संरक्षण मंत्रालय
संरक्षण मंत्र्यांनी, अरुणाचल प्रदेशातील एका कार्यक्रमादरम्यान सात सीमावर्ती राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये 724 कोटी रुपयांचे पूल आणि रस्त्यांसह 28 बीआरओ पायाभूत सुविधा प्रकल्प राष्ट्राला केले समर्पित
लडाख आणि मिझोराममधील व्हीसॅट-आधारित तीन टेलिमेडिसिन केंद्रांचेही केले उद्घाटन
Posted On:
03 JAN 2023 4:40PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 3 जानेवारी 2023
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी 03 जानेवारी 2023 रोजी अरुणाचल प्रदेशातील अलॉन्ग-यिंकिओंग मार्गावरील सियोम पूल येथे आयोजित कार्यक्रमादरम्यान सीमा रस्ते संघटनेचे (बीआरओ) 724 कोटी रुपयांचे 28 पायाभूत सुविधा प्रकल्प राष्ट्राला समर्पित केले. या प्रकल्पांमध्ये सियोम पुलासह 22 पूल; उत्तर आणि ईशान्येकडील सात सीमावर्ती राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये तीन रस्ते आणि तीन अन्य प्रकल्पांचा समावेश आहे. यातील आठ प्रकल्प लडाखमध्ये आहेत; अरुणाचल प्रदेशात पाच; जम्मू-काश्मीरमध्ये चार; सिक्कीम, पंजाब आणि उत्तराखंडमध्ये प्रत्येकी तीन आणि राजस्थानमध्ये दोन प्रकल्प आहेत. याशिवाय, तीन टेलिमेडिसिन केंद्रांचेही उद्घाटन झाले - यातील दोन लडाखमध्ये आणि एक मिझोराममध्ये आहे.
सशस्त्र दलांची कार्यसज्जता वाढवण्यासाठी आणि दुर्गम भागातील सामाजिक-आर्थिक विकास सुनिश्चित करण्यासाठी, सीमावर्ती भागाच्या विकासाकरता सरकार आणि बीआरओच्या एकत्रित प्रयत्नांचे हे प्रकल्प निदर्शक असल्याचे संरक्षण मंत्री म्हणाले. सीमावर्ती भागांना जोडणे आणि तेथील रहिवाशांचा विकास सुनिश्चित करणे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारचे सर्वोच्च प्राधान्य असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.
सतत बदलणाऱ्या भूराजकीय जागतिक परिस्थितीमुळे भविष्यातील आव्हानांना प्रभावीपणे सामोरे जाण्यासाठी सशक्त आणि स्वावलंबी ‘नवभारताची’ उभारणी हे यामागचे उद्दिष्ट आहे यावर राजनाथ सिंह यांनी भर दिला. “जगभरात आज अनेक ठिकाणी संघर्ष सुरु आहे. भारत नेहमीच युद्धाच्या विरोधात राहिला आहे. ते आपले धोरण आहे. अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘हे युद्धाचे युग नाही’ असे सांगत, या संकल्पाकडे जगाचे लक्ष वेधले. आमचा युद्धावर विश्वास नाही, पण आमच्यावर ते लादलेच तर त्याचा प्रखर सामना करु. राष्ट्राचे सर्व धोक्यांपासून संरक्षण केले जाईल हे आम्ही सुनिश्चित करत आहोत. आमची सशस्त्र सेना सज्ज आहे आणि बीआरओ त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहे हे पाहून आनंद झाला,” असे ते म्हणाले.
संरक्षण मंत्र्यांनी सीमावर्ती भागात पायाभूत सुविधांच्या विकासाद्वारे देशाची सुरक्षा बळकट करण्यामध्ये सीमा रस्ते संघटनेने (BRO) ने बजावलेल्या महत्वाच्या भूमिकेचा विशेष उल्लेख केला. “अलीकडेच, आपल्या सुरक्षा दलाने उत्त्तर क्षेत्रात शत्रूचा प्रभावीपणे सामना केला आणि धैर्याने आणि तत्परतेने परिस्थिती हाताळली. या प्रदेशातील पुरेशा पायाभूत सुविधा विकासामुळे हे शक्य झाले. हे आम्हाला दुर्गम भागांच्या प्रगतीसाठी आणखी प्रेरित करते,” ते म्हणाले. अलॉन्ग-यिंकिओंग रोड येथील कार्यक्रमात सामरिकदृष्ट्या-महत्त्वाच्या सियोम पुलाचे प्रत्यक्ष उद्घाटन झाले, तर इतर प्रकल्पांचे आभासी माध्यमातून लोकार्पण करण्यात आले. सियोम पूल हा अरुणाचल प्रदेशातील सियोम नदीवरील 100 मीटर लांबीचा अत्याधुनिक, क्लास 70 स्टील आर्क सुपरस्ट्रक्चर बांधकाम तंत्राचा वापर करून बांधण्यात आलेला पूल आहे. संरक्षण मंत्र्यांनी इलेक्ट्रॉनिक माध्यमातून उद्घाटन केलेले तीन टेलीमेडिसिन नोड्स VSAT (व्हेरी स्मॉल अपर्चर टर्मिनल) उपग्रह संपर्क प्रणाली द्वारे सेवा रुग्णालयांशी जोडले जातील. SATCOM VSAT दूरसंचार सेवेच्या मदतीने सेनादलाच्या रुग्णालयातील तज्ञांशी टेलिमेडिसिन सल्लामसलतीच्या माध्यमातून वैद्यकीय आणि तात्काळ शस्त्रक्रिया सेवांसाठी वैद्यकीय सुविधा प्रदान करेल. अंतराळ तंत्रज्ञानाचा वापर करून दुर्गम सीमावर्ती भागात तैनात असलेल्या आपल्या जवानांना वैद्यकीय सेवा प्रदान करण्यासाठी बीआरओनं साध्य केलेली ही एक असामान्य कामगिरी आहे. हे विभाग स्थानिक लोकांच्या आरोग्याशी संबंधित गरजांसाठी उपयुक्त ठरतील, अशी आशा संरक्षण मंत्र्यांनी व्यक्त केली.
2022 मध्ये पूर्ण झालेल्या या 28 प्रकल्पांच्या उद्घाटनासह, वर्षभरात बीआरओच्या 2,897 कोटी रुपये खर्चाच्या एकूण 103 पायाभूत सुविधा प्रकल्पांचे लोकार्पण करण्यात आले. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये लडाखमधील श्योक गावातून संरक्षण मंत्र्यांनी 2,173 कोटी रुपये खर्चाच्या 75 प्रकल्पांचे उद्घाटन केले होते. 2021 मध्ये, बीआरओ च्या 2,229 कोटी रुपये खर्चाच्या अशा 102 प्रकल्पांचे लोकार्पण झाले. गेल्या काही वर्षांत आव्हानात्मक हवामान आणि खडतर भूभागामध्ये बीआरओ ने ज्या समर्पित भावनेने आणि वेगाने विकास कामे केली, त्याची राजनाथ सिंह यांनी प्रशंसा केली.
संरक्षण मंत्र्यांनी या कार्यक्रमात नवीन तंत्रज्ञानावरील संकलनाचे प्रकाशनही केले. यामध्ये बीआरओ द्वारे रस्ते, पूल, एअरफील्ड आणि बोगद्याच्या पायाभूत सुविधांच्या बांधकामात वापरल्या जाणाऱ्या अद्ययावत तंत्रज्ञानाचा समावेश आहे. हे तंत्रज्ञान, स्थापत्य अभियांत्रिकी कामांच्या दर्जाला बाधा पोहोचवणाऱ्या आणि ठरलेल्या वेळेत काम पूर्ण होऊ न देणाऱ्या, प्रतिकूल हवामानाच्या दुर्गम आणि खडतर भूप्रदेशामधील आव्हानांवर मात करते.
* * *
S.Patil/Vinayak/Rajshree/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1888362)
Visitor Counter : 235