रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
एबीबी एफआयए फॉर्म्युला ई जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या हैदराबाद सर्किटच्या माध्यमांतील उद्घाटनासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी मुंबई येथे उपस्थित
येत्या 10 वर्षांत सर्वात मोठा विद्युत निर्यातदार होण्याचे भारताचे उद्दिष्ट : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्र्यांचे प्रतिपादन
Posted On:
13 JAN 2023 5:26PM by PIB Mumbai
मुंबई, 13 जानेवारी 2023
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी काल मुंबईत झालेल्या एबीबी एफआयए फॉर्म्युला ई जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या हैदराबाद सर्किटच्या माध्यमांतील उद्घाटनासाठी उपस्थित होते. हैदराबाद ई प्रिक्स या शीर्षकाची ही स्पर्धा 11 फेब्रुवारी रोजी हैदराबाद येथे होणार असून ती 2022-2023 या वर्षासाठीच्या फॉर्म्युला ई जागतिक अजिंक्यपद स्पर्धेचाच भाग आहे. फॉर्म्युला ई, अधिकृतरीत्या एबीबी एफआयए फॉर्म्युला ई जागतिक अजिंक्यपद स्पर्धा ही विजेवर चालणाऱ्या कार्सची सिंगल सीटर मोटरस्पोर्ट अजिंक्यपद स्पर्धा आहे. ई-वाहतूक क्षेत्रात भारताने हाती घेतलेल्या उपक्रमांची ठळकपणे माहिती देण्याची संधी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या कार्यक्रमाच्या निमित्ताने घेतली.
या उद्घाटन प्रसंगी बोलताना, केंद्रीय मंत्री म्हणाले की, विजेवर चालणाऱ्या वाहनांवर लक्ष केंद्रित करुन, भारताने इंधन आयातीचा प्रचंड खर्च आणि वायू प्रदूषण या दुहेरी समस्यांवर उपाय शोधण्याचा प्रयत्न केला आहे. ते म्हणाले की अशा प्रकारची प्रतिष्ठित स्पर्धा भारतातील रस्त्यांवर आयोजित केल्यामुळे देशात विजेवर चालणाऱ्या वाहनांना अधिक लोकप्रियता मिळेल. नजीकच्या भविष्यात नियोजित उभारणीसाठी निश्चित केलेल्या आणखी काही महामार्ग प्रकल्पांची माहिती देताना ते म्हणाले की, आता असा काळ येणार आहे की,या प्रकारच्या शर्यतींसाठी व्यावसायिकरित्या बांधलेल्या शर्यत मार्गांपेक्षा भारतातील महामार्ग अधिक सुयोग्य समजले जातील.
जीवाश्म इंधनावर चालणाऱ्या वाहनांच्या वापरामध्ये स्थित्यंतर घडवण्याच्या भारताच्या योजनांवर देखील केंद्रीय मंत्री गडकरी यांनी प्रकाश टाकला. हरित हायड्रोजन तंत्रज्ञानात भारताने केलेल्या प्रगतीकडे उपस्थितांचे लक्ष वेधून ते म्हणाले की, येत्या दहा वर्षांत सर्वात मोठा विद्युत निर्यातदार होण्याचे लक्ष्य भारताने निश्चित केले आहे. या उद्दिष्टामुळे देशाच्या आर्थिक विकासाला तर चालना मिळणार आहेच पण त्याचबरोबर त्यातून युवकांसाठी रोजगार देखील निर्माण होतील असे ते पुढे म्हणाले. ई-वाहतूक क्षेत्रातील सुधारणा आणि स्वच्छ,हरित हायड्रोजन तंत्रज्ञानातील प्रगती यांच्या माध्यमातून भारत आत्मनिर्भर होऊ शकतो असे निरीक्षण त्यांनी नोंदवले.
या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, तेलंगणाचे महानगरपालिका प्रशासन आणि नगर विकास मंत्री के.टी.रामा राव, ग्रीनको आणि एस समूहाचे संस्थापक अनिल कुमार चलामलशेट्टी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
* * *
PIB Mumbai | N.Chitale/S.Chitnis/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1891028)
Visitor Counter : 156