इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
डिजिटल साक्षरतेला चालना
प्रविष्टि तिथि:
23 DEC 2022 3:46PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 23 डिसेंबर 2022
आपल्या नागरिकांच्या हितासाठी आणि त्यांच्या आयुष्यात परिवर्तन व्हावे यासाठी तंत्रज्ञान आत्मसात करून गेल्या 7 वर्षांत भारत एक प्रभावी राष्ट्र बनले आहे. हे लक्षात घेऊन सरकार देशभरातील विशेषत: ग्रामीण भागातील नागरिकांना डिजिटल साक्षर करण्यावर भर देत आहे. या अनुषंगाने सरकारने खालीलप्रमाणे विविध पावले उचलली आहेत.
- 2014 ते 2016 या वर्षांमध्ये, भारत सरकारने "राष्ट्रीय डिजिटल साक्षरता अभियान (एनडीएलएम)" आणि "डिजिटल साक्षरता अभियान (दिशा)" या दोन योजनांची अंमलबजावणी केली. यात ग्रामीण भारतासह देशभरातल्या 52.50 लाख व्यक्तींना (प्रत्येक पात्र कुटुंबातील एक व्यक्ती) डिजिटल साक्षर करण्याचे एकत्रित उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. या दोन योजनांतर्गत एकूण 53.67 लाख लाभार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आले, त्यापैकी सुमारे 42% उमेदवार हे ग्रामीण भारतातील होते. या दोन्ही योजना आता बंद करण्यात आल्या आहेत.
- सन 2017 मध्ये भारतात डिजिटल साक्षरता आणण्यासाठी सरकारने 'प्रधानमंत्री ग्रामीण डिजिटल साक्षरता अभियान (प्रधानमंत्री ग्रामीण दिशा)' नावाची योजना मंजूर केली. देशभरातील 6 कोटी ग्रामीण कुटुंबांना (प्रति कुटुंब एक व्यक्ती) त्याचा लाभ देण्याचे उद्दिष्ट होते. आतापर्यंत एकूण 6.62 कोटींहून अधिक उमेदवारांची नोंदणी झाली आहे आणि 5.68 कोटी प्रशिक्षित झाले आहेत, त्यापैकी 4.22 कोटी उमेदवारांना या योजनेंतर्गत अधिकृतपणे प्रमाणपत्र देण्यात आले आहे.
माहिती तंत्रज्ञानाची उत्तम जाण असलेल्या अनेक तरुण, प्रतिभावान तरुणांनी पंचायत स्तरावर ग्रामस्तरीय उद्योजक (व्हीएलइ) म्हणून सामायिक सेवा केंद्रे (सीएससी) स्थापन केली आहेत. या योजनेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार पात्रता निकष पूर्ण करणार्या सीएससीना ग्रामीण भागातल्या लोकांना डिजिटली साक्षर करण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे. जे तरुण या योजने अंतर्गत प्रशिक्षक होण्यासाठीचे पात्रता निकष पूर्ण करतात त्यांना डिजिटल साक्षरता प्रशिक्षण देण्यासाठी ग्रामस्तरीय व्यावसायिकां द्वारे नियुक्त केले जाते. याशिवाय या योजनेंतर्गत प्रशिक्षित लाभार्थी, त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना आणि मित्रांना डिजिटल साक्षर होण्यासाठी मदत करत आहेत.
इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी आज राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.
S.Kakade/P.Jambhekar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1886035)
आगंतुक पटल : 348