नागरी उड्डाण मंत्रालय
आरोग्यसेवा, ही मोदी सरकारने लक्ष केंद्रित केलेल्या प्रमुख क्षेत्रांपैकी एक आहे : ज्योतिरादित्य सिंधिया
Posted On:
23 DEC 2022 4:51PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 23 डिसेंबर 2022
आरोग्यसेवा ही मोदी सरकारच्या प्रमुख लक्ष केंद्रित केलेल्या क्षेत्रांपैकी एक आहे,असे प्रतिपादन केंद्रीय नागरी उड्डाण आणि पोलाद मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी आज केले.आरोग्य सेवेसाठी सर्वांगीण दृष्टिकोन समोर ठेवून, आजारांना कारणीभूत घटक दूर सारत आणि रोगांवरील उपचार सर्वसमावेशक करत सरकार आरोग्य आणि निरोगीपणा जपण्यावर भर देत आहे, असे ते दिल्ली येथे एका पत्रकार परिषदेला संबोधित करताना म्हणाले. भारतात आरोग्य क्षेत्रात गेल्या 7-8 वर्षात जेवढे काम झाले आहे तेवढे काम गेल्या 70 वर्षात झाले नाही, असे ते म्हणाले.
गेल्या 8 वर्षांपासून आरोग्याच्या पायाभूत सुविधांमध्ये भर घातली जात आहे, तसेच प्रत्येक भारतीयाला परवडणारी आणि दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यात येत आहे आणि या क्षेत्राला तंत्रज्ञानाशी जोडले जात आहे, असे त्यांनी सांगितले. प्रत्येक भारतीयाला परवडणारे उपचार आणि औषधे प्रदान करणे, ग्रामीण स्तरावर आधुनिक आरोग्य सुविधांचा लाभ, मानवी संसाधनांचा विकास, प्रतिबंधात्मक आरोग्य सेवेला चालना, आणि तंत्रज्ञानाचा आरोग्य सेवेमध्ये उपयोग वाढविणे अशा सुधारणा करत भारतातील आरोग्य सेवा विविध आघाड्यांवर सुधारून बळकट केल्या जात आहेत, असे सिंधिया यांनी सांगितले.
पंतप्रधान जन आरोग्य योजना (PM-JAY) सारख्या योजनांद्वारे सुमारे 10.74 कोटी गरीब आणि वंचित कुटुंबांना (अंदाजे 50 कोटी लाभार्थी) द्वितीय आणि तृतीय स्तर रुग्णालयीन सेवा उपलब्ध होत आहेत.उपलब्ध केलेल्या आयुष्मान कार्डांची संख्या 17.6 कोटी आहे आणि 28,800 हून अधिक सार्वजनिक आणि खाजगी रुग्णालये त्यात समाविष्ट करण्यात आली आहेत,असे ज्योतिरादित्य सिंधिया यांनी यावेळी सांगितले.प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी (PM BJP) योजनेबद्दल, बोलताना ते म्हणाले, की ते भारतभरात सुमारे 8,800 जनऔषधी केंद्रांमधून1,800 हून अधिक स्वस्त परंतु उच्च-गुणवत्तेच्या औषधांची उपलब्धता सुनिश्चित होत आहे.
योग आणि आयुषबाबत देशात अभूतपूर्व जनजागृती झाल्याचेही ते म्हणाले.जगात योगाबद्दलची उत्सुकता वाढली आहे. स्वच्छ भारत अभियानामुळे अनेक आजारांना आळा घालण्यात यश आले आहे.पोषण अभियान आणि जल जीवन मिशन या योजना कुपोषण नियंत्रणात मदत करत आहेत, असे सिंधिया यांनी सांगितले.
S.Kakade/S.Patgaonkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1886073)
Visitor Counter : 285