विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
आयआयएसएफ, भोपाळ इथल्या स्टार्ट अप परिषदेत, आरोग्य, कृषी, औद्योगिक तंत्रज्ञान, माहिती-प्रसारण, वाहतूक आणि शिक्षण अशा क्षेत्रातील 300 डीप टेक प्रयोग, त्यांच्या तंत्रज्ञान-अभिनव उत्पादने आणि तंत्रज्ञानाच्या प्रात्याक्षिकासह दाखवले जातील- केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह
जितेंद्र सिंह यांनी नवी दिल्लीत सहा मंत्रालये आणि विभागांच्या संयुक्त बैठकीत 21 ते 24 जानेवारी 2023 दरम्यान होणाऱ्या आयआयएसएफच्या तयारीचा घेतला आढावा
Posted On:
18 JAN 2023 9:42PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 18 जानेवारी 2023
मध्यप्रदेशात भोपाळ इथे होणाऱ्या भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सवातील (IISF)- स्टार्ट अप परिषदेत 300 डीप-टेक प्रयोगांच्या यशोगाथा प्रात्यक्षिकासह दाखवल्या जातील, अशी माहिती, केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) जितेंद्र सिंह यांनी दिली आहे. आरोग्य, कृषी, औद्योगिक तंत्रज्ञान, माहिती तंत्रज्ञान, वाहतूक आणि शिक्षण अशा विविध क्षेत्रातील, तंत्रज्ञानयुक्त अभिनव प्रयोग आणि तंत्रज्ञानाचा वापर केलेल्या प्रयोगांचा यात समावेश असेल.
विज्ञानाशी संबंधित सहा मंत्रालये आणि विभागांच्या आज नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत त्यांनीय आज आयआयएसएफ भोपाळच्या तयारीचा आढावा घेतला. येत्या 21 ते 24 जानेवारी 2023 दरम्यान ही परिषद होणार असून, त्यात स्टार्ट अप आणि एकात्मिक संशोधन आणि विकासावर भर दिला जाणार आहे. आज झालेल्या बैठकीला, विज्ञान आणि तंत्रज्ञान, जैवतंत्रज्ञान, सीएसआयआर, पृथ्वी विज्ञान, अवकाश आणि अणुऊर्जा अशा मंत्रालयांचे प्रतिनिधी उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2015 मध्ये लाल किल्ल्यावरून दिलेल्या भाषणात, स्टार्ट-अप इंडिया आणि स्टँड-अप इंडियाचा नारा दिल्यापासून भारतातील स्टार्ट-अप व्यवस्थेला गती मिळाली आणि देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी नवीन दृष्टीकोन मिळाला आहे, याबद्दल, डॉ जितेंद्र सिंह यांनी आनंद व्यक्त केला.

2014 मध्ये देशात, सुमारे 350 स्टार्ट अप कंपन्या होत्या, मात्र ऑगस्ट 2022 पर्यंत ही संख्या 75000 पर्यंत पोहोचली. तर त्यानंतरच्या काही महिन्यातच, ही संख्या 75,000 वरुन 88,000 पर्यंत पोहोचली असून आज देशातील 653जिल्ह्यात स्टार्ट अप कंपन्या पसरल्या आहेत. या सतत वाढत असलेल्या क्षेत्राने, देशात नऊ लाखांपेक्षा अधिक नोकरीच्या संधी निर्माण केल्या आहेत, असे त्यांनी सांगितले.
भारतात आज 107 युनिकॉर्न ( अशा कंपन्या,ज्यांचे मूल्य 1 अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक असून त्यांची शेयर बाजारात नोंदणी झालेली नाही) कंपन्या असून, त्यापैकी 23 कंपन्या 2022 मध्ये तयार झालेल्या आहेत, असेही त्यांनी सांगितले. आंतरराष्ट्रीय आकडेवारीनुसार, नोव्हेंबर 2022 पर्यंत, अमेरिका स्टार्ट अप कंपन्यांच्या यादीत, 704 युनिकॉर्नसह, पहिल्या क्रमांकावर आहे. त्यापाठोपाठ चीनमध्ये 243 युनिकॉर्न असून, भारत या स्पर्धेत झपाट्याने पुढे जात आहे, असेही सिंह म्हणाले.

भोपाळ इथं होणाऱ्या स्टार्ट-अप परिषदेमध्ये इनक्युबेशन सेवा आणि सामायिक पायाभूत सुविधा प्रदान करणाऱ्या कंपन्यांचे प्रदर्शन असेल. तसेच, सहकारी कंपन्यांकडून शिक्षण, नेटवर्किंग आणि कंपनीत वापरल्या सर्वोत्तम पद्धतींचे आदानप्रदान केले जाईल. तसेच, स्टार्ट-अप, त्यांना पाठबळ देणारे आणि इतर भागधारक यांच्यात चर्चा केली जाईल. त्याशिवाय, स्टार्ट अप स्थापन करण्यासाठीचे मार्गदर्शन, या क्षेत्रातील संधी कशा मिळवायच्या हे सांगत अशा संधी देखील उपलब्ध केल्या जातील, असेही डॉ सिंह म्हणाले.

N.Chitale/R.Aghor/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1892070)
Visitor Counter : 224