अर्थ मंत्रालय
आयुष्मान भारत योजनेअंतर्गत 4 जानेवारी 2023 पर्यंत जवळपास 22 कोटी लाभार्थींची पडताळणी
आयुष्मान भारत योजनेअंतर्गत देशभरात 1.54 लाखाहून अधिक आयुष्मान भारत – आरोग्य आणि कल्याण केंद्रे कार्यान्वित
आयुष्मान भारत डिजिटल अभियानाअंतर्गत 31 कोटीपेक्षा अधिक आयुष्मान भारत आरोग्य खाती उघडली गेली
Posted On:
31 JAN 2023 9:55PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 31 जानेवारी 2023
आयुष्मान भारत प्रधानमंत्री - जन आरोग्य योजनेअंतर्गत (AB PM-JAY) 4 जानेवारी 2023 पर्यंत 21.9 कोटी लाभार्थ्यांची पडताळणी करून निश्चिती केली गेली आहे. यात राज्यांच्या माहिती तंत्रज्ञान प्रणालीच्या उपयोगाने पडताळणी केलेल्या 3 कोटी लाभार्थ्यांचाही समावेश आहे. या योजनेअंतर्गत जोडल्या गेलेल्या 26,055 हून अधिक रुग्णालयांमध्ये दाखल झालेल्या सुमारे 4.3 कोटी रुग्णांना आणि त्यांच्या उपचारापोटी आलेल्या 50,409 कोटी रुपयांच्या खर्चालाही मान्यता दिली गेली आहे. केंद्रीय अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत मांडलेल्या 2022-23 या वर्षाच्या आर्थिक सर्वेक्षणातही ही बाब ठळकपणे अधोरेखीत केली गेली आहे.
आयुष्मान भारत प्रधानमंत्री - जन आरोग्य योजना ही जगातील सर्वात मोठी आरोग्य विमा योजना असून, या योजनेअंतर्गत लक्षित लाभार्थ्यांना आरोग्यविषयक बाबींपोटी आपल्या उत्पन्नातील वाट्यातून कराव्या लागणाऱ्या खर्चाचा भार कमी करता यावा यासाठी काम केले जात आहे, ही बाबही केंद्रीय अर्थसंकल्पाआधी आज संसदेत मांडलेल्या 2022-23 या वर्षाच्या आर्थिक सर्वेक्षणात नमूद केली गेली आहे.
या योजनेअंतर्गत देशभरातील 10.7 कोटीपेक्षा जास्त गरीब आणि वंचित कुटुंबांना (सुमारे 50 कोटी लाभार्थी) द्वितीय आणि तृतीय स्तरावरील रुग्णालयीन उपचारांसाठी प्रति कुटुंब 5 लाख रुपयांचे आरोग्य वीमा कवच प्रदान केले जाते. हे लाभार्थी म्हणजे देशाच्या लोकसंख्येत अगदी तळाला असलेली 40 टक्के गरीब जनता असून, त्यांच्या या सामाजिक स्थितीची निश्चिती ही 2011 झाली झालेल्या सामाजिक आर्थिक जातनिहाय जनगणेअंतर्गतचे वंचितता आणि उदरनिर्वाहासाठीचे व्यवसाय हे निकष तसेच त्या त्या राज्यांमधल्या इतर योजनांच्या आधारे करण्यात आली आहे.
आयुष्मान भारत – आरोग्य आणि कल्याण केंद्रे (AB-HWCs)
या योजनेअंतर्गत देशाच्या ग्रामीण आणि शहरी भागांमधील उप आरोग्य केंद्रे आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांचे अद्ययावतीकरण करून, 1,54,070 आयुष्मान भारत – आरोग्य आणि कल्याण केंद्रे कार्यान्वित करण्यात आली असल्याचे या सर्वेक्षणात म्हटले आहे. या योजनेअंतर्गत आयुष्मान भारत – आरोग्य आणि कल्याण केंद्रांमधून सर्वंकष प्राथमिक आरोग्य सेवा दिली जात आहे. त्यासाठी सध्या अस्तित्वात असलेल्या प्रसुतीविषयक आणि बाल आरोग्य सेवा, तसेच संसर्गजन्य आजारांवरील सेवांची व्याप्ती वाढवली गेली. या सोबतच इथल्या आरोग्य सेवांमध्ये उच्च रक्तदाब, मधुमेह आणि तोंडाचा - स्तनाचा आणि गर्भाशयाचा कर्करोग अशा असंसर्गजन्य रोगांशी संबंधित सेवांचा समावेश करून या सेवांचे सक्षमीकरणही केले गेले. छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्यात 14 एप्रिल 2018 रोजी पहिल्या आयुष्मान भारत – आरोग्य आणि कल्याण केंद्राचे उद्घाटन करण्यात आले होते.
या आर्थिक सर्वेक्षण अहवालानुसार, 31 डिसेंबर 2022 पर्यंत:
- देशभरात 1,54,070 आयुष्मान भारत – आरोग्य आणि कल्याण केंद्र कार्यान्वित आहेत.
- नागरिकांनी 135 कोटी पेक्षा अधिक वेळा या केंद्रांमधील सेवांचा लाभ घेतला आहे.
- या केंद्रांमध्ये असंसर्गजन्य आजारांशी संबंधीत 87 कोटींहून अधिक तपासण्या झाल्या आहेत.
- योगाभ्यासासह 1.6 कोटींपेक्षा अधिक आरोग्य कल्याणाविषयक सत्रांचे आयोजन झाले आहे.
- या योजनेअंतर्गत उपलब्ध करून दिलेल्या ई-संजीवनी टेलिकन्सल्टेशन या सेवेअंतर्गत, 17 जानेवारी 2023 पर्यंत देशभरातील कार्यरत असलेल्या आरोग्य आणि कल्याण केंद्रांच्या माध्यमातून 15,465 आरोग्यविषयक मध्यवर्ती सुविधा केंद्रांना (हब) (एमबीबीएस / स्पेशालिटी / सुपर स्पेशालिटी डॉक्टरांचा समावेश असलेली विभागीय स्तरावरील केंद्र) आणि अशा केंद्रांशी जोडलेल्या 1,12,987 स्थानिक आरोग्य केंद्रांना / स्पोक्सना (राज्य स्तरावरील आयुष्मान भारत – आरोग्य आणि कल्याण केंद्र) 9.3 कोटींपेक्षा जास्त संख्येने अधिक टेलि-कन्सल्टेशन / टेलिफोनद्वारे सल्लामसलत सेवा प्रदान केली गेली आहे.
आयुष्मान भारत डिजिटल अभियान (ABDM)
सर्वांसाठी खुले असलेले, कार्यान्वयासाठी एकापेक्षा अधिक जणांना हाताळता येईल / इंटरऑपरेबल अशा डिजिटल मानकांवर आधारित एक सुरक्षित ऑनलाइन व्यासपीठ तयार करून देणे हे आयुष्मान भारत डिजिटल मिशनचे उद्दीष्ट आहे. यामुळे नागरिकांना वितरीत केलेले आरोग्य ओळखपत्र, आरोग्यविषयक तज्ञांकडच्या नोंदी, आरोग्यविषयक सुविधांच्या नोंदी तसेच त्यांच्या वैयक्तिक आरोग्यविषयक नोंदी नागरीकांच्याच अनुमतीने, उपलब्ध होऊ शकतील तसेच त्यांचे आदानप्रदानही शक्य होऊ शकेल. यामुळे आरोग्यसेवा क्षेत्रात डिजिटल तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यासाठी चालना मिळू शकेल आणि पर्यायाने गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा अधिक सुलभ आणि परवडणाऱ्या होऊ शकतील.
या सर्वेक्षणानुसार, 10 जानेवारी 2023 पर्यंत या अभियानाला मिळालेले यश खाली मांडले आहे:
- 31,11,96,965 आयुष्मान भारत आरोग्य खाती (याआधी आरोग्य ओळखपत्र या नावाने ओळखले जात होते.) तयार केली गेली
- आरोग्य सेवांविषयक नोंदणीकृत पडताळणी केलेली अधिकृत आरोग्य सुविधा केंद्र : 1,92,706
- आरोग्य सेवांविषयक नोंदणीकृत तज्ञांच्या यादीतील पडताळणी केलेले अधिकृत आरोग्यविषयक तज्ञ· 1,23,442
- जोडल्या गेलेल्या आरोग्यविषयक नोंदी : 7,52,01,236
* * *
N.Chitale/T.Pawar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1895207)