कृषी मंत्रालय
G-20 आंतरराष्ट्रीय वित्तीय संरचना कार्यगटाची बैठक येत्या 30 आणि 31 जानेवारीला चंडीगढ इथे होणार
केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर आणि अन्नप्रक्रिया उद्योग मंत्री पशुपती कुमार पारस यांच्या हस्ते बैठकीचे उद्घाटन होणार
Posted On:
29 JAN 2023 10:22PM by PIB Mumbai
भारताच्या जी-20 च्या अध्यक्षतेखाली, आंतरराष्ट्रीय वित्तीय संरचना कार्य गटाची पहिलीच बैठक उद्या आणि परवा म्हणजेच 30-31जानेवारी रोजी, चंडीगढ इथे होणार आहे. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर आणि अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री पशुपती कुमार पारस यांच्या हस्ते या बैठकीचे उद्घाटन होईल.
आंतरराष्ट्रीय वित्तीय संरचना कार्य गट हा जी-20 वित्तीय ट्रॅकच्या अंतर्गत येणारा एक महत्वाचा गट आहे. या गटाचे उद्दिष्ट, आंतरराष्ट्रीय वित्तीय संरचना अधिक मजबूत करणे हे आहे. तसेच, दुर्बल आणि असुरक्षित देशांना भेडसावणाऱ्या विविध आव्हानांचा सामना करणे हे ही या कार्यगटाचे उद्दिष्ट असेल. या दोन दिवसीय बैठकीत जी-20 सदस्य राष्ट्रे, आमंत्रित देश आणि आंतरराष्ट्रीय संघटनांचे सुमारे 100 प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.
या बैठकीत स्थैर्य आणि आंतरराष्ट्रीय आर्थिक संरचनेचे एकत्रीकरण करण्याविषयी आणि 21व्या शतकातील जागतिक आव्हाने पेलण्यास ही संरचना सक्षम करण्यावर चर्चा होईल. गरीब आणि दुर्बल देशांना जास्तीत जास्त मदत करण्याचे मार्ग शोधण्यावर देखील या बैठकीत लक्ष केंद्रित केले जाईल. जी 20 कार्यगटाच्या 30 जानेवारी रोजी होणाऱ्या बैठकी दरम्यान ‘मध्यवर्ती बँक डिजिटल चलन: संधी आणि आव्हाने’ हा कार्यक्रम देखील आयोजित केला जाईल. मध्यवर्ती बँक डिजिटल चलनासंबंधीच्या अनुभवांची इतर देशांशी आदानप्रदान आणि आपापल्या देशातील याविषयीचे अनुभव सांगून, सीबीडीसीच्या व्यापक परिणामांची सखोल समज विकसित करणे, हे आहे. या बैठकीपूर्वी, चंडीगढ शहरात, इतर अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. ज्यातून भारताच्या अध्यक्षपदाच्या काळात जी-20 मध्ये लोकांचा सहभाग आणि रुची वाढू शकेल.
भारताच्या जी-20 अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत, हा कार्य गट मार्च, जून आणि सप्टेंबर महिन्यात पुन्हा भेटणार आहे. तसेच, भारताने या अध्यक्षपदाच्या काळात निश्चित केलेल्या प्राधान्यक्रमांवर या बैठकांमध्ये चर्चा होईल.
***
N.Chitale/R.Aghor/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1894560)
Visitor Counter : 199