पर्यावरण, वन एवं जलवायु परिवर्तन मंत्रालय
शाश्वत विकासाचे मार्ग शोधण्याबाबत भूपेंद्र यादव यांनी जर्मन शिष्टमंडळासोबत घेतली बैठक
Posted On:
30 JAN 2023 2:25PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 30 जानेवारी 2023
नवी दिल्लीत आज जर्मन फेडरल संसदेच्या (बुंडेस्टॅग)जर्मन-भारतीय संसदीय गटासाठी, केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांच्या नेतृत्वाखालील भारतीय शिष्टमंडळ आणि राल्फ ब्रिंकहॉस यांच्या नेतृत्वाखालील जर्मन शिष्टमंडळ यांच्यात द्विपक्षीय बैठक झाली.
शाश्वत विकासाचे मार्ग शोधण्यासह विशेषत: चक्राकार अर्थव्यवस्थेवर लक्ष केंद्रित करणे,एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकची समस्या, वन व्यवस्थापन आणि हवामान बदलाच्या संकटात टिकून राहणे यावर या बैठकीत आमची चर्चा केंद्रित होती असे यादव यांनी सांगितले.
या बैठकीत, जर्मन शिष्टमंडळाने हवामान बदलाचा जंगलांवर होणारा परिणाम, आफ्रिकेतील पर्यावरण आणि हवामानसंदर्भात त्रिपक्षीय सहकार्य, चक्राकार अर्थव्यवस्था, प्लॅस्टिकला पर्याय आणि या क्षेत्रांमध्ये द्विपक्षीय सहकार्य कशाप्रकारे विकसित करू शकतात यासंबंधीचे मुद्दे उपस्थित केले.
जर्मन शिष्टमंडळाने उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देताना यादव यांनी, पंतप्रधानांनी पर्यावरणस्नेही जीवनशैलीसाठी सुरू केलेल्या लाईफ(LiFE) अभियानाच्या महत्त्वावर भर दिला. प्लॅस्टिक कचऱ्याच्या समस्येवर मात करण्यासाठी भारताने उचललेली विविध पावले, प्लास्टिकला पर्याय, लुप्त होत चाललेल्या प्रजाती आणि जंगलांचे संवर्धन, वन सर्वेक्षण, कृषी वनीकरण याचा त्यांनी उल्लेख केला. यादव यांनी द्विपक्षीय सहकार्याच्या माध्यमातून तंत्रज्ञान, पाणी, चक्राकार अर्थव्यवस्था, वनीकरण या क्षेत्रात जर्मनीने केलेले प्रयत्न अधोरेखित करत त्याची प्रशंसा केली.
बैठकीचा समारोप करताना, उभय देशांचे अनेक क्षेत्रांमध्ये असलेले समान हितसंबंध आणि जैवविविधता, हवामान बदल, ऊर्जा तंत्रज्ञान यासारख्या नवीन क्षेत्रांमध्ये द्विपक्षीय सहकार्य बळकट करण्यासाठी आणि त्यासाठी मार्ग शोधण्याच्या दृष्टीने दोन्ही बाजूंनी सहमती दर्शवण्यात आली.
* * *
R.Aghor/S.Chavan/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1894671)
Visitor Counter : 256