माहिती आणि प्रसारण मंत्रालय
एससीओ देशांमध्ये महोत्सवातील चित्रपटांना प्रोत्साहन देण्याचा वाव आणि आव्हाने यासंदर्भात एससीओ चित्रपट महोत्सवात चर्चा
अनेक आव्हाने असूनही चित्रपट महोत्सवाच्या भविष्याबाबत परिसंवादातील सदस्यांनी व्यक्त केला आशावाद
Posted On:
30 JAN 2023 9:03PM by PIB Mumbai
मुंबई, 30 जानेवारी 2023
शांघाय सहकार्य संघटना देशांमधील चित्रपट महोत्सवांना प्रोत्साहन देण्यासाठी वाव आणि आव्हाने यावर चर्चा करून शांघाय सहकार्य संघटना चित्रपट महोत्सवातील चर्चासत्रांचा योग्य पद्धतीने समारोप झाला. सुनील दोशी, निर्माता, अलायन्स मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रा. लि.; अश्वनी शर्मा, वितरक,इम्पॅक्ट फिल्म्स ; स्वरूप चतुर्वेदी, चित्रपट निर्माता आणि सल्लागार- लायसन्सिंग सिंडिकेशन्स आणि कझाकस्तानमधील अमेली एंटरटेनमेंटच्या संस्थापक यरिस एसेल यांनी या चर्चासत्रामध्ये सहभाग घेतला.
महोत्सवातील चित्रपटांच्या आव्हानांची रूपरेषा मांडताना सुनील दोशी यांनी चित्रपट साक्षरता, पायाभूत सुविधा आणि प्रेक्षकांच्या अभिरुचीचे आकलन यांसारख्या मुद्द्यांसंदर्भात चित्रपट महोत्सवांना भेडसावणाऱ्या आव्हानांचा उल्लेख केला. समाजकेंद्रित चित्रपट बनवण्याचा सल्ला त्यांनी दिला.आधुनिक युगात महोत्सवातील चित्रपटांसाठी तंत्रज्ञान हे उत्तम सहाय्यक ठरू शकते, असे ते म्हणाले.
परिसंवादात सहभागी सदस्यांनी महोत्सवातील चित्रपटांसाठी बाजारपेठ खुली करण्याच्या शक्यतांबद्दलही आपले विचार मांडले. ओटीटी मंचाच्या आगमनानंतर संपूर्ण प्रदेशात चित्रपट लोकप्रिय करण्यासाठी निर्माण झालेले एक आशावादी चित्र यरिस एसेल यांनी या चर्चासत्रात मांडले. याव्यतिरिक्त, कझाकस्तानमध्ये भारतीय दूरचित्रवाणी मालिकांना मिळणाऱ्या लोकप्रियतेबद्दलही त्यांनी सांगितले.
एससीओ देशांमधील चित्रिकरणासाठीच्या निसर्गरम्य ठिकाणांसंदर्भात, स्वरूप चतुर्वेदी यांनी भाष्य केले. महोत्सवातील चित्रपट लोकप्रिय करण्यासाठी हे उत्प्रेरक म्हणून काम करू शकते, असे त्यांनी नमूद केले. चित्रपटाची बाजारपेठ सतत बदलत असते आणि त्यामुळे नफ्याला वाव नेहमीच राहतो याकडे त्यांनी लक्ष वेधले. चांगल्या प्रकारे बनवलेल्या चित्रपटाची कोणत्याही चित्रपट महोत्सवात निवड होण्यासाठी नेहमीच दरवाजे खुले असतात, असे मत अश्वनी शर्मा यांनी मांडले.
यानंतर या चर्चासत्रात , सुनील दोशी यांनी दृकश्राव्य अनुभव वाढविण्यासाठी तंत्रज्ञानाचा लाभ घेण्याची गरज असल्याचे नमूद केले. प्रवास अधिक परवडणारा झाल्याने लोक आता शोध घेण्यासाठी इच्छुक आहेत, असे ते म्हणाले. येत्या दशकात स्वतंत्र महोत्सव आणि चित्रपटांचा उदय होत राहील असा आशावाद व्यक्त करत या परिसंवादाचा समारोप झाला.
* * *
PIB Mumbai | N.Chitale/S.Chavan/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1894817)
Visitor Counter : 182