संरक्षण मंत्रालय
‘वीर गाथा 2.0’ स्पर्धेतील सुपर 25 पुरस्कार विजेत्यांचा संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते सत्कार
19 लाखांहून अधिक बालकांच्या सहभागाने वीर गाथा प्रकल्प एक चळवळ बनल्याचे राजनाथ सिंह यांचे प्रतिपादन
Posted On:
25 JAN 2023 10:27PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 25 जानेवारी 2023
प्रजासत्ताक दिन 2023 च्या पूर्वसंध्येला, 25 जानेवारी 2023 रोजी नवी दिल्ली येथे आयोजित कार्यक्रमात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी वीर गाथा 2.0 च्या 25 विजेत्यांचा सत्कार केला. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा एक भाग म्हणून संरक्षण मंत्रालय आणि शिक्षण मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात आलेल्या वीर गाथा-1 च्या अभूतपूर्व यशस्वितेच्या पार्श्वभूमीवर वीर गाथा 2.0 चे आयोजन करण्यात आले होते.
राजनाथ सिंह यांनी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि संरक्षण राज्य मंत्री अजय भट्ट यांच्या उपस्थितीत विजेत्यांना 10,000 रुपये रोख बक्षीस, पदक आणि प्रमाणपत्र यांचे वितरण केले. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान, हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल व्ही आर चौधरी, नौदल प्रमुख ऍडमिरल आर हरी कुमार, लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे, संरक्षण सचिव गिरीधर अरमाने हे देखील यावेळी उपस्थित होते. आर्मी पब्लिक स्कूल आणि कॅन्टोन्मेंट बोर्डातील 100 हून अधिक एनसीसी कॅडेट्स आणि विद्यार्थी उपस्थित होते, 500 हून अधिक शाळांमधील विद्यार्थी आणि शिक्षक आभासी माध्यमातून सहभागी झाले होते.
युवा विजेत्यांचे अभिनंदन करताना, संरक्षणमंत्र्यांनी त्यांच्या शौर्याचे, उत्साहाचे आणि सर्जनशीलतेचे कौतुक केले आणि तरुण पिढी स्वतःबरोबरच समाज आणि राष्ट्रालाही एक नवीन आणि चांगली दिशा देईल असा विश्वास व्यक्त केला.
तरुण विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची मूल्ये जागृत करण्यात वीर गाथेच्या भूमिकेचे कौतुक करून राजनाथ सिंह म्हणाले की, असे प्रकल्प विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणासोबत नैतिकता आणि शौर्य ही मूल्ये रुजवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतील. अलीकडच्या काळात, सरकारने अनेक पावले उचलली आहेत, ज्यामुळे आगामी काळात आपल्या बालकांचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होईल, असेही ते म्हणाले.
वीर गाथेच्या वाढत्या लोकप्रियतेवर प्रकाश टाकून राजनाथ सिंह म्हणाले की, या प्रकल्पाला अल्पावधीत प्रचंड लोकप्रियता मिळाली आणि ती एक चळवळ बनली आहे.
“गेल्या वर्षी 8 लाख जणांनी सहभाग नोंदवला, तर यावेळी 19 लाखांहून अधिक प्रवेशिका आल्या. अल्पावधीतच ते लाखो बालकांपर्यंत पोहोचू शकले आहे. अशा प्रकारे एक चळवळ बनते,” संरक्षण मंत्र्यांनी सांगितले.
राजनाथ सिंह यांनी अधोरेखित केले की कोट्यवधी बालके या प्रकल्पाशी अप्रत्यक्षपणे जोडली गेली जे या प्रकल्पाचे उद्दिष्ट देखील आहे. देशातील बालकांशी जोडले जाणे, त्यांना प्रेरित करणे म्हणजे राष्ट्र उभारणी होय, असेही ते म्हणाले.
“कोणत्याही बांधकामासाठी, मग ती इमारत असो, समाज असो, संस्था असो किंवा राष्ट्र असो, एकात्मता ही पहिली गरज आहे. एकत्रीकरणाच्या प्रक्रियेशिवाय काहीही उभारले जाऊ शकत नाही. हा प्रकल्प देशभरातील बालकांना भारतीयत्वाच्या दीर्घकालीन परंपरेशी जोडत आहे आणि त्यांचे व्यक्तिमत्त्व घडवत आहे. आपण मुलांचे व्यक्तिमत्त्व जितके चांगले घडवू, तितकी राष्ट्रनिर्मिती अधिक चांगली आणि मजबूत होईल, असे राजनाथ सिंह म्हणाले.
दैनंदिन जीवनात शौर्याचे महत्त्व अधोरेखित करताना संरक्षण मंत्री म्हणाले, “जेव्हा मी शौर्य आणि धैर्याबद्दल बोलतो तेव्हा त्याचा मथितार्थ फक्त युद्धभूमीवरील शौर्य आणि धैर्य असा होत नाही. हे सद्गुण दैनंदिन जीवनात अत्यंत आवश्यक आहेत. फक्त बाण आणि तलवारी वापरणे हे धाडस नाही. कुठे काही गैर घडत असेल तर त्याविरुद्ध आवाज उठवणे हेही मोठे शौर्य आणि धाडसाचे काम आहे.”
राजनाथ सिंह पुढे म्हणाले की, महात्मा गांधी, चंद्रशेखर आझाद, खुदीराम बोस, अशफाक उल्ला खान यांसारख्या महान व्यक्ती आयुष्यभर सत्य बोलत राहिल्या, मग त्यासाठी त्यांना कोणतीही जोखीम उचलावी लागली तरीही.
हा प्रकल्प अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावा यासाठी राज्य आणि जिल्हा स्तरावरही अशा सत्कार सोहोळ्याचे आयोजन करण्यात यावे, अशी सूचनाही संरक्षण मंत्र्यांनी केली.
वीर गाथा प्रकल्पाची संकल्पना मांडल्याबद्दल संरक्षण मंत्रालयाचे आभार मानताना, शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी यावर भर दिला की दोन्ही मंत्रालयांचे संयुक्त प्रयत्न योग्य दिशेने वाटचाल करत आहेत, कारण यामुळे देशभरातील सर्व वयोगटातील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.
धर्मेंद्र प्रधान म्हणाले की, वीर गाथा प्रकल्प राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 ची उद्दिष्टे आणि आकांक्षांशी पूर्णपणे सुसंगत आहे आणि आपल्या इतिहासाचा आणि संस्कृतीचा अभिमान बाळगण्यासाठी स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंचप्रणद्वारे (पाच संकल्पांद्वारे) यावर पुन्हा जोर दिला आहे.
"मोठ्या प्रमाणावर दुर्लक्षित आणि विस्मरणात गेलेल्या विविध प्रदेशातील मातृभूमीसाठी हौतात्म्य पत्करणाऱ्या शूरवीरांचे शौर्य आमच्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकांमध्ये अधोरेखित करण्यासाठी अधिक प्रयत्नांची गरज आहे," असेही ते म्हणाले.
विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्यासाठी शौर्य पुरस्कार विजेत्यांच्या कथा शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याचे आवाहन धर्मेंद्र प्रधान यांनी केले.
या प्रसंगी, परमवीर चक्र पुरस्कारप्राप्त सुभेदार मेजर संजय कुमार यांनी कारगिल युद्धाची त्यांची सत्यकथा सांगितली जिथे त्यांनी सर्व अडचणींवर मात केली आणि भारताच्या ऐतिहासिक विजयात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. वैयक्तिक सुरक्षेची पर्वा न करता निःस्वार्थपणे मातृभूमीची सेवा करणाऱ्या शूर सैनिकांकडून प्रेरणा घेण्यास त्यांनी बालकांना प्रोत्साहन दिले.
S.Patil/V.Joshi/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1893811)
Visitor Counter : 231