पोलाद मंत्रालय
एमओआयएल कंपनीकडून डिसेंबर महिन्यात मँगनीजच्या विक्रमी उत्पादनाची नोंद
Posted On:
02 JAN 2023 8:45PM by PIB Mumbai
एमओआयएल अर्थात भारतीय मँगनीज धातू उत्पादक कंपनीने या डिसेंबर महिन्यात तब्बल 1,41,321 टन मँगनीज धातूचे उत्पादन करून आतापर्यंतच्या डिसेंबर महिन्यातल्या सर्वोत्तम मँगनीज धातू उत्पादनाची नोंद केली आहे. या महिन्यात कंपनीच्या उत्पादन क्षमतेच्या पातळीपर्यंत मँगनीज उत्पादन करताना नोव्हेंबर 2022 मध्ये केलेल्या मँगनीज उत्पादनात 18% पर्यंतची वाढ नोंदवली आहे.
या महिन्यात कंपनीने 1,64,235 टन मँगनीजच्या विक्रीचे नेत्रदीपक यश संपादन करताना, नोव्हेंबर 2022 मधील विक्रीच्या प्रमाणात 91% वाढ नोंदवली आहे.
एमओआयएलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून 29 डिसेंबर 2022 रोजी पदभार स्वीकारलेल्या अजित कुमार सक्सेना यांनी सांगितले की अशा प्रकारची विक्रमी कामगिरी करण्यासाठी एमओआयएलशी संबंधित सर्व सहकारी एकत्र येऊन काम करत आहेत ही बाब अत्यंत उल्हसित करणारी आहे. आगामी काळात कंपनीची घोडदौड अशाच प्रकारे सुरु राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
एमओआयएल विषयी माहिती: एमओआयएल ही शेड्युल-अ वर्गातील मिनिरत्न श्रेणी-1ची केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी असून या कंपनीवर केंद्र सरकारच्या पोलाद मंत्रालयाचे प्रशासकीय नियंत्रण आहे. एमओआयएल ही देशातील सर्वात मोठी मँगनीज धातू उत्पादक कंपनी असून या कंपनीचा बाजारातील वाटा सुमारे 45% आहे. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश मधील कंपनीच्या 11 खाणींमध्ये मँगनीज उत्पादनाचे काम सुरु आहे. वर्ष 2030 पर्यंत उत्पादनात दुपटीने वाढ करून 3 दशलक्ष टन मँगनीज उत्पादनाचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य कंपनीने निश्चित केले आहे. मध्य प्रदेशातील उर्वरित क्षेत्रासह, गुजरात, राजस्थान तसेच ओदिशा या राज्यांमध्ये कंपनीच्या व्यापाराचा विस्तार करण्याच्या दृष्टीने एमओआयएल कंपनी संधीच्या शोधात आहे.
***
S.Patil/S.Chitnis/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1888148)
Visitor Counter : 208