युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांची भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या भोपाळ येथील उत्कृष्टता केंद्राला भेट, मध्यप्रदेश दालनात खेळाडूंशी साधला संवाद
प्रविष्टि तिथि:
26 DEC 2022 9:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 26 डिसेंबर 2022
महत्त्वाच्या घडामोडी:
- भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या भोपाळ येथील उत्कृष्टता केंद्रात पुढील क्रीडाप्रकारांसाठी सुविधा उपलब्ध आहेत: धावणे, मुष्टियुद्ध, हॉकी,ज्युडो,वुशू आणि कयाकिंग तसेच कॅनोईंग
केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग सिंग ठाकूर यांनी आज भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या भोपाळ येथील उत्कृष्टता केंद्राला भेट देऊन तेथील खेळाडूंशी संवाद साधला तसेच त्यांनी या केंद्रात उपलब्ध असलेल्या विविध सुविधांना भेटी देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. या वर्षी मध्य प्रदेशात आयोजित होणार असलेल्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धांच्या बोधचिन्हाच्या अनावरणापूर्वी केंद्रीय मंत्र्यांनी ही भेट दिली.

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी या भेटीदरम्यान प्राधिकरणाच्या केंद्रातील एम पी दालनाला भेट दिली. या दालनात, क्रीडा विज्ञान विभाग आहेत तसेच ज्युडो, वुशू, मुष्टियुद्ध आणि हॉकी हे खेळ खेळण्याच्या जागा आहेत. भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या भोपाळ येथील उत्कृष्टता केंद्रात पुढील क्रीडाप्रकारांसाठी सुविधा उपलब्ध आहेत: धावणे, मुष्टियुद्ध, हॉकी,ज्युडो,वुशू आणि कयाकिंग तसेच कॅनोईंग.

“सुमारे 100 एकर क्षेत्रावर मोठी क्रीडा केंद्रे आणि परिसर उभारण्यासाठी भारतीय क्रीडा प्राधिकरण करत असलेले प्रयत्न दखलपात्र आहेत. खेळाडू, प्रशिक्षक वर्ग, मदतनीस कर्मचारी आणि इतरांसाठी प्राधिकरण आयोजित करत असलेल्या कार्यक्रमांबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो,” केंद्रीय मंत्री म्हणाले.

यावर्षीच्या सुरुवातीला केंद्रीय क्रीडा मंत्र्यांनी मध्य प्रदेश राज्य सरकारमधील क्रीडा आणि युवा कल्याण मंत्री यशोधरा राजे सिंदिया तसेच राज्य सरकारच्या इतर अधिकाऱ्यांसह राज्यातील पॅरा कॅनोईंग सुविधा केंद्राला भेट दिली होती. त्यावेळी त्यांनी, या वर्षीच्या सुरुवातीच्या काळात, पोलंड येथे झालेल्या पॅरा कॅनोई विश्वचषक स्पर्धेत कांस्य पदक जिंकून इतिहास घडविणारी पहिली भारतीय पॅरा कॅनोईस्ट प्राची यादव हिच्यासह अनेक खेळाडूंशी बातचीत केली होती.
मध्य प्रदेशात उपलब्ध असलेल्या क्रीडाविषयक पायाभूत सुविधांवर भाष्य करताना, केंद्रीय मंत्री म्हणाले, “भोपाळमध्ये नेमबाजी आणि घोडेस्वारीसाठी सर्वोत्तम मैदाने आहेत. ही मैदाने जागतिक दर्जाची आहेत. खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धांसाठी मध्य प्रदेश राज्य देखील सज्ज झाले आहे.”
“मध्य प्रदेश राज्य देखील हळूहळू क्रीडा क्षेत्रासाठीचे मोठे केंद्र म्हणून विकसित होत आहे. इतर राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेशांनी देखील मध्य प्रदेशाचे उदाहरण डोळ्यासमोर ठेवावे अशी माझी इच्छा आहे, तसे झाले तर भारत लवकरच क्रीडा क्षेत्रातील महासत्ता म्हणून उदयाला येईल,” केंद्रीय मंत्री अनुराग सिंग ठाकूर पुढे म्हणाले.
* * *
R.Aghor/S.Chitnis/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1886775)
आगंतुक पटल : 231