विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय

ज्ञानाभिमुख अर्थव्यवस्थेकडे भारताच्या वाटचाली संदर्भात विज्ञान क्षेत्रातील प्रमुखांनी केली चर्चा

Posted On: 04 JAN 2023 7:40PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 4 जानेवारी 2023

 

नागपूर येथे आयोजित  भारतीय विज्ञान परिषदेच्या  पहिल्या पूर्ण सत्रात, भारत सरकारच्या वैज्ञानिक विभागांच्या प्रमुखांनी भारताला ज्ञानाभिमुख अर्थव्यवस्था बनवण्यासाठी आराखडा तयार करत या दिशेने वाटचाल करताना उद्भवणारी  आव्हाने आणि संधी यावर चर्चा केली.

जागतिक स्तरावर स्टार्ट-अपसाठी तिसरी मोठी व्यवस्था असलेला देश म्हणून भारत उदयाला  आला आहे   आणि भारतातील तंत्रज्ञान प्रधान स्टार्टअप्स कार्यक्षेत्रामध्ये  वेगाने वाढ झाली आहे, याला विशेषत: ग्राहक तंत्रज्ञान, वाहन क्षेत्र  , प्रसारमाध्यमे  आणि मनोरंजन, कृषी तंत्रज्ञान , ऊर्जा उपयुक्तता आणि सायबर सुरक्षा यासारख्या क्षेत्रांमध्ये   चालना देण्यासाठी अजूनही वाव आहे, ही बाब भारत सरकारचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार, प्राध्यापक ए के सूद यांनी अधोरेखित केली.

क्वांटम विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये तांत्रिक क्रांतींचे एकत्रीकरण, अत्याधुनिक दळणवळण तंत्रज्ञान, स्वच्छ ऊर्जा, डिजिटल परिवर्तन आणि एक आरोग्य अभियान हे जागतिक ज्ञानाभिमुख  अर्थव्यवस्थेच्या दिशेने भारताच्या प्रगतीला चालना देत आहे, असे त्यांनी सांगितले.

“भारताच्या परिवर्तनात विज्ञान महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल आणि हे परिवर्तन आपल्या प्रयोगशाळांवर आधारलेले असेल त्यामुळे भविष्यातील आव्हानांना तोंड देण्यासाठी आपले विज्ञान किती सुसंगत असेल याचा विचार करण्याची जबाबदारी आम्हा  शास्त्रज्ञांची आहे . भविष्यातील समस्यांचे  मग त्या उत्पादन संबंधित असो किंवा शाश्वतते संदर्भातील या समस्यांचे  निराकरण करण्यासाठी आपल्याला  आपले प्रश्न तयार करावे लागतील, असे विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे सचिव (डीएसटी)  डॉ. एस चंद्रशेखर यांनी सांगितले.

भविष्यातील कारखान्यांची संकल्पना मांडण्याची  आणि त्यांना अनुकूल अशा उत्पादन पद्धतींची रचना करण्याची, कचरा कमी होण्याच्या अनुषंगाने कच्चा माल आणि उत्पादनात सुसूत्रता आणण्याची, चक्रीय विज्ञानाची  संकल्पना विकसित करण्याची, अनुदानाची गरज दूर करू शकणारे कृषी तंत्रज्ञान निर्माण करण्याची आणि कमी प्रदूषण करणारे पर्यायी वाहतूक  पर्याय शोधण्याची विज्ञानाची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली.

तळागाळातील उपायांमुळे जागतिक समस्यांचे निराकरण करण्याचे संकेत मिळू शकतील यासाठी तळागाळापर्यंत -जागतिक संबंध विकसित करण्याची गरज डॉ. चंद्रशेखर यांनी अधोरेखित केली.

यशस्वी वैज्ञानिक उपायांमध्ये शाश्वततेच्या गरजेवर भर देत,सीएसआयआरच्या महासंचालिका एन. कलैसेल्वी यांनी , येत्या सात वर्षात भारतासाठी  महत्वाच्या असणाऱ्या पर्यावरण आणि हवामान बदल, ऊर्जा आणि वाहतूक , अन्न आणि पोषण, उद्योग 4.0/5.0, विज्ञान सुलभता  आणि प्रतिभा आकर्षित करणे आणि टिकवून ठेवणे या काही क्षेत्रातील क्षेत्रात भारताची आव्हाने आणि संधी अधोरेखित केल्या.  या माध्यमातून भारताला विकसित देश बनवण्यासाठी पुढील 17 वर्षांचा पाया घातला जाईल, असे त्या म्हणाल्या.

 

* * *

S.Patil/S.Chavan/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1888662) Visitor Counter : 220


Read this release in: Telugu , English , Urdu , Hindi