इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती-तंत्रज्ञान मंत्रालय (मेइटी)च्या 'समीर' या संशोधन आणि विकास संस्थेने सिमेन्स हेल्थिनीअर्ससोबत भारत एमआरआय तंत्रज्ञानावर केला सामंजस्य करार – सखोल तंत्रज्ञान आधारित आरोग्य सेवा संशोधन- विकास आणि पुरवठा साखळी परिसंस्था तयार करण्यासाठी महत्त्वाचा टप्पा
प्रविष्टि तिथि:
27 JAN 2023 10:18PM by PIB Mumbai
इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती-तंत्रज्ञान (मेइटी) मंत्रालयाच्या समीर या भारतातील प्रमुख संशोधन आणि विकास संस्थेने आज बेंगळुरू येथे सिमेन्स हेल्थिनीअर्ससोबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. या करारामुळे भारतामध्ये आरोग्यसेवा आणि निदान उपलब्धतेत प्रगती करण्यासाठी नवीन, सुधारित आणि नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाच्या विकासासाठी योगदान मिळेल.

समीर आणि सीमेन्स यांच्यातील सामंजस्य करारावर स्वाक्षरी करताना इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान तसेच कौशल्य विकास आणि उद्योजकता राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर उपस्थित होते.
त्यांनी या धोरणात्मक कराराचे स्वागत केले. गुणवत्ता प्रदान करण्याच्या पंतप्रधानांच्या दृष्टीकोनाचा एक भाग म्हणून कमी किमतीत एमआरआय उपलब्ध करून दिला जाईल, आणि प्रत्येक भारतीयासाठी परवडणारी आरोग्य सेवा आणि रोगनिदान उपलब्धता असेल असे राजीव चंद्रशेखर म्हणाले.
2015 मध्ये पंतप्रधानांनी सुरू केलेल्या डिजिटल इंडिया कार्यक्रमाने तंत्रज्ञानाचा ग्राहक असलेल्या भारताला तंत्रज्ञान, उपकरणे या उत्पादनांचा उत्पादक बनवण्याचा मार्ग मोकळा केला आहे यावर भर देऊन मंत्री म्हणाले, “आजचा सामंजस्य करार या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.”
भारतातील हेल्थकेअर क्षेत्र हे मोठ्या बाजारपेठेचे प्रतिनिधित्व करत असल्याचे त्यांनी पुढे सांगितले. भारतात उत्पादन केंद्र स्थापन करण्यास इच्छुक असलेल्या जागतिक कंपन्यांशी भागीदारी करण्यास सरकार तयार आहे. आम्ही जागतिक कंपन्या आणि भारतातील शैक्षणिक संस्थांचे विशाल जाळे यांच्यातील सह-विकासावर आधारित संशोधन आणि विकास मॉडेलचे समर्थन करत आहोत, अशी माहिती त्यांनी दिली.
सेमीकंडक्टर क्षेत्रातील उद्योगातील नेते आणि शिक्षणतज्ज्ञ यांच्याबरोबर सरकार कसे जवळून काम करत आहे याचे उदाहरण त्यांनी दिले. भारतातील पुढच्या पिढीतील प्रतिभांना तयार करण्यासाठी सरकार आरोग्य क्षेत्रातील तज्ञांसोबत बसून अभ्यासक्रम तयार करण्यास तयार आहे, असे ते म्हणाले.

सोसायटी फॉर अप्लाइड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियरिंग अँड रिसर्चचे संक्षिप्त रूप म्हणजे समीर आहे. आरएफ मायक्रोवेव्ह रडार आणि कम्युनिकेशन सिस्टम्स, ई-3 चाचणी आणि वैद्यकीय इलेक्ट्रॉनिक्स याच्या धोरणात्मक भागीदारीसाठी ही संस्था प्रसिद्ध आहे.
समीर आणि सीमेन्स हेल्थिनीअर्सच्या आरोग्य सेवा तंत्रज्ञानामध्ये विशेषत: मॅग्नेटिक रेझोनान्स इमेजिंग (एमआरआय) आणि लिनियर एक्सलरेटर्स (LINAC) मधील कौशल्य एकत्रित करताना संयुक्त उपक्रम राबविला जाणार आहे. त्यामुळे भारतात एमआरआयची उपलब्धता सुधारेल, असे त्यांनी सांगितले. “सिमेन्स हा भारताचा केवळ आरोग्य सेवेतच नव्हे तर इतर क्षेत्रातही चांगला भागीदार आहे,” असे ते पुढे म्हणाले.
***
S.Patil/P.Jambhekar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1894232)
आगंतुक पटल : 295