माहिती आणि प्रसारण मंत्रालय
शांघाय सहकार्य संघटना चित्रपट महोत्सवादरम्यान, ‘अॅनिमेशनचा वापर करुन, अमर्याद जगांची निर्मिती” या विषयावर परिसंवाद
देशातील अॅनिमेशन उद्योगावरील सत्रात, भारतातील लोककथांविषयीच्या आकर्षणाचा मुद्दा अधोरेखित
Posted On:
28 JAN 2023 5:50PM by PIB Mumbai
शांघाय सहकार्य संघटना चित्रपट महोत्सवाच्या आजच्या पहिल्या दिवशी, ‘अॅनिमेशनचा उपयोग करुन, अमर्याद जगाची निर्मिती’ या विषयावरील परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. ग्राफिटी मल्टीमीडियाचे संचालक आणि सीओओ मंजुल श्रॉफ, आणि टून्झ अॅनिमेशनचे मुख्य कार्यकारी अधिकरी जयकुमार प्रभाकरन यांनी भारतीय अॅनिमेशन उद्योगात काम करण्याचा अनुभव आणि त्याच्या वाढीसाठीचे त्यांचे द्रष्टे विचार यावेळी मांडले.
यावेळी मंजुल श्रॉफ यांनी त्यांचीच लोकप्रिय कलाकृती ‘दीपा अँड अनूप” याविषयी माहिती दिली. भारतीय आशयाशी आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांना जोडणे, हा ही मालिका बनवण्यामागचा प्रमुख हेतू होता, असे ते म्हणाले. तसेच, या मालिकेत, लिझा गोल्डमनला आणून त्यात, थोडा अमेरिकन टच देण्याचा आपण प्रयत्न केला आणि, या चित्रपटात केवळ भारतीयच असणार नाही, तर इतरांनाही संधी मिळेल, हे ही सुनिश्चित केले, असे श्रॉफ यांनी सांगितले.
तर, जयकुमार प्रभाकरन यांनी, या अॅनिमेशन आशयातून सामाजिक परिस्थितीवर भाष्य करण्याची संधी मिळते असा विचार मांडला. मुले कार्टून कार्यक्रमातल्या कॅरेक्टरच्या सवयी कशा आत्मसात करतात, याचे दाखले त्यांनी दिले. म्हणूनच सिनेमा आणि टीव्ही, कोणत्याही समाजात सांस्कृतिक बदल घडवून आणत असतात, असेही ते पुढे म्हणाले.
भारतीय लोककथा आणि लोकगीतांनी जगभरातील प्रेक्षकांचे लक्ष कसे वेधून घेतले आहे यावरही या सत्रात चर्चा झाली. तेनालीरामन आणि अकबर-बिरबल यांसारख्या पात्रांनी अनेक पिढ्यांचे कल्पनाविश्व समृद्ध झाले आहे. आघाडीच्या जागतिक ब्रँड आणि वितरकांसोबतची भागीदारी आर्थिकदृष्ट्या अव्यवहार्य असल्याने स्थानिक आशयाचा प्रचार करण्यासाठी करिअरच्या सुरुवातीला अनेक आव्हाने आली, असे अनुभवही मान्यवरांनी यावेळी सांगितले.
व्हिसलिंग वुड्स इंटरनॅशनलचे उपाध्यक्ष चैतन्य चिंचलकर यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, या चर्चेत भारतीय अॅनिमेशन उद्योगाच्या वाढीचा आणि भविष्यातील आराखड्याचा मागोवा घेण्यात आला.
***
S.Kakade/R.Aghor/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1894318)
Visitor Counter : 152