ऊर्जा मंत्रालय

भारतातील पहिला पीएनजी नेटवर्कमधील हरित हायड्रोजन मिश्रणाचा प्रकल्प एनटीपीसी ने केला सुरु

Posted On: 03 JAN 2023 6:25PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 3 जानेवारी 2023

 

  • सूरतमधील आदित्यनगर इथल्या कावस टाऊनशिपमधील घरांना H2-NG (नैसर्गिक वायू) पुरवठा करण्यासाठी यंत्रणा सज्ज
  • हा प्रकल्प भारताला जागतिक हायड्रोजन अर्थव्यवस्थेच्या केंद्रस्थानी आणेल.
  • भारत केवळ हायड्रोकार्बनच्या आयातीवरचा खर्च लक्षणीयरीत्या कमी करणार नाही, तर जगाला हरित हायड्रोजन आणि हरित रसायने निर्यात करणारा देश बनून परदेशी चलन मिळवेल

एनटीपीसी कावस टाऊनशिपच्या (गृहसंकुल) पीएनजी नेटवर्कमध्ये हरित हायड्रोजनचा प्रवाह सुरू करताना कावस एचओपी राम प्रसाद

 

एनटीपीसीच्या कावस हरित हायड्रोजन(H2) मिश्रण प्रकल्पात इलेक्ट्रोलायझर, हायड्रोजन स्टोरेज आणि ब्लेंडिंग स्किड

 

एनटीपीसी ने भारताचा पहिला ग्रीन (हरित) हायड्रोजन मिश्रण प्रकल्प सुरु केला आहे. सूरतमधील एनटीपीसी कावस टाउनशिपच्या, पाईप्ड नॅचरल गॅस (पीएनजी) नेटवर्कमध्ये हरित हायड्रोजनचे मिश्रण सुरू करण्यात आले. हा प्रकल्प एनटीपीसी आणि गुजरात गॅस लिमिटेड (जीजीएल) यांचा संयुक्त उपक्रम आहे.

प्रकल्पातील हरित हायड्रोजनचा पहिला रेणू एनटीपीसी कावास आणि जीजीएल चे इतर वरिष्ठ अधिकारी यांच्या उपस्थितीत कावासचे प्रकल्प प्रमुख पी राम प्रसाद यांनी गतिमान केला. ब्लेंडिंग ऑपरेशन (मिश्रण प्रक्रीया) सुरू झाल्यानंतर, एनटीपीसी कावसने जीजीएल च्या  अधिकार्‍यांच्या मदतीने टाऊनशिपमधील रहिवाशांसाठी जागरुकता कार्यशाळा आयोजित केल्या.

30 जुलै 2022 रोजी भारताच्या पंतप्रधानांच्या हस्ते या प्रकल्पाची पायाभरणी झाल्यावर, एनटीपीसी आणि जीजीएल ने विक्रमी वेळेत हा टप्पा गाठण्यासाठी अथक परिश्रम घेतले. आदित्यनगर, सूरत येथील कावस टाऊनशिपमधील घरांना H2-NG (नैसर्गिक वायू) पुरवठा करण्यासाठी हा प्रकल्प सज्ज आहे. कावसमधील हरित हायड्रोजन यापूर्वीच स्थापित केलेल्या 1 मेगावॅटच्या तरंगत्या सौर ऊर्जा प्रकल्पामधील वीज वापरून पाण्याचे विद्युत अपघटन करून निर्माण केला जातो.

पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू नियामक मंडळ (पीएनजीआरबी) या नियामक संस्थेने सुरुवातीला for 5% vol./vol हरित हायड्रोजनच्या पीएनजी बरोबर मिश्रणाला परवानगी दिली आहे आणि टप्प्याटप्प्याने मिश्रणाची पातळी वाढवून 20% केली जाईल. हरित हायड्रोजनचे जेव्हा नैसर्गिक वायू बरोबर मिश्रण केले जाते, तेव्हा तो उष्मादायकता तेवढीच ठेवून, कार्बन उत्सर्जन कमी करतो.  

आतापर्यंत युके, जर्मनी, ऑस्ट्रेलिया, इत्यादी मोजक्या देशांनीच ही कामगिरी केली आहे. ती भारताला जागतिक हायड्रोजन अर्थव्यवस्थेच्या केंद्रस्थानी आणेल. यामुळे भारत केवळ हायड्रोकार्बनच्या आयातीचा खर्च लक्षणीयरीत्या कमी करणार नाही, तर जगाला हरित  हायड्रोजन आणि हरित रसायने निर्यात करणारा देश बनून, परकीय चलन मिळवेल.

 

* * *

S.Patil/R.Agashe/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1888389) Visitor Counter : 461


Read this release in: English , Urdu , Hindi , Telugu