वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय

भारत ही संधीची भूमी असून भारतीय समुदायाने हा संदेश जगासमोर ठेवला पाहिजे असे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री गोयल यांचे प्रतिपादन


भारत काही वर्षांत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या तयारीत: गोयल

प्रवासी भारतीय दिवस हा भारतीय समुदायाचे योगदान साजरे करण्याचे आणि जाणण्याचा कार्यक्रम : गोयल

Posted On: 09 JAN 2023 7:35PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 9 जानेवारी 2023

 

जागतिक विकासासाठी अग्रेसर राहणारा आणि विश्वगुरू ठरणाऱ्या नव भारताला आकार आणि त्यामध्ये आपले योगदान देण्याचे आवाहन  केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री, पीयूष गोयल यांनी आज भारतीय समुदायाला केले. अमेरिकेतील न्यू जर्सी येथे एका कार्यक्रमात ते भारतीय समुदायाला संबोधित करत होते.

परदेशात केलेल्या अतुलनीय योगदानाबद्दल भारतीय समुदायाचे कौतुक करताना गोयल म्हणाले की भारतीय समुदायाने भारताच्या परंपरा आणि गौरवाची पताका फडकत ठेवली आहे. ते म्हणाले की भारतीयांनी भारताच्या समृद्ध परंपरा आणि संस्कृतीद्वारे योगदान दिले आहे ज्याने भारतीय समुदायाला मोठ्या कंपन्यांचे नेतृत्व करण्यास मदत केली आहे आणि अनेक देशांच्या आर्थिक कल्याणासाठी योगदान दिले आहे ही बाब अभिमानास्पद आहे. त्यांनी अधोरेखित केले की भारतीय समुदायाच्या कामगिरीमुळे भारताला खऱ्या अर्थाने जगभरात ओळख आणि मानसन्मान आहे.

न्यू जर्सीमध्ये राहणाऱ्या भारतीयांसोबत प्रवासी भारतीय दिवस साजरा करताना आनंद व्यक्त करताना गोयल म्हणाले की, प्रवासी भारतीय दिवसाची सुरुवात भारताचे माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांनी केली होती, सर्व प्रवाशांच्या स्वागताचे आणि त्यांचे योगदान जाणून घेण्याचे हे औचित्य आहे. भारतीय परंपरा, संस्कृती आणि मूल्य व्यवस्था राखल्याबद्दल त्यांनी अमेरिकेत राहणाऱ्या भारतीयांचे कौतुक केले. ते पुढे म्हणाले की, भारतीय हे विविध देशांमध्ये राहणाऱ्या परदेशी भारतीयांना भारताचे राजदूत म्हणून पाहतात. अमेरिकेतील मधील सुमारे 500 युनिकॉर्नच्या 1078 संस्थापकांपैकी 90 हून अधिक संस्थापक भारतीय वंशाचे आहेत या वस्तुस्थितीची प्रशंसा करून गोयल म्हणाले की, भारतीय समुदायाने आरोग्यसेवा, आदरातिथ्य, पत्रकारिता, तंत्रज्ञान, व्यवस्थापन अशा विविध क्षेत्रांमध्ये त्यांच्या कार्याद्वारे प्रचंड क्षमता स्पष्टपणे प्रदर्शित केली आहे.

गोयल म्हणाले की, गेल्या काही वर्षांत भारताने पाहिलेल्या परिवर्तनात्मक सुधारणांमुळे भारत जगातील 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे. आत्तापासून काही वर्षांत भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

भारत ही संधीची भूमी असल्याचे गोयल यांनी आज अधोरेखित केले आणि भारताला एक महान महासत्ता बनवण्यासाठी भारतीय समुदाय योगदान देत राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. देशांतर्गत ग्राहकांची मोठी मागणी, लोकशाही, कायद्याचे राज्य आणि पारदर्शक अर्थव्यवस्थेमुळे भारताला मोठ्या संधी उपलब्ध आहेत. पुरवठा साखळी, गुंतवणूक पोर्टफोलिओ, व्यवसायात भारत हा तुमचा विश्वासार्ह भागीदार होऊ शकतो हा संदेश जगासमोर नेण्याचे त्यांनी सर्वांना आवाहन केले.

काही गोष्टींवर कृती करण्याचे आवाहन करून गोयल यांनी भाषणाचा समारोप केला:

  • प्रत्येकाला प्रत्येक कृतीत उच्च गुणवत्ता राखण्याची इच्छा बाळगण्यास प्रोत्साहित करा.
  • भेटवस्तूंसाठी / उत्सवाच्या प्रसंगी भारतातील हातमाग/ हस्तकलेची उत्पादने खरेदी करा.
  • अमेरिकेतील गुंतवणूकदारांना भारतातील गुंतवणुकीच्या संधी सादर करा.
  • मोठ्या प्रमाणात परोपकार, ज्ञानाची देवाणघेवाण आणि भारतात नवोन्मेष आणून भारताच्या विकास गाथेत योगदान द्या. 

 

* * *

N.Chitale/V.Joshi/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1889849) Visitor Counter : 196


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil , Telugu