाळा, महाविद्यालये आणि निवासी क्षेत्रे यासारख्या कौशल्य आणि पायाभूत सुविधांच्या विकासालाही पाठबळ मिळेल. वैद्यकीय आणि आरोग्य सेवा जवळपासच्या विविध पंचायतींमध्ये राहणाऱ्या समुदायापर्यंत पोहोचतील.

हेली-रनवे, फ्लाइट हँगर, फायनल असेंब्ली हँगर, स्ट्रक्चर असेंब्ली हँगर, एअर ट्रॅफिक कंट्रोल आणि विविध सहाय्यक सेवा सुविधा यांसारख्या सुविधांच्या स्थापनेसह, कारखाना पूर्णपणे कार्यरत आहे. हा कारखाना त्याच्या कार्यान्वयनासाठी अत्याधुनिक उद्योग 4.0 मानक साधने आणि तंत्रांनी सुसज्ज आहे.

पंतप्रधानांच्या हस्ते 2016 मध्ये या सुविधेची पायाभरणी करण्यात आली होती. आयात न करताही भारताची  हेलिकॉप्टरची संपूर्ण गरज या कारखान्यामुळे पूर्ण करता येईल. हेलिकॉप्टर डिझाइन, विकास आणि उत्पादन या क्षेत्रात पंतप्रधानांच्या 'आत्मनिर्भर भारत' या संकल्पनेला अधिक पाठबळ मिळेल.

***

S.Patil/V.Ghode/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1896302) Visitor Counter : 164