संरक्षण मंत्रालय

प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्य दिन सोहळ्यासाठीच्या प्रवेशिकांचे वितरण झाले डिजिटल


पाहुण्यांना ई-आमंत्रणे देण्यासह सर्वसामान्यांना तिकिटांची ऑनलाईन विक्री करण्यासाठी आमंत्रण व्यवस्थापन पोर्टलचा संरक्षण राज्यमंत्र्यांनी केला प्रारंभ

Posted On: 06 JAN 2023 3:00PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 6 जानेवारी 2023

 

प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी, यापुढे   मान्यवरांना/पाहुण्यांना ई-आमंत्रणे आणि तिकिटांची ऑनलाईन विक्री करण्यासाठी, सरकारच्या ई-प्रशासन  उपक्रमाचा एक भाग म्हणून, एका ऑनलाईन आमंत्रण व्यवस्थापन पोर्टलचा  (www.aamantran.mod.gov.in प्रारंभ संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट यांनी 06 जानेवारी 2023 रोजी नवी दिल्ली येथे केला. हे पोर्टल मान्यवरांना आणि   पाहुण्यांना ऑनलाईन प्रवेशिका  जारी करण्याची सुविधा प्रदान करते आणि कोणत्याही भौगोलिक स्थानावरून सर्वसामान्यांना ऑनलाईन तिकीट खरेदी करण्याची तरतूद या  पोर्टलमध्ये करण्यात आली  आहे.

हे आमंत्रण  पोर्टल, संपूर्ण प्रक्रिया वापरणाऱ्याला सोयीची , पर्यावरणस्नेही  बनवेल तसेच सरकार आणि सामान्य जनता यांच्यातील दरी कमी करेल. याची तपशीलवार प्रक्रिया खालील दुव्याच्या माध्यमातून  पाहता येईल :

हे पोर्टल  म्हणजे  ‘डिजिटल इंडिया’ उपक्रमातील आणखी एक मैलाचा दगड आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या , सोपे, प्रभावी, आर्थिक आणि पर्यावरणस्नेही  प्रशासनावर आधारित असलेल्या ई-प्रशासन  मॉडेलच्या संकल्पनेच्या दिशेने  एक पाऊल आहे, असे यावेळी बोलताना  अजय भट्ट यांनी सांगितले. प्रत्येक नागरिकाचे जीवन सुलभ व्हावे यासाठी सरकार कटिबद्ध असून  ‘डिजिटल इंडिया’ तसेच  ‘किमान शासन , कमाल प्रशासन ’ हे सरकार आणि लोकांना एकत्र आणत आहे, असे त्यांनी नमूद केले.

या निमंत्रण पोर्टलमुळे लोकांना प्रजासत्ताक दिन सोहळ्यानिमित्त (RDC) तिकिटे खरेदी करणे सोपे होईल आणि छपाईसाठी वापरल्या जाणार्‍या कागदाची मोठ्या प्रमाणात बचत होईल, या वस्तुस्थितीचे संरक्षण राज्यमंत्र्यांनी कौतुक केले. ते पुढे म्हणाले, की या पोर्टलमुळे प्रजासत्ताक दिन सोहळा (RDC) अधिक सुरक्षित पद्धतीने साजरा होईल.

आमंत्रण(Aamantran) पोर्टलमध्ये खालील वैशिष्ट्ये आहेत:

सुरक्षा अधिक बळकट होण्यासाठी क्यू आर (QR) कोड-आधारित प्रमाणीकरण.

  • ईमेल/एसएमएसद्वारे पास/तिकिटांचे डिजिटल वितरण.
  • रद्द न करता येणारी आणि अहस्तांतरणीय तिकिटे.
  • निमंत्रितांकडून स्वीकृती मिळविण्यासाठी पाससाठी आरएसव्हीपी (RSVP) पर्याय
  • भविष्यातील इतर कार्यक्रमांच्या चांगल्या नियोजनासाठी कार्यक्रमानंतरच्या डेटाचे विश्लेषण करणे शक्य होणार.

या पोर्टलद्वारे ई-आमंत्रण पत्रिकेचे वाटप करण्याव्यतिरिक्त, तिकिटांच्या खरेदीसाठी खालील ठिकाणी बूथ/काउंटर स्थापित केले जातील, जिथे संरक्षण मंत्रालयाद्वारे ऑनलाइन तिकिटांची सोय उपलब्ध केली जाईल:

  • सेना भवन (प्रवेशद्वार क्रमांक 2)
  • शास्त्री भवन (प्रवेशद्वार क्रमांक 3)
  • जंतरमंतर (मुख्य प्रवेशद्वारा जवळ)
  • प्रगती मैदान (प्रवेशद्वार क्रमांक 1)
  • संसद भवन (स्वागत कार्यालय) – खासदारांसाठी विशेष काउंटर (18.01.2023 रोजी उघडेल)

यासाठीची वेळ सकाळी (10 तेदुपारी 12.30 वाजेपर्यंत) आणि दुपारी (2 ते 4.30 वाजेपर्यंत) असेल. या संदर्भातल्या अधिक माहितीसाठी,  www.mod.gov.inwww.indianrdc.mod.gov.in. या संकेतस्थळाला भेट द्या.

 

 

S.Patil/Sonal C/Vikas/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1889134) Visitor Counter : 186


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil , Telugu