संरक्षण मंत्रालय
उपराष्ट्रपतींनी राष्ट्रीय छात्र सेना ( NCC) प्रजासत्ताक दिन शिबिराचे केले उद्घाटन
जगदीप धनखड यांनी राष्ट्र उभारणीत राष्ट्रीय छात्र सेनेच्या योगदानाचे केले कौतुक
प्रविष्टि तिथि:
07 JAN 2023 3:35PM by PIB Mumbai
भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी 7 जानेवारी 2023 रोजी नवी दिल्ली येथे राष्ट्रीय छात्र सेना (NCC) प्रजासत्ताक दिन शिबिर 2023 चे औपचारिक उद्घाटन केले. या प्रसंगी, सेना, नौदल आणि हवाई दल या तिन्ही शाखांमधून निवडलेल्या राष्ट्रीय छात्र सेनेच्या कॅडेट्सच्या तुकडीने उपराष्ट्रपतींना मानवंदना दिली. उपराष्ट्रपतींनी संचलनाची पाहणी केली.

तरुण विद्यार्थ्यांमध्ये चारित्र्य, साथीभाव आणि निःस्वार्थ सेवेची भावना विकसित करून राष्ट्रीय छात्र सेनेने राष्ट्र उभारणीत दिलेल्या योगदानाचे जगदीप धनखर यांनी कॅडेट्सना संबोधित करताना कौतुक केले. राष्ट्रीय छात्र सेनेने गेल्या काही वर्षांमध्ये प्रेरणादायी आणि शिस्तबद्ध तरुणांची एक चैतन्यशील आणि वैविध्यपूर्ण केडर तयार केली असून हे तरुण जीवनाच्या सर्व क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करत आहेत, असेही ते म्हणाले.
राष्ट्रीय छात्र सेना ही जगातील सर्वात मोठी युवा संघटना आहे. विशेषत: भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतकाळामध्ये कर्तव्यपथावर कामगिरी करणे हा कॅडेट्ससाठी एक आनंदाचा क्षण असेल, असे उपराष्ट्रपती म्हणाले.

जगदीप धनखर यांनी अलीकडेच नूतनीकरण केलेल्या “हॉल ऑफ फेम” आणि ध्वज क्षेत्राला देखील भेट दिली. तिथे त्यांनी तरुण कॅडेट्सकडून त्यांच्या संबंधित राज्यांबद्दलची माहिती ऐकली आणि ध्वज क्षेत्रामध्ये प्रदर्शित कॅडेटस् नी तयार केलेल्या विविध सामाजिक विषयांवरील माांडणीचे कौतुक केले.
यावेळी राष्ट्रीय छात्र सेनेचे डीजी लेफ्टनंट जनरल गुरबीरपाल सिंग यांनी उपराष्ट्रपतींना राष्ट्रीय छात्र सेनेच्या माजी विद्यार्थी संघटनेचे सदस्यत्व दिले.
74 व्या राष्ट्रीय छात्र सेना (NCC) प्रजासत्ताक दिन शिबिर (RDC) 2023 ची सुरुवात 02 जानेवारी 2023 रोजी दिल्ली मधील करिअप्पा परेड ग्राऊंडवर झाली. महिनाभर चालणाऱ्या शिबिरात सर्व 28 राज्ये आणि 8 केंद्रशासित प्रदेशांतील 710 मुलींसह एकूण 2,155 कॅडेट सहभागी होत आहेत.

युवा विनिमय कार्यक्रमाचा एक भाग म्हणून या शिबिरात 19 मित्र देशांतील कॅडेट आणि अधिकारी देखील सहभागी आहेत.
शिबिरात सहभागी होणारे कॅडेट्स सांस्कृतिक स्पर्धा, राष्ट्रीय एकात्मता जागृती कार्यक्रम आणि विविध संस्थात्मक प्रशिक्षण स्पर्धा यासारख्या अनेक उपक्रमांमध्ये सहभागी होतील. 26 जानेवारी 2023 रोजी प्रजासत्ताक दिनाच्या संचलनामध्ये दोन राष्ट्रीय छात्र सेनेच्या मार्चिंग तुकड्या सहभागी होतील. यासारख्या अनेक आणि मागणी असलेल्या कार्यक्रमांचा समारोप 28 जानेवारी 2023 रोजी संध्याकाळी पंतप्रधानांच्या रॅलीने होईल.
****
G.Chippalkatti/S.Mukhedkar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1889361)
आगंतुक पटल : 343