आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
केंद्रीय मंत्री डॉ.मनसुख मांडवीय यांनी नवी दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर परदेशातून येणा-या प्रवाशांची तपासणी आणि चाचणी याविषयीचा तयारीचा घेतला आढावा
कोविड संदर्भात अतिधोकादायक परिस्थिती असलेल्या 6 देशांतून येणाऱ्या प्रवाशांना भारताच्या दिशेने प्रवास सुरु करण्याच्या 72 तासांच्या कालावधीतील आर टी -पीसीआर चाचणीचा नकारात्मक अहवाल एअर सुविधा पोर्टलवर अपलोड करणे आता अनिवार्य
कोविड-योग्य वर्तणुकीचे पालन करणे आणि कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण प्रक्रिया पूर्ण करणे याचे महत्त्व केंद्रीय मंत्र्यांनी केले अधोरेखीत
Posted On:
02 JAN 2023 9:42PM by PIB Mumbai
नवी दिल्ली 02 जानेवारी 2023
जगातील काही देशांमध्ये कोविड-19 बाधितांच्या संख्येत अचानक वाढ दिसून येत आहे, या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांनी आज नवी दिल्ली येथील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाला भेट दिली आणि तेथे येणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांची तपासणी तसेच चाचणी यासंदर्भातील तयारीचा आढावा घेतला.
विमानतळावर करण्यात येणाऱ्या आर टी-पीसीआर चाचण्यांची पद्धत तसेच 1 जानेवारी 2023 पासून यासंदर्भात सुरु करण्यात आलेले एअर सुविधा पोर्टल यांचा देखील आढावा केंद्रीय मंत्र्यांनी यावेळी घेतला. यावेळी त्यांनी एपीएचओ अर्थात विमानतळ आरोग्य संघटनेच्या कार्यालयाला भेट देऊन तेथे उपस्थित अधिकाऱ्यांशी संवाद साधला. ते म्हणाले, “कोविड संदर्भात अतिधोकादायक परिस्थिती असलेल्या 6 देशांतून येणाऱ्या प्रवाशांना भारताच्या दिशेने प्रवास सुरु करण्याच्या 72 तासांच्या कालावधीतील आर टी -पीसीआर चाचणीचा नकारात्मक अहवाल एअर सुविधा पोर्टलवर अपलोड करणे आता अनिवार्य करण्यात आले आहे. तर इतर देशांतून येणाऱ्या प्रवाशांची भारतात आगमन झाल्यानंतर ‘रॅंडम’ म्हणजेच यादृच्छिक पद्धतीने चाचणी करण्यात येत आहे.” “कोविड विषाणूच्या कोणत्याही नव्या प्रकाराची शक्ती तसेच वर्तणूक समजून घेण्यासाठी बाधित रुग्णाच्या नमुन्याचे जनुकीय क्रमनिर्धारण तत्परतेने व्हावे याची सुनिश्चिती करून घेण्यासाठी या चाचण्या करण्यात येत आहेत,” ते पुढे म्हणाले.
जगभरातील चीन,जपान,दक्षिण कोरिया,थायलंड तसेच अमेरिका या देशांमध्ये कोविड-19 बाधितांच्या संख्येत सतत वाढ होत असल्यामुळे उभ्या ठाकलेल्या आव्हानाचे गांभीर्य अधोरेखित करत केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी कोविड विषाणूच्या नव्या तसेच नव्याने उदयाला येऊ शकणाऱ्या प्रकारांचा सामना करण्यासाठी सज्ज आणि सतर्क राहण्याचे महत्त्व अधोरेखित केले. अधिकाऱ्यांनी या संदर्भात पूर्णपणे सुसज्ज राहण्याचे निर्देश त्यांनी दिले आणि जनतेने कोविड-योग्य वर्तणुकीचे पालन करणे तसेच कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण पूर्ण करून घ्यावे, असे आवाहन केंद्रीय मंत्र्यांनी यावेळी केले. कोविड-19 संसर्गाबाबत नव्याने निर्माण होणाऱ्या परिस्थितीसंदर्भात प्रभावी सज्जता आणि व्यवस्थापन याची खात्री करून घेण्यासाठी केंद्र सरकार सर्व आवश्यक उपाययोजना करत आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री डॉ.मनसुख मांडवीय यांनी दिली.
भारतात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याआधीच म्हणजे 29 डिसेंबर 2022 रोजी सुधारित मार्गदर्शक तत्वे जारी केली असून पुढील संकेतस्थळावर ती उपलब्ध आहेत: https://pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=1887288
***
सुवर्णा बेडेकर/संजना चिटणीस/सी यादव
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1888213)
Visitor Counter : 166