नागरी उड्डाण मंत्रालय

उडान योजने अंतर्गत नऊ हेलीपोर्ट (हेलिकॉप्टर तळ) आणि दोन जल विमानतळांसह 72 विमानतळांचा समावेश असलेले 459 मार्ग कार्यान्वित आहेत


उडान योजनेच्या 2 लाख 16 हजार उड्डाणांच्या माध्यमातून 1 कोटी 13 लाखांहून अधिक प्रवाशांनी केला प्रवास

उडान योजनेला पाठबळ देण्यासाठी 2024 पर्यंत 100 विमानतळ उभारण्याची, सरकारची योजना

Posted On: 02 FEB 2023 7:56PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 2 फेब्रुवारी 2023

 

नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने 21.10.2016 रोजी प्रादेशिक संपर्क व्यवस्था योजना (आरसीएस)- उडान (उडे देश का आम नागरिक) सुरु केली.

देशातील कार्यान्वित नसलेल्या किंवा कमी कार्यान्वित असलेल्या  विमानतळांच्या माध्यमातून प्रादेशिक हवाई संपर्क व्यवस्था वाढवणे आणि सर्वसामान्य जनतेलाही हवाई प्रवास परवडावा हा उडानचा उद्देश आहे.

उडान, ही बाजाराभिमुख योजना आहे.  इच्छुक विमान कंपन्या उडान अंतर्गत बोली लावताना, विशिष्ट मार्गावरील मागणीच्या मूल्यांकनाच्या आधारावर, त्यांचे प्रस्ताव सादर करतात.

योजनेअंतर्गत, 30.01.2023 रोजी देशभरात, नऊ हेलीपोर्ट (हेलिकॉप्टर तळ) आणि दोन जल विमानतळांसह 72 विमानतळांचा समावेश असलेले 459 मार्ग कार्यान्वित करण्यात आले आहेत. उडान योजनेच्या 2 लाख 16 हजार उड्डाणांच्या माध्यमातून आत्तापर्यंत 1 कोटी 13 लाखांहून अधिक प्रवाश्यांनी प्रवास केला आहे.

नागरी विमान वाहतूक क्षेत्र आणि आर्थिक वाढ यांच्यातील संबंध चांगल्या प्रकारे सर्वपरिचित आहे. उडान योजनेला पाठिंबा देण्यासाठी आणि योजनेच्या कालावधीत 1000 उडान मार्ग कार्यान्वित करण्यासाठी 2024 पर्यंत शंभर विमानतळ विकसित करण्याची योजना सरकारने आखली आहे. उडान, ही एक सातत्याने सुरु असलेली योजना आहे. याअंतर्गत अधिक गंतव्यस्थान/विमानतळ थांबे आणि मार्गांच्या विस्तारासाठी वेळोवेळी लिलाव फेऱ्या आयोजित केल्या जातात.

नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री (डॉ.) व्ही.के. सिंग, (निवृत्त) यांनी आज लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.

 

* * *

S.Patil/V.Ghode/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1895850) Visitor Counter : 143