राष्ट्रपती कार्यालय
भारत स्काऊट्स आणि गाईड्सच्या 18 व्या राष्ट्रीय मेळाव्याला राष्ट्रपतींची उपस्थिती
Posted On:
04 JAN 2023 9:34PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 4 जानेवारी 2023
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते आज, 04 जानेवारी 2023 रोजी, राजस्थानातील पाली येथे भारत स्काऊट्स आणि गाईड्सच्या 18 व्या राष्ट्रीय मेळाव्याचे उद्घाटन झाले.
याप्रसंगी बोलताना, भारत स्काऊट्स आणि गाईड्स ही देशातील सर्वात मोठी स्वयंसेवी, बिगर-राजकीय, गणवेशधारी युवक संघटना तसेच शैक्षणिक चळवळ आहे, असे राष्ट्रपती मुर्मु यांनी सांगितले. त्या म्हणाल्या की ही संघटना पंथ, वंश किंवा लिंगाधारित भेदभावाविना, मुलामुलींचे चारित्र्य घडवण्यासाठी काम करते आहे. सुमारे 63 लाखांहून अधिक स्काऊट्स आणि गाईड्स सदस्य असलेली ही संस्था जगातील सर्वात मोठ्या स्काऊट आणि गाईड्स संघटनांपैकी एक मानली जाते. या संघटनेचे सदस्य त्याग आणि सेवाभावाच्या प्रेरणेसह काम करत आहेत आणि त्यातून मानवतेच्या कल्याणाला चालना मिळत आहे असे त्या म्हणाल्या. ही मानवता आणि प्रेमाची भावना आपल्यापैकी प्रत्येकाने स्वतःच्या जीवनात अंगीकारायला हवी असा आग्रह त्यांनी यावेळी व्यक्त केला.
राष्ट्रपती म्हणाल्या की, या संघटनेतील कार्य सुरु करण्यापूर्वी, हे स्काऊट्स आणि गाईड्स वैयक्तिक लाभासाठी नव्हे तर समाजाच्या सामूहिक कल्याणासाठी, स्वतःला शारीरिक पातळीवर सशक्त, मानसिकदृष्ट्या जागरूक करून आणि नैतिक पातळीवर योग्य आचरण करण्याची शपथ घेतात. जेव्हा जाणिवेच्या या उच्च कोटीच्या वैशिष्ट्यांचे पालन केले जाते तेव्हा ह्या जगाला अधिक उत्तम स्थानाचे रूप मिळते.
मार्टिन ल्यूथर किंग ज्युनियर, आणि बिल गेट्स यांनी देखील स्काऊट म्हणून काम केले आहे असे उदाहरण देत राष्ट्रपतींनी उपस्थित स्काऊट्स आणि गाईड्स यांना भविष्यात मार्गदर्शक ठरणारी सार्वत्रिक मूल्ये तसेच नैतिक गुण आत्मसात करण्याचा सल्ला दिला. स्काऊट्स आणि गाईड्स म्हणून काम करताना मिळालेले धडे त्यांच्या आयुष्याला अपरिमित मार्गांनी समृध्द करतील असे त्या म्हणाल्या.
राष्ट्रपती म्हणाल्या की कोविड-19 महामारीच्या काळात, भारत स्काऊट्स आणि गाईड्स यांनी समाजाची सेवा करताना अतुलनीय धाडसाचे दर्शन घडवले आहे. हवामान बदलाच्या दुष्परिणामांविषयी बोलताना त्या म्हणाल्या की, तापमान, समुद्राच्या पाण्याची पातळी तसेच हवामानविषयक अनियमितता यांच्यातील वाढीचा भयानक परिणाम अत्यंत स्पष्टपणे पाहायला मिळतो आहे. यासंदर्भात खूप उशीर होण्याआधीच आपण तातडीने सुधारात्मक उपाययोजना हाती घ्यायला हव्या. नवीकरणीय उर्जेचा स्वीकार, कार्बन पदचिन्हांचे प्रमाण कमी करणे तसेच शाश्वत विकासविषयक पद्धतींना चालना देणे यासाठी सामान्य जनतेमध्ये जागृती निर्माण करण्यात स्काऊट्स आणि गाईड्स अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावू शकतात अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. जैवविविधतेचे संरक्षण करणे, पर्यावरणाचा समतोल राखणे आणि जबाबदार पर्यटन पद्धतींना चालना देणे यांच्या महत्त्वाबाबत सामान्य लोकांना शिक्षित करणे हे स्काऊट्स आणि गाईड्स यांचे कर्तव्य आहे असे राष्ट्रपती मुर्मु यांनी सांगितले.
त्या म्हणाल्या की भारत हा सध्या जगातील तरुण देश मानला जातो. युवक हे देशाच्या भविष्याचे निर्माते आहेत. जग अत्यंत वेगाने बदलत आहे आणि त्यामुळे देशातील युवकांना भविष्यासाठी सज्ज राहावे लागेल असे त्यांनी सांगितले. आपला देश तसेच समाज यांच्यासमोर भविष्यात निर्माण होऊ शकणाऱ्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी त्यांनी स्वतःसमोर मोठी उद्दिष्टे ठेवली पाहिजेत. स्वतःवर संपूर्ण विश्वास ठेवून त्यांनी आगामी वाटचाल करावी त्यातून यश आपोआप मिळेल असा सल्ला राष्ट्रपती मुर्मु यांनी स्काऊट्स आणि गाईड्स यांना दिला.
राष्ट्रपतींचे हिंदी भाषेतील भाषण वाचण्यासाठी कृपया येथे क्लिक करा
* * *
S.Patil/S.Chitnis/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1888700)