कृषी मंत्रालय
कृषी संशोधन आणि शिक्षण विभागाचे सचिव आणि भारतीय कृषी संशोधन परिषदेचे महासंचालक डॉ हिमांशू पाठक यांनी आज जी एम मोहरीच्या विविध मुद्यांवर तपशीलवार निवेदन जारी केले
Posted On:
23 DEC 2022 6:59PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 23 डिसेंबर 2022
कृषी संशोधन आणि शिक्षण विभागाचे सचिवआणि भारतीय कृषी संशोधन परिषदेचे महासंचालक डॉ हिमांशू पाठक यांनी आज जीएम मोहरीच्या विविध मुद्यांवर तपशीलवार निवेदन जारी केले. अनुवांशिक अभियांत्रिकी मूल्यांकन समितीने (जी ई ए सी ) जनुकीय पद्धतीने सुधारित वाण असलेल्या जेनेटिकली मॉडिफाईड (जीएम) मोहरी DMH 11 आणि त्याच्या पॅरेंटल लाइन्सच्या पर्यावरणीय प्रसारणासाठी अलीकडेच मंजूरी दिल्याने त्याकडे माध्यमांचे आणि जनतेचे लक्ष मोठ्या प्रमाणावर वेधून घेतले आहे.
जीएम मोहरीला विरोध करणाऱ्यांकडून DMH 11 च्या मंजुरीच्या संदर्भात अनेक गैरसमज पसरवले जात आहेत. या मोहरीचे अधिकृतपणे आणि औपचारिकरित्या उत्पादन केल्यास ते मानवी आरोग्य, प्राणी आणि पर्यावरणासाठी सुरक्षित आहे का याविषयीच्या जोखमीच्या मूल्यांकनामध्ये आधुनिक आणि आयुर्वेदिक विज्ञान, पर्यावरण आणि पर्यावरणशास्त्र, कृषी आणि आरोग्य या क्षेत्रातील तज्ञांचा समावेश असलेल्या सर्व राष्ट्रीय संस्था आणि सार्वजनिक संशोधन प्रणालीचा समावेश होता.
भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या (ICAR) अधिकृत नसलेल्या किंवा माजी कर्मचार्यांनी या विषयावर प्रकाशित केलेले कोणतेही मत किंवा लेख हे, पर्यावरण संरक्षण संस्था ई पी ए (1986) अंतर्गत कार्यरत असणाऱ्या नियामक प्राधिकरणांनी दिलेल्या दस्तऐवज आणि निर्णयांपेक्षा वेगळे असल्यास परिषदेकडून त्याला मान्यता दिलेली नाही आणि ते सार्वजनिक हितासाठी आवश्यक असलेल्या कोणत्याही प्रशासकीय प्रक्रियेच्या अधीन आहेत. हे स्पष्ट करण्यासाठी हे विधान सार्वजनिक हितासाठी जारी केले जात आहे.
जनुकीय पद्धतीने सुधारित अर्थात जेनेटिकली मॉडिफाईड जीएम तंत्रज्ञान हे एक असे तंत्रज्ञान आहे जे कठीण किंवा अशक्य असलेल्या समस्येवर मात करण्यासाठी पीक प्रकारात कोणतेही लक्ष्यित बदल आणण्यास सक्षम असून मानव, प्राणी आणि पर्यावरणासाठी देखील सुरक्षित आहे. अशाप्रकारे, जीएम तंत्रज्ञानामध्ये भारतीय कृषी क्षेत्राला अत्यंत आवश्यक असलेली अशी क्रांती घडवण्याची अपरिमित क्षमता आहे. आपल्याला सध्या देशांतर्गत उत्पादन, देशातील खाद्यतेलाची गरज आणि आयातीचे प्रमाण यासंदर्भात या परिस्थितीकडे पाहायला हवे.
खाद्यतेलातील आत्मनिर्भरता- काळाची गरज:
देशांतर्गत मागणी लक्षात घेता भारतातील खाद्यतेलाच्या आयातीचे प्रमाण सतत वाढत आहे. वर्ष 2021-22 मध्ये, आपण प्रामुख्याने पाम, सोयाबीन, सूर्यफूल आणि कॅनोला तेलांचा समावेश असलेल्या 14.1 दशलक्ष टन खाद्यतेलांच्या आयातीवर 1,56,800 कोटी रुपये खर्च केले, जे भारताच्या एकूण 21 मेट्रिक टन खाद्यतेलाच्या दोन तृतीयांश वापराएवढे आहे. त्यामुळेच कृषी-आयातीवर खर्च होणारे परकीय चलन कमी करण्यासाठी खाद्यतेलामध्ये स्वयंपूर्णता आवश्यक आहे.
देशांतर्गत उत्पादनातील तूट आणि आव्हाने :-
तेलबियांची उदाहरणार्थ, सोयाबीन, मोहरी, भुईमूग, तीळ, सूर्यफूल, करडई, रामतीळ आणि जवस(अळशी), या पिकांची उत्पादकता जागतिक उत्पादकतेपेक्षा खूपच कमी आहे. वर्ष 2020-21 मध्ये, भारतामध्ये तेलबिया पिकाखाली एकूण 28.8 दशलक्ष हेक्टर क्षेत्र होते आणि एकूण उत्पादन 35.9 दशलक्ष टन झाले. तेलबियांची उत्पादकता 1254 किलो प्रति हेक्टर आहे. उत्पादकतेचा हा दर जागतिक सरासरीपेक्षा खूपच कमी आहे. एकूण 35.9 दशलक्ष टन तेलबियांमधून 8 मेट्रिक टन खाद्यतेलाची पुनर्प्राप्ती करण्यात आली. देशाला वर्षभरामध्ये लागणा-या 21 मेट्रिक टन एकूण खाद्यतेलाच्या गरजेपैकी निघालेले खाद्यतेल फक्त 35-40 टक्के गरज पूर्ण करते.विशेष म्हणजे खाद्यतेलाची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. एका अंदाजानुसार 2029-30 पर्यंत 29.05 दशलक्ष टन मागणी स्वयंपाकासाठी लागणा-या तेलाला असणार आहे. त्यामुळे भविष्यात परिस्थिती आणखी बिकट होईल.
मोहरी हे भारतातील एक महत्त्वाचे तेलबिया पीक आहे. मोहरीचे 9.17 दशलक्ष हेक्टर क्षेत्रामध्ये एकूण उत्पादन 11.75 दशलक्ष टन 2021-22 मध्ये घेतले आहे. मात्र, जागतिक सरासरी (2000 किलो/हेक्टर) च्या तुलनेत भारतामध्ये मोहरी या पिकाची उत्पादकता कमी म्हणजे प्रतिहेक्टर 1281 किलो आहे.
संकरित वाणाची गरज का आहे?
अनुवांशिकदृष्ट्या सुधारित वाण तयार केल्यामुळे वैविध्यपूर्ण बियाणांचा संकर झाल्यानंतर वाढीव उत्पन्न मिळविणे शक्य होते. यालाच संकरित ‘ व्हायगॉर हेटेरोसिस’ असे म्हणतात. संकरित बियाणांचा वापर करून तांदूळ, मका, मोती बाजरी, सूर्यफूल आणि अनेक प्रकारच्या भाज्या यांची पिके मोठ्या प्रमाणावर घेतली जातात. संकरित बियाणे तंत्रज्ञान उत्पादकता वाढविण्यासाठी अतिशय महत्वाची भूमिका बजावते, हे अनेक पिकांनी दाखवून दिले आहे. देशामध्ये मोहरीची उत्पादकता वाढवण्यासाठीही संकरित बियाणे तंत्रज्ञान महत्त्वाची भूमिका बजावू शकते.
बार्नेस /बारस्टार कार्यप्रणाली कशासाठी :-
संकरित बियाणे उत्पादनासाठी कार्यक्षम, पुनरूत्पादन करणा-या बियाणांच्या माध्यमातून पुनर्संचयित प्रणाली वापरणे आवश्यक आहे. मोहरीमध्ये सध्या उपलब्ध असलेल्या पारंपरिक ‘सायटोप्लाज्मिक’ -अनुवांशिक प्रणालीमध्ये काही पर्यावरणीय परिस्थितींमध्ये बियाणांचे पुनर्संचय कमी होऊ शकते. ही एकप्रकारे या प्रणालीची मर्यादा आहे. कारण यामुळे बियाणाची शुद्धता कमी होते. परिणामी, कृषी मंत्रालयाने कार्यालयीन अधिसूचना क्रमांक 15-13/2014-SD-IV द्वारे लालमोहरी आणि मोहरीच्या ‘बियाणे कायद्याच्या कलम 6(9) 1966, अंतर्गत संकरित बियाण्यांचे नेहमीचे शुद्धता मानक 2014 मध्ये 95% वरून 85% पर्यंत कमी केले.
आनुवांशिकदृष्ट्या दुरूस्त करण्यात आलेल्या बार्नेस/बारस्टार प्रणाली संकरित बियाणे उत्पादनासाठी एक कार्यक्षम आणि मजबूत पर्यायी पद्धत प्रदान करते. याच पद्धतीचा वापर कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकेसारख्या देशांमध्ये अनेक दशकांपासून यशस्वीरित्या करण्यात येत आहे.
यासंबंधीच्या तपशीलवार माहितीसाठी कृपया मूळ इंग्लिश प्रसिद्धीपत्रक येथे पहावे.
S.Kakade/Bhakti/Suvarna/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1886139)