कृषी मंत्रालय
जी20 आंतरराष्ट्रीय वित्तीय संरचना कार्यगटाच्या बैठकीचे केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर आणि पारस यांच्या हस्ते उद्घाटन
विज्ञान आणि नवोन्मेषामुळे भारताचा झपाट्याने विकास होत आहे : तोमर
समस्याग्रस्त देशांना विकासासाठी आर्थिक पाठबळ देण्याकरता आणि आर्थिक स्थैर्य देण्यासाठी हा समूह भक्कम स्थितीत आहे : पारस
Posted On:
30 JAN 2023 5:55PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 30 जानेवारी 2023
भारताच्या जी20 अध्यक्षतेखाली पहिल्या आंतरराष्ट्रीय वित्तीय संरचना कार्यगटाच्या दोन दिवसीय बैठकीचे आज चंदीगड येथे केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याणमंत्री नरेंद्र सिंह तोमर आणि अन्न प्रक्रिया उद्योगमंत्री पशुपती कुमार पारस यांनी उद्घाटन केले. विज्ञान आणि नवोन्मेषामुळे भारताचा झपाट्याने विकास होत आहे आणि भारताच्या भवितव्याशी या दोन्ही गोष्टी मुळापासून जोडलेल्या आहेत, असे यावेळी बोलताना तोमर यांनी सांगितले. डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांची निर्मिती करण्यासाठी आम्ही तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. जागतिक आरोग्यनिगा क्षेत्रात आर्थिक समावेशनामध्ये आमचे महत्त्वाचे योगदान आहे आणि लोककेंद्रित विकास कायम राखत शाश्वत ऊर्जेच्या दिशेने वाटचाल हा आमच्या राष्ट्रीय धोरणाचा पाया आहे.ही बाब, जी20 अध्यक्षतेच्या ‘एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य’ या संकल्पनेमधले हेच तत्वज्ञान अधोरेखित करत आहे.
भारताचे जी20 अध्यक्षपद आमच्या सर्व नागरिकांसाठी अभिमानाचा क्षण आहे, त्याबरोबरच या ऐतिहासिक प्रसंगासोबत आमच्यावर आलेल्या जबाबदाऱ्यांचीही आम्हाला जाणीव आहे, असे तोमर यांनी सांगितले. सध्या जगाला,परस्परांमध्ये गुंतलेल्या आणि सीमांची मर्यादा नसलेल्या, अनेक गुंतागुंतीच्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यांचे स्वरुप जागतिक आहे आणि त्यासाठी जागतिक पातळीवरील तोडग्यांची गरज आहे, म्हणूनच जागतिक समुदायाने जागतिक समन्वयाची धोरणे आणि कृतींवर भर दिला पाहिजे. त्याचबरोबर बहुपक्षवादावर नव्याने विश्वास दाखवण्याची गरज आहे. लोकशाही आणि बहुपक्ष वादासाठी पूर्णपणे समर्पित असलेला आमचा देश केवळ बहुआयामी विकासाचे दर्शन घडवण्यासाठीच नव्हे तर सार्वत्रिक मान्यता असलेल्या सामर्थ्याचे दर्शन घडवण्यासाठी देखील सज्ज झाला आहे. अलीकडेच झालेल्या जागतिक आर्थिक मंचाच्या बैठकीत भारताचे वर्णन सातत्याने बदलणाऱ्या जगात अढळ स्थानावरील दीपस्तंभ म्हणून करण्यात आले याबद्दल आश्चर्य वाटणार नाही आणि भारताची हवामानविषयक उद्दिष्टांबाबतची वचनबद्धता आणि कोविड पश्चात विकासाच्या मार्गावर जोमाने सुरू असलेली वाटचाल याबद्दल सर्वांकडून प्रशंसा होत आहे.
आपल्यावर सोपवण्यात आलेली जबाबदारी पार पाडण्यासाठी भारत पूर्णपणे सज्ज आहे, असे तोमर म्हणाले. विकासाच्या आदर्शाबाबतचा आमचा दृष्टीकोन इतरांसोबत सामाईक करण्यास आम्हाला आनंद होईल, त्याचबरोबर इतरांकडून मार्गदर्शन मिळण्याची देखील आम्हाला अपेक्षा आहे. यावर्षीच्या प्राधान्याच्या बाबी आणि फलप्राप्तीच्या माध्यमातून, आमच्या विचारमंथनातून वास्तविक जागतिक तोडगे काढण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. हे करत असताना विकसनशील देशांचा आवाज बुलंद करण्याचे काम देखील आम्ही पूर्ण समरसतेने करत राहू. आम्ही आता कोणालाही मागे ठेवू शकत नाही. आमच्या समावेशक, महत्त्वाकांक्षी, कृती आधारित आणि निर्णायक जी20 जाहीरनाम्याद्वारे वसुधैव कुटुंबकम ही आमच्या उद्दिष्टाची वास्तविक भावना व्यक्त करण्याचे आमचे लक्ष्य आहे.
अलीकडच्या काही वर्षात सर्वाधिक आपत्तीप्रवण आणि अल्प उत्पन्न असलेल्या विकसनशील देशांना मदत करण्यामध्ये या गटाने दिलेल्या असामान्य योगदानाचा उल्लेख करत ते म्हणाले की कर्जाच्या पुरवठ्याबाबत वाढती असुरक्षा दूर करण्यासाठी हाती घेतलेल्या उपाययोजना विशेषत्वाने दखल घेण्याजोग्या आहेत. या प्रयत्नांना मोठ्या प्रमाणावर मिळालेली चालना 2023 मध्ये भारताच्या अध्यक्षतेच्या काळातही सुरु राहील. जागतिक आणि वित्तीय शासनाची नव्याने रचना करण्यासाठी या गटाच्या आश्वासक स्थितीचा लाभ कसा करून घेता येईल यावर देखील हा गट विचार करेल. भारताच्या अध्यक्षतेखाली हा गट विकासाच्या कारक घटक असलेल्या बहुस्तरीय विकास बँकांना 21व्या शतकातील जागतिक आव्हानांना तोंड देण्यासाठी अधिक चांगल्या प्रकारे कसे सज्ज करता येईल याचा शोध घेण्याचा प्रयत्न करेल. यावेळी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे त्यांनी स्मरण केले आणि त्यांची वचने उद्धृत केली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय नागरिकांच्या वतीने सर्व प्रतिनिधींचे स्वागत केले आणि ही बैठक यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी बोलताना केंद्रीय मंत्री पशुपती पारस म्हणाले की विधायक संवादासाठी, ज्ञानाची निर्मिती आणि त्याची परस्परांमध्ये देवाणघेवाण आणि सुरक्षित, शांततामय आणि समृद्ध जगासाठी एकत्रित आकांक्षेची देवाणघेवाण करण्याचा भारताचा या बैठकीत प्रयत्न राहील. आपल्याला या दिशेने एकत्र काम करायचे आहे. भारताच्या जी20 अध्यक्षतेदरम्यान प्रगतीची प्रक्रिया पुढे सुरू ठेवण्याची आपल्यावर जबाबदारी आहे आणि गंभीर आव्हानांना तोंड देण्यासाठी आज आंतरराष्ट्रीय आर्थिक संरचना पूर्णपणे सज्ज आहे आणि समस्याग्रस्त गटांना जास्तीत जास्त पाठबळ देण्यासाठी पूर्णपणे सुसज्ज आहे हे सुनिश्चित करण्याची गरज आहे असे पारस यांनी सांगितले. कर्जपुरवठ्याची बिकट होत जाणारी स्थिती सुधारण्यासाठी धोरणात्मक पुढाकार कशा प्रकारे उपयुक्त ठरतील यावर कार्यगटाला चर्चा करता येईल. जगभरातील विविध क्षेत्रातील तज्ञांच्या एकत्रित उपस्थितीमुळे, आंतरराष्ट्रीय आर्थिक आराखडा कार्य गट विकासकामांना अर्थसहाय्य करण्याच्या जी20च्या प्रयत्नांममध्ये समन्वय, समस्याग्रस्त देशांना पाठबळ, आर्थिक स्थैर्य कायम राखणे आणि एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी भारत सज्ज झाला आहे. या बैठकीला आयएफएचे सहअध्यक्ष विल्यम रुस(फ्रान्स), ब्युंगसिक जुंग( दक्षिण कोरिया), केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या अतिरिक्त सचिव मनिषा सिन्हा, आरबीआयच्या सल्लागार महुआ राय आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
* * *
N.Chitale/S.Patil/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1894750)
Visitor Counter : 269