इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

आधारमध्ये ‘कुटुंबप्रमुख ’ आधारित ऑनलाइन पत्ता अद्ययावत करण्याची सुविधा भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाकडून (युआयडीएआय ) उपलब्ध


रहिवासी त्यांच्या कुटुंब प्रमुखाच्या (एचओएफ ) संमतीने आधारमध्ये पत्ता ऑनलाइन अद्ययावत करू शकतात.

सेवा विनंती तारखेपासून 30 दिवसांच्या आत कुटुंबप्रमुख विनंती मंजूर किंवा नाकारू शकतो

ज्या रहिवाशांच्या स्वतःच्या नावावर आपल्या रहिवासाच्या स्थानाची ओळख पटवणारी कागदपत्रे नाहीत त्यांना लाभ देण्यासाठी कुटुंबप्रमुख आधारित ऑनलाइन पत्ता अद्ययावत करण्याची सुविधा

Posted On: 03 JAN 2023 12:32PM by PIB Mumbai

कुटुंब प्रमुखाच्या (एचओएफ ) संमतीने आधारमध्ये   ऑनलाइन पत्ता अद्ययावत   करण्यासाठी, भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (युआयडीएआय ) रहिवासी  स्नेही सुविधा सुरू केली आहे.

ज्यांच्याकडे आधारमध्ये पत्ता अद्ययावत  करण्यासाठी आपल्या रहिवासाच्या स्थानाची ओळख पटवणारी स्वतःच्या नावावरील कागदपत्रे नाहीत,   रहिवाशांच्या अशा नातेवाईकांना-म्हणजेच  मुले, जोडीदार, पालक इत्यादींना  आधार मध्ये कुटुंब प्रमुखाच्या आधारे  ऑनलाइन पत्ता अद्ययावत करण्यासाठीची सेवा  खूप मदत करेल.

शिधापत्रिका , गुणपत्रिका , विवाह प्रमाणपत्र, पारपत्र  इत्यादी कागदपत्रांच्या माध्यमातून नातेसंबंधाचा पुरावा सादर करून ,अर्जदार आणि कुटुंबप्रमुख या  दोघांच्या नावाचा उल्लेख करून आणि त्यांच्यातील संबंध दाखवून आणि कुटुंबप्रमुखाद्वारे ओटीपी आधारित प्रमाणीकरण करून ऑनलाइन पत्ता अद्ययावत करता येईल. नातेसंबंधाचा   पुरावा दर्शवणारी कागदपत्रे  देखील उपलब्ध नसल्यास, युआयडीएआय रहिवाशांना युआयडीएआय ,विहित नमुन्यात कुटुंबप्रमुखाद्वारे  स्वयं-घोषणा पत्र सादर करण्याची सुविधा  प्रदान करते.

विविध कारणांमुळे देशात लोक शहरे आणि नगरांमधून स्थलांतरित होत  असल्याने लाखो लोकांसाठी अशा प्रकारची  सुविधा फायदेशीर ठरेल. पत्त्याचा कोणताही वैध पुरावा कागदपत्र वापरून युआयडीएआयने विहित केलेल्या  विद्यमान पत्ता अद्यतन सुविधेवर या पर्यायाची निवड अतिरिक्त असेल.   18 वर्षांपेक्षा जास्त वयाचा कोणताही रहिवासी या उद्देशासाठी कुटुंबप्रमुख  असू शकतो आणि या प्रक्रियेद्वारे त्याचा/तिचा पत्ता त्याच्या नातेवाईकांसह सामायिक करू शकतो.

माय आधार’ पोर्टलमध्ये ( https://myaadhaar.uidai.gov.in ) ऑनलाइन पत्ता अद्ययावत करण्यासाठी हा पर्याय रहिवासी निवडू शकतो.  त्यानंतर, रहिवाशांना एचओएफचा आधार क्रमांक प्रविष्ट करण्याची परवानगी दिली जाईल, ती केवळ प्रमाणित केली जाईल.  एचओएफची पुरेशी गोपनीयता राखण्यासाठी एचओएफच्या आधारची इतर कोणतीही माहिती स्क्रीनवर प्रदर्शित केली जाणार नाही.

एचओएफच्या आधार क्रमांकाचे यशस्वी प्रमाणीकरण झाल्यानंतर, रहिवाशांनी नातेसंबंधाच्या पुराव्याचे दस्तऐवज अपलोड करणे आवश्यक असेल.

रहिवाशांनी सेवेसाठीचे रु.50/- शुल्क यशस्वीरित्या भरल्यानंतर, रहिवाशासोबत सेवा विनंती क्रमांक (एसआरएन) सामायिक केला जाईल. पत्त्याच्या विनंतीबद्दल एचओएफला एसएमएस पाठवला जाईल. अधिसूचना प्राप्त झाल्यापासून 30 दिवसांच्या आत माय आधार पोर्टलवर लॉग इन करून एचओएफ विनंती मंजूर करेल आणि त्याची/तिची संमती देईल आणि विनंतीवर प्रक्रिया केली जाईल.

एचओएफने त्याचा/तिचा पत्ता सामायिक करण्यास नकार दिल्यास, किंवा एसआरएन तयार केल्याच्या 30 दिवसांच्या आत स्वीकारला किंवा नाकारला नाही, तर विनंती प्रक्रिया बंद केली जाईल. या पर्यायाद्वारे पत्ता अद्ययावत करण्याची मागणी करणाऱ्या रहिवाशांना एसएमएसद्वारे विनंती प्रक्रिया बंद केल्याची माहिती दिली जाईल. एचओएफने स्वीकार न केल्यामुळे विनंती प्रक्रिया बंद झाल्यास किंवा नाकारली गेल्यास किंवा प्रक्रियेदरम्यान नाकारली गेल्यास, अर्जदाराला रक्कम परत केली जाणार नाही.

 

***

Sonal /Vinayak/CYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1888332) Visitor Counter : 454