संरक्षण मंत्रालय

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली एअरो इंडिया 2023 संदर्भात राजदूतांची गोलमेज परिषद; नवी दिल्ली येथे आयोजित परिषदेसाठी 80 हून अधिक देशांचे प्रतिनिधी उपस्थित


यावर्षी 13 ते 17 फेब्रुवारी दरम्यान बेंगलुरू येथे होणाऱ्या आशियातील सर्वात मोठ्या एअरो शोसाठी केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांचे जगभरातील देशांना आमंत्रण

Posted On: 09 JAN 2023 8:15PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 9 जानेवारी 2023

 

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली आज, 09 जानेवारी 2023 रोजी नवी दिल्ली येथे आगामी एयरो 2023 या हवाई प्रदर्शनाच्या संदर्भात विविध देशांच्या राजदूतांची गोलमेज परिषद पार पडली. केंद्रीय संरक्षण मंत्रालयाच्या संरक्षण सामग्री उत्पादन विभागाने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला 80 हून अधिक देशांचे राजदूत, उच्चायुक्त, राजदूत अथवा मंत्र्यांचे प्रतिनिधी, संरक्षण विभागाचे परदेशांत कार्यरत प्रतिनिधी उपस्थित होते. यावर्षी 13 ते 17 फेब्रुवारी दरम्यान कर्नाटकात बेंगलुरू येथे भरणाऱ्या एयरो इंडिया -2023 या आशियातील सर्वात मोठ्या आणि 14 व्या  हवाई प्रदर्शनाला उपस्थित राहण्यासाठी केंद्रीय मंत्री राजनाथ सिंग यांनी जगभरातील देशांच्या प्रतिनिधींना आमंत्रण दिले आहे. या जागतिक पातळीवरील कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी या देशांनी त्यांच्या संरक्षण तसेच हवाई क्षेत्रातील कंपन्यांना प्रोत्साहन द्यावे अशी विनंती सिंह यांनी केली आहे.

एयरो इंडिया हा जागतिक पातळीवरील महत्त्वाचा हवाई क्षेत्रविषयक व्यापार मेळावा असून त्यात एयरोस्पेस उद्योगासह भारतीय हवाई-संरक्षण क्षेत्रातील सर्व उद्योगांना त्यांची उत्पादने, तंत्रज्ञान आणि समस्येवरील उपाय राष्ट्रीय निर्णयकर्त्यांसाठी उपलब्ध करून देण्याची संधी देते. पाच दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमात एयरो स्पेस आणि संरक्षण क्षेत्रातील महत्त्वाच्या व्यापारविषयक उपक्रम यांचा संगम  तसेच भारतीय हवाई दलातर्फे प्रदर्शित हवाई कसरतींचा समावेश आहे. “संरक्षण आणि एयरोस्पेस उद्योगांतील महत्त्वाचे उद्योजक आणि गुंतवणूकदारांसह या कार्यक्रमात जगभरातील विविध देशांच्या संरक्षण क्षेत्रांचे प्रमुख विचारवंत आणि संरक्षण क्षेत्राशी संबंधित संस्था यांचा देखील सहभाग असेल.म्हणूनच, एयरो इंडिया हे प्रदर्शन हवाई क्षेत्रातील माहिती, संकल्पना आणि नवीन तंत्रज्ञानविषयक घडामोडी यांच्या देवाणघेवाणीसाठी खरोखरीच एक अपूर्व संधी उपलब्ध करून देईल,” संरक्षणमंत्री म्हणाले.

केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनी यावेळी उपस्थितांना भारताच्या वाढत्या संरक्षणविषयक उद्योग क्षमतांची विस्तृत माहिती दिली. ते म्हणाले की, संरक्षण सामग्रीच्या उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी विशेषतः ड्रोन, सायबर तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, रडार्स इत्यादी उदयोन्मुख क्षेत्रांमधील देशाची क्षमता वृद्धींगत करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.संरक्षण क्षेत्रातील सामग्रीच्या उत्पादनासाठी मजबूत परिसंस्था उभारण्यात आली असून त्यामुळे गेल्या काही वर्षांमध्ये संरक्षणविषयक सामग्रीचा आघाडीचा निर्यातदार देश म्हणून भारताचा उदय होत आहे. गेल्या पाच वर्षांच्या काळात देशातून निर्यात केल्या जाणाऱ्या संरक्षण सामग्रीच्या प्रमाणात आठ पट वाढ झाली आहे आणि आता भारत जगातील 75 हून अधिक देशांना ही सामग्री निर्यात करत आहे अशी माहिती त्यांनी दिली.

“आपल्या देशातील मोठ्या प्रमाणातील लोकसंख्या आणि मुबलक कुशल कार्यबळ यामुळे उच्च तंत्रज्ञान क्षेत्रातील स्टार्ट अप उद्योगांच्या नेतृत्वात देशात समृद्ध अशी नवोन्मेष परिसंस्था निर्माण झाली आहे. हे स्टार्ट अप उद्योग, आधुनिक तंत्रज्ञानाने युक्त डिजिटल मंच आणि प्रणाली यांचे विकसन तसेच उत्पादन यासाठी प्रस्थापित संशोधन आणि विकास क्षेत्रातील संस्थांशी सहकारी संबंध प्रस्थापित करत आहेत.” संरक्षणमंत्री म्हणाले.भविष्यात उभ्या राहणाऱ्या आव्हानांना तोंड देण्यासाठी तसेच नव्याने उदयाला येणाऱ्या संधींचा फायदा करून घेण्यासाठी भारतीय एयरोस्पेस आणि संरक्षण सामग्री निर्मिती क्षेत्र सज्ज आहे यावर त्यांनी भर दिला. भारताने स्वदेशी हलक्या वजनाच्या लढाऊ विमानाची निर्मिती केली असून हलक्या वजनाच्या बहुपयोगी हेलिकॉप्टर्सच्या उत्पादनाला देखील सुरुवात केली आहे हे त्यांनी ठळकपणे नमूद केले.

केंद्र सरकारचे ‘मेक इन इंडिया’च्या दिशेने सुरु असलेले प्रयत्न म्हणजे जगापासून विलग किंवा केवळ भारतासाठी असलेले प्रयत्न नाहीत यावर भर देत संरक्षणमंत्री म्हणाले, “आपले स्वयंपूर्णतेचे प्रयत्न म्हणजे आपल्या सहकारी देशांशी होऊ घातलेल्या भागीदारीच्या नव्या युगाची सुरुवात आहे. जागतिक पातळीवरील संरक्षणविषयक मोठ्या उद्योगांशी आता आपण भागीदारी करत आहोत.”

‘भागीदारी’ आणि ‘संयुक्त प्रयत्न’ हे भारताच्या इतर देशांशी असलेली संरक्षण सामग्री उद्योगातील भागीदारीला विशेष रूप देणाऱ्या महत्त्वाच्या संकल्पना आहेत असे ते म्हणाले. जगामध्ये काही निवडक देशांना इतर देशांपेक्षा अधिक श्रेष्ठ मानणाऱ्या जागतिक व्यवस्थेच्या  श्रेणीबद्ध संकल्पनेवर भारताचा विश्वास नाही याचा पुनरुच्चार संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी यावेळी केला.

 

* * *

N.Chitale/S.Chitnis/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai(Release ID: 1889870) Visitor Counter : 202