युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
पंतप्रधानांच्या हस्ते कर्नाटकात हुबळी इथे 26 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन
“आपल्या युवाशक्तीची ‘आपण करू शकतो’ही भावना सर्वांसाठी प्रेरणादायी ठरते आहे”- पंतप्रधान
“अमृतकाळात आपल्या देशाला पुढे घेऊन जाण्यासाठी आपण आपली कर्तव्ये समजून ती पूर्ण करण्यावर भर द्यायला हवा”- पंतप्रधान
पंतप्रधान मोदी यांनी सांगितलेल्या पंच प्रणांचा युवकांनी अंगीकार करावा- अनुराग ठाकूर
Posted On:
12 JAN 2023 9:43PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 12 जानेवारी 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज कर्नाटकात हुबळी इथं 26 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचं उद्घाटन झालं. स्वामी विवेकानंदाची जयंती म्हणून त्यांचे आदर्श, त्यांची शिकवण आणि देश उभारणीत त्यांचे योगदान याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी 12 जानेवारी हा दिवस देशभर राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त आयोजित संमेलनाची संकल्पना, ‘विकसित युवा-विकसित भारत’ अशी असून, देशाच्या सर्व भागातील विविधांगी संस्कृती एका मंचावर आणून ‘एक भारत-श्रेष्ठ भारत’ हे तत्व अधिक बळकट करण्याचा या महोत्सवाचा उद्देश आहे.



यावेळी कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत, कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, केंद्रीय मंत्री अनुराग सिंह ठाकूर, निसिथ प्रामाणिक आणि कर्नाटकातील इतर मंत्री उपस्थित होते.
2023 मधल्या राष्ट्रीय युवा दिनाचे महत्त्व सांगताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, एकीकडे आपण राष्ट्रीय युवा महोत्सव साजरा करतो आहोत, तर दुसरीकडे, देशात स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाचाही उत्साह आहे. त्यामुळे स्वामी विवेकानंदांचाच संदेश उद्धृत करत, “उठा, जागृत व्हा आणि आपले लक्ष्य साध्य होईपर्यंत थांबू नका” असे आवाहन युवकांना केले. भारतीय युवकांचा हा जीवनमंत्र असून, या अमृत काळात आपण आपली कर्तव्ये जाणून घेत, ती पूर्ण करण्यावर भर द्यायलाच हवा, असे पंतप्रधान म्हणाले. या कार्यात, भारतातील तरुणांना स्वामी विवेकानंद जी यांच्याकडून मिळालेली प्रेरणा पंतप्रधानांनी अधोरेखित केली. “आज त्यांच्या जयंतीनिमित्त मी स्वामी विवेकानंदजींच्या चरणी नतमस्तक होतो”, अशा शब्दांत त्यांनी स्वामीजींना अभिवादन केले.
बदलत्या काळात बदलती राष्ट्रीय ध्येये यांची आठवण करून देत पंतप्रधान मोदी म्हणाले, 21 व्या शतकातला हा काळ अतिशय महत्वाचा आहे, कारण आज भारत अफाट लोकसंख्या असलेला तरुण देश आहे. “भारताच्या या प्रवासात युवा शक्ती महत्वाची ठरणार आहे.” असे पंतप्रधान म्हणाले. पुढची 25 वर्षे राष्ट्र निर्माणाच्या दृष्टीने महत्वाची आहेत. युवा शक्तीची स्वप्ने आणि आकांक्षा भारताची भविष्यातली दिशा आणि उद्दिष्ट ठरविणार आहेत, आणि युवा शक्तीचा उत्साह देशाचा मार्ग ठरवणार आहे.
आज भारत पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे आणि “आमचे ध्येय आहे पहिल्या तीन मध्ये स्थान मिळवणे.” कृषी आणि क्रीडा क्षेत्रात निर्माण होत असलेल्या संधींचा पंतप्रधानांनी पुनरुच्चार केला आणि या क्रांतीचे श्रेय युवा शक्तीला दिले.
पंतप्रधानांनी देशाचे सामर्थ्य अबाधित ठेवण्यासाठी महिला शक्तीच्या भूमिकेवर भर दिला आणि वानगीदाखल सशस्त्र दल, अंतराळ तंत्रज्ञान, अंतराळ आणि क्रीडा क्षेत्रात महिला चमकत असल्याचे सांगितले.
यावेळी अनुराग ठाकूर म्हणाले की, “राष्ट्रीय युवा महोत्सव भारताची संस्कृती आणि जिज्ञासू वृत्ती, सर्व समुदायांची आणि भूप्रदेशांची जिज्ञासूवृत्ती एकत्र आणणारा उत्सव आहे.” स्वामी विवेकानंद यांनी, खेळ आणि शारीरिक तंदुरुस्तीला दिलेले महत्त्व अधोरेखित करत, अनुराग ठाकूर म्हणाले की, एका निरोगी शरीरातच निरोगी मन निर्माण होऊ शकते, यावर स्वामी विवेकानंद यांचा विश्वास होता.
पंतप्रधान मोदी यांनी, स्वामी विवेकानंद यांचे विचार आज प्रत्यक्षात आणले आहेत, आणि अनेक अभियान राबवून या देशातील युवा, निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी ते प्रचंड परिश्रम करत आहेत. फिट इंडिया, खेलो इंडिया, खेल महाकुंभ, अशा विविध कार्यक्रमांचा ठाकूर यांनी उल्लेख केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालीच भारत जगातील सर्वोत्तम युपीआय अॅप विकसित करण्यास सक्षम झाला, असेही ते पुढे म्हणाले. केवळ पंतप्रधानांच्या दूरदृष्टीमुळेच देशातील युवा आज स्टार्ट-अप इंडिया आणि स्टँड-अप इंडियासारख्या उल्लेखनीय उपक्रमांसह आत्मनिर्भर होत आहेत, असेही त्यांनी सांगितले.
अनुराग ठाकूर यांनी युवकांना पंतप्रधान मोदी यांनी सांगितलेल्या पंच प्रणांचा अंगीकार करण्याचे आवाहन केले. हे संकल्प पूर्ण करत भारताला सुवर्णयुगाकडे घेऊन जायचे आहे, असे ते म्हणाले.
जी20 विषयी बोलताना ठाकूर म्हणाले, “आता भारताला जी-20 चे अध्यक्षपद मिळाले आहे. या परिषदेच्या निमित्ताने, वाय-20 च्या माध्यमातून आम्ही देशभरात ‘वाय-टॉक्स’ आणि ‘वाय-वॉक्स’ सुरू करून प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक शहरात, प्रत्येक राज्यात जाण्याचा विचार करत आहोत”.असे त्यांनी सांगितले.
आपल्या भाषणाच्या शेवटी, अनुराग ठाकूर यांनी युवकांना आवाहन केले. ते म्हणाले, “एका नरेंद्रने (स्वामी विवेकानंद) देशासाठी जे स्वप्न पाहिले, ते स्वप्न दुसरे नरेंद्र (मोदी) पूर्ण करत आहेत. त्यांच्या स्वप्नातला नवा भारत आपण साकार करूया, आणि हा नवा विकसित भारत, अंमली पदार्थ, भीती आणि कचरामुक्त करण्याचा संकल्प करुया”
त्याआधी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हुबळी इथल्या रेल्वे क्रीडा मैदानावर युवा महोत्सवाचे उद्घाटन केले. राष्ट्रीय युवा महोत्सव 12 जानेवारी रोजी स्वामी विवेकानंदांच्या जयंतीनिमित्त त्यांचे आदर्श, शिकवण आणि योगदान यांचा सन्मान करण्यासाठी साजरा केला जातो.
S.Kane/R.Aghor/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1890855)
Visitor Counter : 331