शिक्षण मंत्रालय
परीक्षा पे चर्चा हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरु केलेला अत्यंत अभिनव आणि लोकप्रिय उपक्रम असून या उपक्रमाने विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढविण्यास, तणावाचे व्यवस्थापन करण्यास तसेच निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यास मदत केली आहे : केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान
Posted On:
24 JAN 2023 9:18PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 24 जानेवारी 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परीक्षा पे चर्चा या लोकप्रिय कार्यक्रमाच्या निमित्ताने केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज पत्रकार परिषदेला संबोधित केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमात विद्यार्थी, पालक आणि शिक्षकवर्ग पंतप्रधानांशी जीवन आणि परीक्षा यांच्याशी संबंधित विविध मुद्द्यांवर संवाद साधतात. या कार्यक्रमाचा या वर्षीचा भाग 27 जानेवारी 2023 रोजी सकाळी 11 वाजता नवी दिल्ली येथील तालकटोरा स्टेडीयममध्ये आयोजित करण्यात आल आहे. दूरदर्शन आणि इतर महत्त्वाच्या दूरचित्रवाणी वाहिन्यांवर या कार्यक्रमाचे थेट प्रसारण करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाच्या आयोजनाविषयी प्रसारमाध्यम प्रतिनिधींना माहिती देताना केंद्रीय मंत्री प्रधान यांनी परीक्षेचा ताण कमी करण्यात, या कार्यक्रमाला लोक चळवळीच्या रुपात सशक्त करण्यात आणि यावर्षीच्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांचा सहभाग वाढविण्यात उपयुक्त ठरण्यासाठी या कार्यक्रमाला असलेल्या महत्त्वाबाबत चर्चा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरु केलेल्या या अत्यंत अभिनव आणि लोकप्रिय उपक्रमाने विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढविण्यास, तणावाचे व्यवस्थापन करण्यास तसेच निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यास मदत केली आहे, असे ते म्हणाले. तालकटोरा स्टेडीयममध्ये सुमारे 2400 विद्यार्थ्यांना पंतप्रधानांच्या विद्वत्तापूर्ण सल्ल्यांचा थेट लाभ होणार आहे. त्याच वेळी काही कोटी विद्यार्थी आपापल्या शाळांमध्ये या कार्यक्रमाचे थेट प्रसारण पाहतील असे त्यांनी सांगितले.
या वर्षी या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी सुमारे 38.80 लाख नोंदण्या झाल्या असून त्यामध्ये राज्य शिक्षण मंडळांच्या 16 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांचा समावेश आहे अशी माहिती केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिली. यावर्षी जगभरातील 155 देशांतील विद्यार्थ्यांनी नोंदण्या केल्या आहेत,या कार्यक्रमात चर्चा करण्यासाठी सुमारे 20 लाख प्रश्न पाठविण्यात आले असून एनसीईआरटीने त्यापैकी, कौटुंबिक ताण, तणाव व्यवस्थापन, चुकीच्या पद्धतींना प्रतिबंध, निरोगी आणि तंदुरुस्त कसे राहावे, कारकिर्दीची निवड इत्यादी विविध विषयांशी संबंधित निवडक प्रश्नांची सूची तयार केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2018 मध्ये ‘एग्झाम वॉरियर्स’ अर्थात ‘परीक्षेचे योद्धे’ हे पुस्तक लिहिले याचा त्यांनी ठळक उल्लेख केला. या पुस्तकाला मिळालेले अभूतपूर्व यश लक्षात घेऊन आता हे पुस्तक 11 भारतीय भाषांमध्ये प्रकाशित करण्यात येत आहे असे ते म्हणाले.
पी.पी.सी-2023ची नांदी म्हणून नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त 23 जानेवारी 2023 रोजी देशातील 500 जिल्ह्यांमध्ये चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. पंतप्रधानांच्या ‘एग्झाम वॉरियर्स’ या पुस्तकात सांगितलेले मंत्र या स्पर्धेसाठी संकल्पना म्हणून विद्यार्थ्यांना देण्यात आले होते अशी माहिती केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिली.
S.Kane/S.Chitnis/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1893405)
Visitor Counter : 235