संरक्षण मंत्रालय
भारत फ्रान्स द्विपक्षीय 21वा नौदल सराव ‘वरुण’ -2023
Posted On:
16 JAN 2023 5:24PM by PIB Mumbai
भारतीय आणि फ्रान्स नौदलाच्या द्विपक्षीय संयुक्त युद्ध सराव ‘वरुण’ च्या 21 व्या आवृत्तीला आज 16 जानेवारी 2023 रोजी अरबी समुद्रात प्रारंभ झाला. भारत आणि फ्रान्स यांच्या नौदलांच्या द्वैवार्षिक संयुक्त युध्द सरावाच्या उपक्रमाची सुरुवात 1993 मध्ये करण्यात आली. वर्ष 2001 मध्ये या सरावाला वरुण असे नाव देण्यात आले आणि आता हा संयुक्त सराव भारत आणि फ्रान्स या देशांमधील धोरणात्मक द्विपक्षीय संबंधांचा अविभाज्य भाग झाला आहे.
या सरावात स्वदेशी गाईडेड क्षेपणास्त्र स्टेल्थ विनाशक आय एन एस चेन्नई, गाईडेड मिसाइल फ्रिगेट आय एन एस तेग, सागरी गस्ती विमान P-8I आणि डॉर्नियर, नौदलाचे अविभाज्य अंग असलेले हेलिकॉप्टर आणि MiG29K लढाऊ विमान यांचा समावेश आहे. फ्रेंच नौदलाचे प्रतिनिधित्व ,विमानवाहू जहाज चार्ल्स डी गॉल, फ्रिगेट्स एफएस फॉरबिन आणि प्रोव्हन्स, सपोर्ट व्हेसल एफ एस मार्ने आणि सागरी गस्ती विमान अटलांटिक करणार आहेत. हा सराव 16 ते 20 जानेवारी 2023 या पाच दिवसांच्या कालावधीत होणार आहे, यामध्ये अत्याधुनिक हवाई सराव, सामरिक युद्धाभ्यास, पृष्ठभागावरील गोळीबार, इंधन, युद्धसामग्री आणि इतर सागरी घडामोडी यात अनुभवायला मिळतील. दोन्ही नौदलाचे जवान, सागरी क्षेत्रात त्यांच्या परिचालनविषयक कौशल्यांना अधिक निपुण करून त्यात वाढ करण्याचा प्रयत्न करतील तसेच एकात्मिक शक्ती म्हणून कार्य करताना सागरी संरक्षण मोहिमांमध्ये परस्पर-कार्यक्षमता वाढविणे आणि या प्रदेशात शांतता, सुरक्षितता आणि स्थैर्य स्थापन करण्याप्रती त्यांची असलेली वचनबद्धता दर्शवतील.
वर्षानुवर्षे सुरु असलेल्या व्यापक आणि जटील अशा या वरुण सराव मालिकेमुळे दोन्ही देशांच्या नौदलांना परस्परांच्या सर्वोत्कृष्ट पद्धती शिकण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. हा सराव दोन्ही देशांच्या नौदलांदरम्यान परिचालनविषयक समन्वय साध्य करतो तसेच सागरी भागात उत्तम व्यवस्था राखण्यात हातभार लावतो आहे तसेच या सरावाने जागतिक सागरी क्षेत्रामध्ये संरक्षण, सुरक्षितता आणि खुल्या वातावरणाप्रति दोन्ही देशांची सामायिक प्रतिबद्धता अधोरखित केली आहे.
***
N.Chitale/B.Sointakke/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1891712)
Visitor Counter : 602